पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा औद्योगिक वसाहतीत 1988 पासून कार्यरत असलेल्या एसीजीएल कंपनीच्या (ACGL Company) दोन्ही विभागांतील कामगार संघटनेने गेल्या महिन्यात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत ठरविण्यात आल्या प्रमाणे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने कंपनीला 18 अक्टॉबर पासून पाच दिवस संपावर (Workers strike) जाण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मधील पगार वाढ कराराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सदर कंपनीच्या दोन्ही कामगार संघटना प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कामगार सेनेच्या झेंड्याखाली संलग्नित झाल्या असल्याने या संपाचा काय परिणाम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सदर कंपनीच्या कामगारांचा गेल्या साडेतीन वर्षां पासून पगार वाढीचा मुद्दा प्रलंबित असून कंपनीने कामगारांच्या मागण्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे, त्याच प्रमाणे कामगारांनी मागितलेली पगार वाढ कंपनी व्यवस्थापनाने मान्य केली नाही, त्याच बरोबर कामगारांनी केलेल्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सुध्दा या प्रकरणी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते ही निष्फळ ठरल्याने शेवटी कामगारांनी संपावर जाण्याचे हत्यार उगारले आहे.
सदर कंपनीच्या होंडा वडाकडे येथिल एसएमडी व भुईपाल येथिल विभाग क्रमांक दोन बीबीडी अशा दोन विभागात सद्या कायम स्वरुपी, कंत्राटी तसेच इतर लघू उद्योग मिळून पाचशेच्या वर कामगार काम करीत आहेत. त्यामुळे या संप काळात जास्त फटका कंत्राटी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना बसणार आहे.
दरम्यान सदर कंपनीतील दोन्ही कामगार संघटनेने प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेच्या झेंड्याखाली एकत्र आल्या असून या संपावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार नेत्यांचे मार्गदर्शन या कामगारांना मिळणार आहे, सद्या कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक स्तरावर पाच दिवस संपावर जाण्याची नोटीस दिली आहे, त्यानंतर कंपनीने काहीच निर्णय न घेतल्यास पुढची दिशा ठरविण्यात येईल असे एसीजीएल कंपनीच्या कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.