Ganesh Chaturthi 2023 Goa 
गोवा

टिळकांच्या आधीपासून गोव्यात साजरा होतोय सार्वजनिक गणेशोत्सव, 800 वर्षापूर्वीच्या 'पत्रीचा गणपती'ची कहाणी

गोमन्तक डिजिटल टीम

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण गोव्यातील काणकोण तालुक्यात पैंगीण गावच्या महालवाडा इथं टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, असे येथील प्रभुगावकर कुटुंबीय सांगतात.

प्रभुगावकर कुटुंबियांच्या पूर्वजांनी सुमारे 800 हूनही अधिक वर्षे आधीपासून पर्यावरणाचे महत्व जाणून या उत्सवाला सुरुवात केली होती, असे कुटुंबीय सांगतात.

कोणत्याही प्रकारच्या मूर्तीविना या काळात आजूबाजूच्या रानावनात, कुळागरात सापडणाऱ्या वनस्पतींच्या पानांना एकत्र करून, त्याची पुडी बांधून, प्राणप्रतिष्ठा करून बसविला जाणारा हा गणपती 'पत्रीचा गणपती' म्हणून ओळखला जातो.

आजतागायत या वाड्यातील सर्व 11 प्रभुगावकर कुटुंबांमध्ये संपूर्णतः पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी या वाड्यात गौरी आणि शंकराचे आगमन होते. सर्व कुटुंबातील सदस्य एकत्रित जबाबदारी घेऊन आवश्यक वनस्पती गोळा करतात. या कुटुंबाचे कुलदैवत असणाऱ्या नरसिंह परशुरामाचे मंदिर वाड्यात आहे. मंदिरात सगळे एकत्र जमतात.

सर्वानी आणलेल्या वनस्पतींची पाने गोळा करून अळूच्या पानावर या वनस्पतींची एक पुडी मंदिरात पुजण्यासाठी बांधतात, याला गौरी असे म्हणतात. त्यानंतर प्रत्येक कुटुंबासाठी पुड्या बांधल्या जातात.

मंदिरात गौरी व शंकराची प्राणप्रतिष्ठा करून आपापल्या घरी गौरी व शंकराची प्रतिष्ठापना करतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र अर्जुनाच्या पानावर 21 प्रकारच्या वनस्पती बांधून गणपतीची पुडी करतात.

मंदिरात पूजा करून आपापल्या घरांसाठी पुड्या बनवून आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. अनुक्रमे शंकर, गौरी आणि गणपती यांची चित्रे ठेवली जातात. शंकराच्या पुढे नारळ व गौरी गणपती पुढे या पुड्यांची स्थापना केली जाते.

पोर्तुगीज काळात बाटाबाटीच्या वेळी आपले देव बाटु नयेत म्हणून ही प्रथा सुरु केल्याचेही सांगितले जाते. हा पत्रीचा गणपती दीड दिवसांचा असतो. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी देखील सगळे प्रभुगावकर आधी मंदिरात एकत्र येतात.

मंदिराच्या विहिरीत गणपती विसर्जित करतात. विसर्जन करतात चित्रांवर केवळ पाणी शिंपडून ती तशीच ठेवली जातात आणि पुड्या विहिरीत टाकल्या जातात. प्रसाद घेऊन मग एकेक करून सगळेजण प्रत्येकाच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करतात. अशा प्रकारे वर्षानुवर्षे ही प्रथा सुरु आहे.

या वनस्पतींचा होतो वापर

मधुमालती, भृंगराज, म्हाका, बिल्वपत्र, श्वेतदुर्वापत्र, बदरीपत्र, धोत्रा, तुळशीपत्र, शमीपत्र, आघाडा, कव्हेर, बृहतीपत्र किंवा डोरली, रुई, अर्जुनपत्र, विष्णुक्रांत, डाळींब, देवदार, मरुबकपत्र, अश्वत्यत्र, जाई, केवडा, अगस्त, कणेर, सोनचाफा, अनंत, नागकेशर, पिवळा शंकर, पळस, आपटा, रुई, वड यासह इतरही वनस्पती पुडीत बांधल्या जातात. पुडी बांधण्यासाठीही केवणीचा दोर वापरला जातो.

अंगभूत कलांगुणांना मिळतो वाव

पुड्यांच्या मागे ठेवलेली चित्रे देखील कुटुंबातील सदस्य आपल्या हाताने रेखाटतात. यानिमित्ताने अंगभूत कलांना वाव मिळतो. पूर्वी घरातील कुणीतरी चित्र काढत असे. पण कालांतराने वेळेअभावी चित्रे बाहेरून आणली जाऊ लागली. मात्र अद्यापही काहीजण हातानेच ही चित्रे काढतात.

हवामानबदल, जागतिक तापमानवाढ, पावसाचा तुटवडा या सगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना आपल्या पूर्वजांनी सुरु केलेले उत्सव त्याच पद्धतीने साजरे केले तर निसर्गही पुन्हा आपल्यासोबत आनंदाने नांदू लागेल असेच जणू या प्रथा आपल्याला सांगत असतात.

- जयश्री देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT