पणजी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६६ वरील बांबोळी येथील होली क्रॉसजवळ असलेल्या पादचारी उड्डाणपूल (फूट ओव्हरब्रीज) उचलण्याचे आणि उंचीतील मोकळीक वाढविण्याचे काम रविवारी (ता. २५) करण्यात येणार आहे. या कामासाठी पहाटे १ ते सकाळी ६ या पाच तासांच्या कालावधीत संबंधित महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काम सुरक्षितपणे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या वाहतूक बदलासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पणजीहून आगशीच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी दोन पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहनचालकांना मेरशी सर्कल येथून जुने गोवे रस्ता मार्गे पिलार जंक्शनपर्यंत जाता येईल. दुसरा पर्याय म्हणून मेरशी सर्कल येथून मेरशी लष्करी छावणीमार्गे गोवा वेल्हा येथे जाता येणार आहे.
पणजीहून आगशीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड व्यावसायिक वाहनांना मेरशी सर्कल येथून जुने गोवे आणि फोंडामार्गे मडगावच्या दिशेने वळविण्यात येणार आहे. आगशीहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाहनचालक गोवा वेल्हा जंक्शन येथून शिरदोन रस्ता आणि ‘ग्रॅण्ड हयात’मार्गे बांबोळी येथे येऊ शकतात. यातून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळले आहे. या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मूळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आणि सेवा रस्त्याचा वापर करता येणार आहे. वाहतुकीची प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे.
कोणता पर्यायी मार्ग वापराल?
पणजी ते आगशी - हलकी वाहने : मेरशी-जुने गोवे-पिलार किंवा मेरशी लष्करी छावणी-गोवा वेल्हा.
पणजी ते आगशी - अवजड वाहने: मेरशी–जुने गोवे–फोंडा–मडगाव.
आगशी ते पणजी - हलकी वाहने: गोवा वेल्हा- शिरदोन-ग्रॅण्ड
हयात-बांबोळी किंवा आगशी-पिलार-जुने गोवे-पणजी.
आगशी ते पणजी - अवजड वाहने: मडगाव-फोंडा किंवा वेर्णा जंक्शन-लोटली-फोंडा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.