म्हापसा: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या गोव्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखेने खोटी कागदपत्रे तयार करून बँकेची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नीता शेट्टीगर आणि शुभम नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांदोळीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेमधील कर्मचाऱ्याच्या मदतीनेच संपूर्ण प्रकार घडवून आणण्यात आला होता.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार नीता शेट्टीगर आणि शुभम नाईक यांनी बँकेतील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने कर्ज मिळवण्यासाठी बनावटी कागदपत्रे बनवली. 2019 ते 2020 दरम्यान हे कर्ज मंजूर झाले मात्र कळंगुट येथील मारिया फिलोमेना शालिनी लोबो नावाच्या एका दुकान मालकिणीने याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
फिर्यादी मारिया फिलोमेना शालिनी लोबो हिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी तिच्या दुकानाचे नाव वापरून खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक केली आहे.
अनेक दिवसांपासून विविध बँकांमधून तिला कर्जाच्या बाबतीत फोन कॉल्स येत होते, मात्र कोणतेही कर्ज न घेतल्याने हा प्रकार तिला संशयास्पद वाटला आणि तिने याविरोधात तक्रार दाखल केली. आता मात्र विविध मालमत्तांच्या नावे या टोळीने अनेक कर्ज घेतली असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.