अवित बगळे
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत 6 डिसेंबर 1992 या दिवशी कारसेवकांचे जत्थेच्या जत्थे दिसत होते. वादग्रस्त बांधकामापासून आम्ही 30 मीटर अंतरावर बसलो होतो. काही होते आहे, हे कळण्याआधीच त्या वास्तूचा एक घुमट कारसेवकांनी खाली पाडला.
तासाभरात तेथे कोणती इमारत होती, याचे नामोनिशाणच मिटवून टाकण्यात आले. होय, त्या दिवशी बाबरी पाडताना मी पाहिली, अशा शब्दांत कायसूव येथील संदीप कासकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ते कारसेवक म्हणून अयोध्येत गेले होते.
कासकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की अयोध्येला जाणे त्याकाळी आजच्यासारखे सुकर नव्हते. चार रेल्वे बदलून अयोध्येत जावे लागे. त्यासाठी चार दिवस लागले. २८ नोव्हेंबरला आम्ही निघालो आणि चार दिवसांनी अयोध्येत पोचलो. तेथे कारसेवकांसाठी तंबू उभारून राहण्याची व्यवस्था केली होती. गवताच्या पेंढ्या अंथरूण त्यावर रात्री अंग टाकत असू. दिवसभराचा कार्यक्रम वरिष्ठ ठरवत असत. त्यानुसार आम्ही तेथील विविध ठिकाणी भेटी देत असू.
मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही, एवढी गर्दी त्या परिसरात होती; पण सारे काही शिस्तबद्ध होते. कोण कोठे जाणार हे आधीच ठरलेले असायचे. आम्हाला ६ रोजी सकाळी शरयू नदीवर जाऊन मूठभर रेती नव्या मंदिरासाठी आणण्याची सेवा दिली होती. आमच्या तंबूपासून ४०० मीटरवर ते वादग्रस्त बांधकाम होते. त्यामुळे तेथे काय चालले आहे, हे आम्हाला स्पष्ट दिसत होते.
नदीवर सावकाश जाऊ, असा विचार आम्ही सकाळी ९ वाजता केला. चार दिवस भरपूर फिरल्याने तो परिसर आम्हाला परिचित झाला होता. तेवढ्यात त्या परिसरात गर्दी वाढू लागल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्या दिशेने सरकलो. त्या वास्तूपासून ३० मीटरवर आम्ही बसलो आणि गर्दी काय करते, ते पाहू लागलो. काही वेळात त्या इमारतीवर कारसेवक दिसू लागले.
चढण्यास अवघड वाटणाऱ्या घुमटांवर कारसेवक चढले आणि पाईपच्या साहाय्याने त्यांनी प्रहार करणे सुरू केले. जवळच असलेल्या मंचावरून नेते बोलत होते आणि इकडे इमारतीची पाडापाडी सुरू होती. तेथे गर्दी होती; मात्र चेंगराचेंगरी नव्हती.
काहीजणांच्या अंगावर इमारतीचे अवशेष पडले, हे खरे आहे. आम्ही ते सारे पाहात होतो. तेथेच बसून सायंकाळ कधी झाली आणि अंधार दाटला, हेही समजले नाही. आठवणीसाठी एक वीट मात्र सोबत आणली होती, असे त्यांनी सांगितले.
तंबूत परतल्यानंतर दिवसभराच्या थकव्याने डोळा लागला. दुसऱ्या दिवशी हनुमान गढी भेट, असा कार्यक्रम होता तो पूर्ण केला.
त्या दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांची जागा केंद्रीय राखीव पोलिस दलाने घेतल्याचे लक्षात आले. ७ डिसेंबरच्या रात्री आम्ही तंबूत झोपलो असताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तंबूत घुसले आणि त्यांनी लाठीमार सुरू केला.
त्यावेळी नेसत्या वस्त्रानिशी तंबू सोडावा लागला. त्या पोलिसांनी दीड किलोमीटरवरील रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी केली होती. त्यांनी त्यावेळी लाठीमार केला. रेल्वे स्थानकावरून ८ रोजी प्रवास सुरू केला आणि चार दिवसांनी घरी पोचलो, असे कासकर म्हणाले.
पर्रीकरांनी दिली होती पोलिसांच्या हातावर तुरी
कासकर यांनी सांगितले, की अयोध्येहून परत येताना मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले आदींना मडगावात पोलिस अटक करणार, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे ते लोंढा येथेच रेल्वेतून उतरून कारने गोव्यात आले. इतर कारसेवक मात्र मडगावला उतरले. पणजीपर्यंत बसची व्यवस्था केली होती.
गनिमी कावा :
बाबरी मशीद पाडण्यापूर्वी देवाच्या दर्शनासाठी म्हणून प्रशिक्षित कारसेवक मोठ्या संख्येने त्या इमारतीत जात होते. मात्र, येताना एकटाच बाहेर येत होता. अशा रितीने ती वास्तू कारसेवकांनी पूर्ण व्यापली होती. ते आम्हाला बसल्या जागेवरून दिसत होते. त्यातील काहीजण इमारतीवर चढले. एकच जल्लोष झाला. काही वेळ काय होते, हे कळण्याआधीच घुमट कोसळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.