Air Chief Marshal Hrushikesh Moolgavkar
Air Chief Marshal Hrushikesh Moolgavkar Dainik Gomantak
गोवा

Air Chief Marshal Hrushikesh Moolgavkar : मूळचे गोमंतकीय असलेले एकमेव हवाईदल प्रमुख

गोमन्तक डिजिटल टीम

Air Chief Marshal Hrushikesh Moolgavkar : महावीरचक्र तसेच, परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त झालेले, निवृत्त हवाई दल प्रमुख, एच. मुळगावकर हे गोव्यातील मुळगाव-डिचोली येथील रहिवासी. त्यांचा जन्म दि. 14 ऑगस्ट 1920 रोजी झाला. मुळगावकर हे पहिल्या काही गोवेकरांपैकी होते ज्यांना ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’च्या हवाई दलात घेतले गेले. त्यांच्या आधी हवाई दलात रुजू झालेले एअर व्हाइस मार्शल एर्लीच पिंटो,यांच्याहून मुळगावकर केवळ 51 सेवा क्रमांकाने कनिष्ठ होते. एअर चीफ मार्शल मुळगावकर हे दि. 30 नोव्हेंबर 1940 रोजी सेवेत रुजू झाले, तर एअर व्हाइस मार्शल पिंटो हे दि. 1 ऑगस्ट 1940 रोजी सेवेत रुजू झाले होते.

सेवेत असलेल्या त्यांच्या इतर वरिष्ठ गोमंतकीयांप्रमाणेच, एअर चीफ मार्शल मुळगावकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वैमानिक होते. आपल्या धाडसी वृत्तीमुळे त्यांनी देशासाठी सेवेच्या प्रारंभिक काळातच युद्धभूमी गाजवली. एअर व्हाइस मार्शल पिंटो यांचा जर एका दुर्दैवी अपघातामुळे मृत्यू झाला नसता, तर आज गोव्याचे दोन सुपुत्र वायुसेनेचे प्रमुख बनले असते.

एअर चीफ मार्शल या पदावर नियुक्ती होताच, एक स्क्वॉड्रन घेऊन पेशावर येथील युद्धात मुळगावकर सहभागी झाले. ती लढाऊ विमाने त्यानंतर 1942 च्या दरम्यान बर्माविरुद्धच्या युद्धात तेच स्क्वॉड्रन तैनात करण्यात आले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, एअर चीफ मार्शल मुळगावकर (तत्कालीन विंग कमांडर) हे भारतीय वायुसेनेत महावीरचक्र प्राप्त करणाऱ्या पहिल्या 4 आयएएफ अधिकाऱ्यांपैकी एक होते. हे महावीर चक्र त्यांना 1947-48 मधील जम्मू-काश्मीर येथील त्यांच्या सैनिकी कारवाईसाठी प्रदान केले होते. जे दि. 8 डिसेंबर 1951 रोजी म्हणजे भारत प्रजासत्ताक होताच देण्यात येणार होते. मुळगावकर आणि 1971 मधील युद्धाच्या तुकडीचे प्रमुख एलन डिकोस्टा या दोन गोमंतकीयांनाच हे पदक देऊन गौरविण्यात आले आहे.

जम्मू- काश्मीर येथील सैनिक कारवाई दरम्यान त्यांनी जम्मू तसेच श्रीनगर या दोन्ही ठिकाणांहून नियोजन आणि प्रत्यक्ष कारवाई केली. जेव्हा जेव्हा काही कठीण आणि धोकादायक आव्हाने त्यांच्यासमोर येत, तेव्हा ते स्वतः लढाऊ वैमानिक बनून युद्धक्षेत्रावर उतरत. त्यांच्या निर्भय स्वभावामुळे व कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याच्या तत्परतेमुळे इतर सहकाऱ्यांमध्ये त्यांनी प्रचंड आत्मविश्वास जागवला. पाकिस्तानमधील संरक्षित डोमेल पूल, उरी व सदाबाद या संरक्षण क्षेत्रात झालेल्या हवाई हल्ल्यांचे नेतृत्व त्यांनी स्वतः केले होते. त्यांनी उड्डाण केलेले हवाई क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र होते. ज्याच्या हद्दीतून उड्डाण करणे म्हणजे थेट बॉम्बहल्ला अंगावर ओढवून घेणे. त्यांनी लढाऊ विमानांना अशा क्षेत्रांतूनही सुरक्षित परत आणले. पूंछ, कारगिल आणि लेह येथील तळांशी संबंध प्रस्थापित होईपर्यंत ते धैर्याने आपल्या कार्यात गुंतून राहिले.

1975 साली त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. तेव्हा त्याबाबत प्रसिद्ध झालेले खालील अवतरण सर्व काही सांगून जाते.

‘एअर चीफ मार्शल एच. मुळगावकर हे नोव्हेंबेर 1940 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी दोन लढाऊ विमानांच्या तुकड्या सोबत घेऊन युद्ध केले. तसेच बर्माच्या आघाडीवरदेखील कारवाई केली. 1947 मधील जम्मू- काश्मीर आक्रमणानंतर लगेचच त्यांनी ऑपरेशनल विंगचा पदभार स्वीकारला. त्यांनी सर्व कारवाया स्वतः हाती घेऊन त्या पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे त्यातील अनेक कारवायांचे नेतृत्वही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महावीरचक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.’

‘एअर मार्शल मुळगावकर यांची नियुक्ती एअर अ‍ॅडव्हायझर या इंग्लंडच्या हवाई दलातील एका महत्त्वाच्या पदावर करण्यात आली होती. पश्चिम हवाई मुख्यालयातील उच्च अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तसेच हवाईदलाच्या मुख्यालयात धोरण आणि योजना संचालक, पश्चिम भारतातील एअर ऑफिसर इन चार्ज अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. मध्य वायुसेना दलाचे एओसी म्हणून आणि नॅशनल डिफेंस अकॅडेमी येथेही कमांडंट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या वरील सर्व पदांवर सेवा बजावताना त्यांनी त्यांच्यातील उपजत नेतृत्व गुण व राष्ट्रनिष्ठा दाखवली आहे. सर्वांसाठी उच्च कोटीचे मापदंड त्यांनी प्रस्थापित केले. नॅशनल डिफेंस अकॅडेमीमध्ये त्यांनी शिक्षण पद्धतीत आणि अभ्यासक्रमांमध्ये नवीन बदल घडवून आणले. आज या अकॅडेमीला जी प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त आहे तो याच कारणांमुळे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.’

‘एप्रिल 1973 मध्ये एअर चीफ मार्शल मुळगावकर यांनी पश्चिम वायुसेना दलाचे एओसी-इन-सी म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध युनिट्सची लढाऊ कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला. त्यांच्याखाली काम करणार्‍या इतर सैनिकांसाठी ते एक प्रेरणास्रोत होते. त्यांच्या कार्यकाळातच पश्चिमी वायुसेना दलाच्या विमानांचे सुरक्षा क्षेत्रातील कार्य नेत्रदीपक ठरले. एअर चीफ मार्शल मुळगावकर यांनी त्यांच्या अधिकारी पदाच्या वेळी अशीच अनेक कार्ये हातात घेतली व अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते प्रयत्नशील होते. वायुसेनेशी संलग्न नवीन संस्था स्थापन करणे, तसेच त्याच्याशी निगडीत कार्यक्षेत्रातही त्यांनी बदल घडवून आणण्यासाठी काम केले. एअर चीफ मार्शल मुळगावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अद्वितीय आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी सेवा दिलेली आहे.’

एअर चीफ मार्शल मुळगावकर हे फेब्रुवारी 1976 ते ऑक्टोबर 1978 या कालावधीत हवाई दलाचे प्रमुख होते. एक अष्टपैलू वैमानिक, 67 प्रकारची विविध विमाने त्यांनी हाताळली आहेत, वाहतुकीची विमाने तसेच हेलिकॉप्टर्ससुद्धा त्यांनी चालविली आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरण्यात आलेल्या तत्कालीन विमानांपासून ते सुधारित विमाने, जेट्स जसे की, जीनेट्स आणि मिग विमाने, अशी सर्वप्रकारची विमाने त्यांनी हाताळली आहेत. आवाजाच्या गतीपेक्षाही जास्त वेग असलेल्या ‘मिस्टिअर-2’ हे विमान चालविणारे ते पहिले भारतीय होते. 1978 साली पेंटागॉन येथे त्यांना लीजन ऑफ मेरिट या यूएस काँग्रेशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एअर चीफ मार्शल मुळगावकर हे प्रसिद्ध डॉ. एस. आर. मुळगावकर यांचे सुपुत्र. डॉ. मुळगावकर हे पहिल्या फळीतील एफआरसीएस (त्यातील पहिले डॉ. फ्रेड नोरोन्हा) डॉ. मुळगावकर यांनी आजारातून बरे केलेल्या रुग्णांमध्ये महाराज आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांचाही समावेश आहे. मुंबईतील कंबाला हिल येथे त्यांचे स्वतःचे रुग्णालय होते. त्याच रुग्णालयात त्यांचे मेहुणे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. व्ही. एन. शिरोडकरदेखील कार्यरत होते. एअर चीफ मार्शल मुळगावकर यांच्या आई गोव्यातील वेलिंग या गावच्या. भारतीय वायुसेना दलात त्यांना केवळ एच. मुळगावकर याच नावाने ओळखले जाते. त्यामागे एक मनोरंजक कथा आहे. (प्रस्तुत लेखकाला त्याविषयीचा खुलासा खुद्द एअर चीफ मार्शल मुळगावकर यांनी 2010 साली केला होता.)

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून इंटर-सायन्स उत्तीर्ण झाल्यावर मुळगावकर आएएफमध्ये मुलाखत देण्यासाठी गेले होतो. त्यांच्या अर्जात हृषिकेश (अरविंद) श्यामराव मुळगावकर असे नाव लिहिले होते. ‘इतकी सगळी कोणाची नावे आहेत?’, असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने मुळगावकरांना विचारला. ‘पहिले माझे स्वत:चे आहे, कंसातले दुसरेही माझेच घरगुती नाव आहे, त्यानंतर माझ्या वडिलांचे नाव आहे आणि सर्वांत शेवटी आमचे आडनाव आहे.’, अशी माहिती मुळगावकरांनी त्या अधिकाऱ्याला दिली. त्यावर तो अधिकारी म्हणाला की, ‘तुला घरी काय म्हणतात, तुझ्या वडिलांचे नाव काय आहे वगैरे लांबड लावण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही.’ त्याने घरगुती नाव खोडले, वडिलांचे नावही खोडले. पण, त्याला हृषिकेश हे नाव काही म्हणता येईना. त्याच्या ब्रिटिश जिभेला अस्सल मराठी नाव उच्चारणे फारच जड गेले. त्या अधिकाऱ्याने हृषिकेश या नावाचे लघुरूप ‘एच.’, असे ठेवले, तेच चिकटले. अशा पद्धतीने चिरंजीव हृषिकेश (अरविंद) श्यामराव मुळगावकर, एच. मुळगावकर झाले.

टेल्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मुळगावकर हे एच. मुळगावकरांचे चुलत बंधू. त्यांचे कार्य व योगदान यांचा सन्मान करण्यासाठी टाटांनी तेव्हाच्या आपल्या नवीन एसयूव्हीचे नामकरण, सुमंत या नावातील एसयू ही पहिली दोन अक्षरे व आडनावातील एमओ ही पहिली दोन अक्षरे घेऊन ‘सुमो’ असे केले. हे नाव जपानच्या ‘सुमो’ पैलवानांवरून घेतल्यासारखे अनेकांना वाटते, जे चुकीचे आहे. एअर चीफ मार्शल मुळगावकर हे सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांची मुलगी, ज्योती राय ही दिल्लीत स्थायिक झाली आहे. पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दि. 9 एप्रिल 2015 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यावेळी ते 94 वर्षांचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT