सासष्टी: मुरगाव बंदर प्राधिकरणाने बेतूल येथील बंदर प्रकल्प उभारण्याच्या कामाचा पुनरुच्चार केल्याने या प्रकल्पाला आता वाढता विरोध होत आहे. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई व दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी त्याची लगेच दखल घेत विरोध दर्शवला आहे. आता स्थानिकांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यास सुरवात केली आहे.
पारंपरिक मच्छिमार तथा दक्षिण गोवा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आज पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाला पूर्ण विरोध असल्याचे स्पष्ट केले व आपण केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता व खासदार फर्नांडिस यांच्याशी पूर्ण सहमत असल्याचे स्पष्ट केले.
डिसिल्वा म्हणाले की, ‘सागरमाला’अंतर्गत बेतूल येथील बंदर प्रकल्प दुसरीकडे वळवला जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ मध्ये स्पष्ट केले होते. तरीही मुरगाव बंदर प्राधिकरण हा प्रकल्प सुरू करण्याची भाषा का करीत आहे, हेच कळत नाही. मुरगाव परिसरात मुरगाव बंदरामुळे अनेक लोकांचे आरोग्य बिघडत आहे. जर हे बंदर कोळसा वाहतुकीसाठी बांधण्याचा विचार आहे तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही, असे डिसिल्वा यांनी सांगितले.
मच्छिमार लवू केरकर व वासुदेव केरकर यांनी सांगितले की, या बंदर प्रकल्पाला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. पारंपरिक मासळी उद्योग धंदा सोडा, बंदर उभारल्यास ट्रॉलर सुद्धा ने आण करण्यास त्रासदायक ठरणार आहे. बंदर प्रकल्पामुळे व कोळसा वाहतूक सुरू झाल्यास परिसरातील शेत जमीन नष्ट होईल, आमचे जगणे कठीण होईल.
वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनीही बेतूल येथील बंदर प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे बेतूल व शेजारील गावांची खरी ओळख नष्ट होईल. येथील बंदर प्रकल्पाला हात घालण्यापूर्वी स्थानिकांची मते जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिकांच्या भावना समजून घेऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असे खासदार कॅ.विरियातो फर्नांडिस यांचे म्हणणेआहे.
बेतूलवासीय वारंवार या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, त्याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
बेतूल येथे बंदर सुरू करण्यात आला तर येथील मच्छिमारांवर व लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होईल. त्यांना तिसऱ्यो, कालव, शिनाणी मिळणे कठीण होणार आहे.
- सावियो डिसिल्वा, कॉंग्रेस नेते
...अन् लोक झाले जागे
मुरगाव बंदर प्राधिकरणाने होत असलेल्या विरोधामुळे बेतूल येथील बंदर प्रकल्पाचा नाद दहा वर्षापूर्वी सोडून दिला होता. पण आता त्यांनी या प्रकल्पाचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा जारी केल्याने पुन्हा एकदा संबंधित लोक जागे झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.