Goa Drug Case Percentage Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case : राज्यात ड्रग्जची ६३३ प्रकरणे; साडेचार वर्षांतील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात गेल्या साडेचार वर्षांत (२०२० ते जून २०२४) पोलिसांनी ६३३ ड्रग्जची प्रकरणे नोंद केली असून ७४६ जणांना अटक केली आहे. यामध्ये ११६ नागरिक हे विदेशी आहेत, तर ६३० जण भारतीय आहेत.

या भारतीयांपैकी २११ जण हे गोव्यातील, तर ४१९ बिगर गोमंतकीय आहेत. या काळातील ८० टक्के प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर काहींचे तपासकाम सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला उत्तरादाखल दिली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय सुरू असला तरी ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांना कारवाई करणे शक्य झाले आहे. किरकोळ ड्रग्ज विक्री करणाऱ्या व्यक्तींना अटक करणे त्यांना शक्य झाले आहे. यापूर्वी हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातून हैद्राबाद येथे तस्करी करणाऱ्या काही गोमंतकीयांना अटक केली होती. त्यामुळे गोवा पोलिसांंकडून कारवाईत होत असलेल्या ढिलाईचा पर्दाफाश झाला होता.

ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या संशयितांविरुद्ध कारवाई होऊनही त्याच्या मुळापर्यंत जाऊन या साखळीमध्ये गुंतलेल्यांचा शोध घेणे शक्य झालेले नाही. या ड्रग्जच्या व्यवसायात माफियांची साखळी असली तरी ड्रग्ज विक्रेत्याला शेवटपर्यंत त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे माहीत नसते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक करण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणे कठीण होते अशी माहिती अंलीपदार्थविरोधी कक्षात काम केलेल्या एका माजी पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पर्यटन हंगामात मोठी विक्री

ड्रग्जप्रकरणे पोलिस स्थानक, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे नोंदवण्यात येत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री पर्यटन हंगामात होत असते. रोजगारानिमित्त गोव्यात आलेले बिगर गोमंतकीय अनेकदा रोजगार न मिळाल्याने या ड्रग्ज विक्री व्यवसायात झटपट पैसा मिळत असल्याने वळत आहेत.

विदेशी नागरिक हे गोव्यात व्हिला किंवा फ्लॅट घेऊन गांजा यासारख्या ड्रग्जची निर्मिती करत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी या विदेशी नागरिकांची माहिती मिळवून छापे टाकले आहेत व त्यांना अटक केली आहे.

गांजाची ५० प्रकरणे

गांजा अंमलीपदार्थ सहज गोव्यात उपलब्ध होत आहे. गांजा विक्री करताना पोलिसांकडून कारवाई झाल्यास त्यातून जामिनावर बाहेर येता येते. कमर्शियल प्रमाणात गांजा २० किलो व त्यापेक्षा अधिक सापडल्यासच जामीन मिळणे कठीण होते. इतर सिथेंटिक तसेच कोकेन, हेरॉईन, एलएसडी पेपर्स किंवा द्रव्य यासारख्या महागड्या ड्रग्जना ग्राहक मिळत नसल्याने गांजा या किंमतीच्या आवाक्यात असलेल्या ड्र्ग्जचा सर्रास वापर होतो. त्यामुळे पोलिसांनी गेल्या काही वर्षात नोंदवलेल्या ड्रग्जपैकी ५० हून अधिक प्रकरणे ही गांजाची आहेत.

विधानसभेत उत्तरादाखल दिलेली माहिती

२०२० साली १४० ड्रग्जची प्रकरणे नोंद झाली होती व अटक करण्यात आलेल्यांमध्ये ३६ विदेशी नागरिक, ८४ बिगर गोमंतकीय तसेच ५७ गोमंतकीयांचा समावेश होता.

२०२१ साली १२१ ड्रग्जची प्रकरणे नोंद झाली. त्यामध्ये २२ विदेशी नागरिक, ८७ देशी, तर २९ गोमंतकीय होते.

२०२२ मध्ये १५४ ड्रग्ज प्रकरणे नोंद झाली होती. त्यामध्ये २९ विदेशी, १०४ बिगर गोमंतकीय, तर ५६ गोमंतकीय होते.

२०२३ मध्ये १४० ड्रग्ज प्रकरणे दाखल झाली असून २१ विदेशी, ९८ बिगर गोमंतकीय, तर ४७ गोमंतकीय आहेत.

२०२४ मध्ये १५ जूनपर्यंत ७० ड्रग्ज प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यामध्ये ८ विदेशी, ४६ बिगर गोमंतकीय व २२ गोमंतकीयांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT