Amit Shah, BL Santosh Goa visit Dainik Gomantak
गोवा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

BL Santosh Goa tour: राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागी कोण, महामंडळांवर कोणाची वर्णी लागणार आदी प्रश्नांची उत्तरे ७ सप्टेंबरनंतर मिळण्याची शक्यता आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागी कोण, महामंडळांवर कोणाची वर्णी लागणार आदी प्रश्नांची उत्तरे ७ सप्टेंबरनंतर मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ७ सप्टेंबर रोजी होणारा गोवा दौरा आता निश्चित झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे. कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्यानंतर भाजपने संघटनात्मक कार्यक्रमांवर अधिक भर देणे सुरू केले आहे.

राज्यात संघटनसचिव हे पद रिक्त असल्याने थेट केंद्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी गोव्याकडे लक्ष दिले आहे. या आठवड्यात विधानसभा मतदारसंघवार आढावा घेतल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक हालचालींना गती आली आहे. प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.

या साऱ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा निश्चित झाला आहे. पश्चिम विभागीय मंडळाच्या २८ व्या बैठकीच्या निमित्ताने होणाऱ्या या दौऱ्याला केवळ प्रशासकीय बैठक म्हणून पाहिले जात नसून, त्यामागे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची पुढील रणनीती दडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हेही पुढील महिन्यात पुन्हा गोवा दौऱ्यावर येणार असल्याने राज्यातील राजकीय हालचाली अधिकच गतिमान झाल्या आहेत.

अमित शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम विभागीय मंडळाच्या बैठकीत गोवा, महाराष्ट्र, गुजरात तसेच दादरा-नगर हवेली, दमण-दीव ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार असली, तरी गोव्यातील भाजप संघटना, आगामी स्थानिक राजकीय समीकरणे आणि २०२७ च्या निवडणुकीची प्राथमिक तयारी यांवरही पडद्यामागे महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विशेष म्हणजे, बी. एल. संतोष यांचा गोवा दौरा हा संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ते जेव्हा जेव्हा गोव्यात येतात, तेव्हा केवळ संघटनात्मक आढावा घेतला जात नाही, तर जिल्हानिहाय कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांची कामगिरी, मतदारसंघनिहाय अहवाल आणि भविष्यातील राजकीय रणनीती यांचाही सखोल आढावा घेतला जातो. त्यामुळे त्यांच्या आगामी भेटीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात अलीकडच्या काळात विविध स्तरांवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विरोधकांची आक्रमक भूमिका, काही मतदारसंघांतील अंतर्गत नाराजी, तर दुसरीकडे भाजपकडून संघटन अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नेतृत्वाने गोव्याकडे विशेष लक्ष दिल्याचे संकेत या दौऱ्यांतून मिळत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामकाजाचा आढावा, आगामी विकास प्रकल्प, संघटनात्मक बळकटीकरण आणि निवडणूकपूर्व वातावरणाची चाचपणी अशा विविध मुद्द्यांवरही बंद दाराआड चर्चा होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

आतापर्यंत पश्चिम विभाग मंडळाच्या बैठकीकडे प्रामुख्याने प्रशासकीय कार्यक्रम म्हणून पाहिले जात होते. मात्र, यावेळी अमित शहा आणि त्यानंतर बी. एल. संतोष यांचे सलग दौरे जाहीर झाल्याने या भेटींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात गोव्यातील राजकारणाला नवी दिशा देणारे काही निर्णय किंवा संदेश मिळतात का, याकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजप मुख्‍यालयाचे ७ सप्‍टेंबरला उद्‍घाटन शक्‍य : पश्‍चिम विभागीय मंडळाच्‍या येत्‍या ७ सप्‍टेंबरला होणाऱ्या २८ व्‍या बैठकीनिमित्त गोव्‍यात येत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या हस्‍ते त्‍याच दिवशी भाजप मुख्‍यालय इमारतीचे उद्‍घाटन होण्‍याची शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वी गोव्‍यात आलेले भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी कदंब पठारावर उभ्‍या राहिलेल्‍या भाजप मुख्‍यालयाची पाहणी केली होती. इमारतीचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्‍यामुळे ७ सप्‍टेंबर रोजी शहा यांच्‍या हस्‍ते इमारतीचे उद्‍घाटन होऊ शकते, असे भाजपच्‍या सूत्रांनी सांगितले.

राजकीय अर्थ काय?

१  ७ सप्टेंबरला अमित शहा यांचा गोवा दौरा निश्चित.

२ पश्चिम विभागीय मंडळ बैठकीच्या निमित्ताने राज्यातील भाजप संघटनेचीही चाचपणी होण्याची शक्यता.

३ पुढील महिन्यात बी. एल. संतोष यांचाही गोवा दौरा.

४ २०२७ च्या विधानसभा निवडणूक तयारीची प्राथमिक नांदी मानली जात असल्याची राजकीय चर्चा.

५ दिल्ली नेतृत्वाच्या वाढत्या लक्षामुळे गोव्यातील भाजपमध्ये आगामी काळात संघटनात्मक आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT