54th IFFI 2023: यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 54वा इफ्फी सुरू झाल्यापासूनच माझी नजर एका व्यक्तीला शोधत होती. दोन ते तीन दिवस उलटले तरी ती व्यक्ती काही केल्या मला दिसेना.
नंतर असंच कोणाशी तरी चर्चा करत असताना त्या व्यक्तीचा उल्लेख आला आणि ती अनंतात विलीन झाल्याचं समजलं. हे कळताच मला अत्यंत दु:ख झालं.
ती व्यक्ती म्हणजे मूळचे इंदूरचे ज्येष्ठ पत्रकार, लेखक ब्रिजभूषण चतुर्वेदी. ज्यांना सर्वजण बीबीसी म्हणून सुद्धा ओळखायचे. गेल्या वर्षीच्या इफ्फीमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली. त्याचं झालं असं की, प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांच्या पत्रकार परिषदेसाठी मी गेले होते. (54th IFFI 2023 Goa)
परिषदेत पत्रकार त्यांना प्रश्न विचारत असताना एक वयस्कर माणूस उभा राहून बोलायला सुरुवात करणार इतक्यात अनुपम खेर यांनी त्यांना थांबवून आपला मोबाईल बाहेर काढला आणि म्हणाले, ‘सर तुम्ही जे बोलताय ते मला माझ्या फोनमध्ये चित्रित करायचंय.’
अनुपम यांच्या या कृतीनंतर सर्वांच्या नजरा वळल्या त्या पहिल्या रांगेत हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या ब्रिजभूषण चतुर्वेदी यांच्याकडे.
चतुर्वेदी यांनी अनुपम खेर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि त्यांची तुलना बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांशी केली. त्यावेळी अनुपम खेर यांनी त्यांचे मनापासून आभार मानत त्यांचं हे वक्तव्य आपल्यासाठी सगळ्यात मोठं कौतुक असल्याचं सांगितलं.
तिथेच कळलं की, हा माणूस नक्कीच कोणीतरी ग्रेट आहे. त्यावेळीच पत्रकार परिषद संपल्यानंतर मी त्यांना गाठलं. त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्यांचा सुंदर आणि प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटासारखा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
गमतीची गोष्ट म्हणजे, त्यांना ‘मॅन ऑफ द फेस्टिवल’ म्हणून ओळखलं जायचं; कारण त्यांनी आतापर्यंत तब्बल 51 इफ्फी शिवाय इतर अनेक चित्रपट महोत्सवात भाग घेतला होता. (Brij Bhushan Chaturvedi-BBC)
त्यांची पार्श्वभूमीही इतरांपेक्षा जरा वेगळीच. लहान असताना ते पेपर विकायचे. नंतर त्यांनी बस कंडक्टर म्हणून काम केलं. पुढे अनेक वर्षे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं आणि सोबतच ते पत्रकार म्हणूनही कार्यरत होते.
सोळाव्या वर्षापासून ते हिंदी सिनेमांवर विविध वृत्तपत्रांमध्ये लिहायचे. आजवर सिनेसृष्टीतले हजारो चित्रपट त्यांनी पाहिले असून हा आपल्यातच एक विक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुलाखत घेण्याआधी त्यांच्याशी बोलता-बोलता मी सहज विचारलं, ‘आपको लोग बीबीसी क्यो बुलाते हैं?’ त्यावर ते छान हसून म्हणाले, ‘उसके पिछे बहुत बडी कहानी हैं बेटा|’ त्यावेळी त्यांनी अजरामर ‘रामायण’ मालिकेचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते रामानंद सागर यांच्यासोबतचा किस्सा सांगितला.
सिनेमांवरील चतुर्वेदी यांच्या लिखाणाचे कौतुक करत रामानंद सागर म्हणाले होते की, ‘चतुर्वेदी तुम बडे कमाल के इन्सान हो, बहुत अच्छा लिखते होते|’ त्यावेळी त्यांनी प्रेमाने ब्रिज-भूषण-चतुर्वेदी या नावातील तीन शब्दांवरून बीबीसी (BBC) हे टोपणनाव चतुर्वेदी यांना दिलं. राज कपूरसारखे दिग्गज अभिनेते आणि इतर कलाकारही त्यांना वैयक्तिक पातळीवर ओळखायचे आणि बीबीसी नावानेच संबोधायचे.
गोव्यात इफ्फी सुरू झाल्यापासून ते इथे यायचे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांसोबत बीबीसींची विशेष ओळख होती. दरवर्षी ते इफ्फीमध्ये आल्यानंतर पर्रीकर त्यांची आवर्जून भेट घ्यायचे.
‘बीबीसी तुमच्यासारखी माणसे गोव्यात आणि इफ्फीमध्ये नक्की यायलाच हवीत’, असं पर्रीकर त्यांना म्हणत असत. बीबीसी सांगत की, मनोहर पर्रीकर असेपर्यंतचा इफ्फीचा माहोल काही वेगळाच होता. ते गेल्यानंतर इफ्फीची शोभाच गेल्यासारखं वाटतं.
गेल्या वर्षीचा त्यांचा 51 वा आंतरराष्ट्रीय महोत्सव होता. आजवर महोत्सवातील चांगले वाईट-बदल त्यांनी बघितले. तीस वर्षांपूर्वी अनेक दिग्गज कलाकार इफ्फीत हजेरी लावायचे. मात्र बदलत्या काळानुसार कलाकार येण्याची संख्या आणि स्तर घटू लागला.
ते सांगत की, इफ्फीमध्ये प्रेक्षक जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्वाचे असतात ते कलाकार. त्यांच्या येण्याने महोत्सवाला चार चाँद लागतात.
त्यांच्या आजवरच्या चित्रपटांचा, महोत्सवांचा त्यांच्याकडे विशेष साठा आहे. त्यांनी यावर स्वतःचं पुस्तकंही प्रकाशित केलंय; ज्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेले आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि मोठमोठ्या कलाकारांसोबतचे त्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात.
चित्रपटाचा गाढा अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे आणि अनेक दिग्गज कलाकार त्यांना स्वतः थांबून हाक मारणारे असे बीबीसी यंदा दिसलेच नाहीत...
इफ्फी म्हटलं की माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्हाला वेगवेगळ्या विषयांवरील वृत्तांकन करायचं असतं. ते करता-करताच कुठेतरी बीबीसी दिसतील या आशेने मी रोज इफ्फीचा संपूर्ण परिसर फिरत होते.
याच दरम्यान माझी भेट झाली लखनौच्या ज्येष्ठ पत्रकार नम्रता शुक्ला यांच्याशी. त्यावेळी त्यांनी बीबीसींबाबत आपली ओळख असल्याचं आणि सोबतच ते आता या जगात नसल्याचं सांगितलं. बीबीसींबद्दल बोलताना कुठेतरी त्यांचेही डोळे पाणावले होते.
ब्रिजभूषण चतुर्वेदी यांचं यंदाच्या दिवाळीत वृद्धापकाळाने निधन झालं. हे वृत्त आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होतं. आजवर त्यांच्यासोबत काम केलं असून आमचे मागील 25 वर्षांपासून घरगुती नातेसंबंध आहेत. ते मला मुलीसारखं मानत. माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते लखनौला आले होते. इफ्फी त्यांच्या हृदयाजवळची गोष्ट. जोवर आपण जिवंत आहे तोवर इफ्फीमध्ये येत राहणार, असं ते म्हणायचे. ते आम्हा सर्वांसाठी आणि सध्याच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.नम्रता शुक्ला, ज्येष्ठ पत्रकार, लखनौ
गेल्या वर्षी त्यांच्यासोबत मुलाखत चित्रित केल्यानंतर, एक पत्रकार किंवा सिने-लेखक हे पद बाजूला ठेवून ते एक वडीलधारी व्यक्ती म्हणून माझ्याशी बोलले होते. मला आठवतंय, आजोबांप्रमाणे खांद्यावर हात ठेवून ते मला म्हणाले होते की, ‘बेटा तुम्हा तरुण मुलांना खूप उज्वल भविष्य आहे. तू असंच छान काम करत रहा. वेगवेगळ्या विषयांवर लिहित रहा, फिरत रहा.’ त्यावेळी ते मला एक आशेचा किरण देऊन गेले.
त्यानंतर इफ्फी संपेपर्यंत मी रोज त्यांना भेटायचे, बोलायचे; ते त्यांचे अनुभव मला सांगायचे आणि त्यातून मला एक वेगळीच ऊर्जा मिळायची. शेवटच्या दिवशी मला आवर्जून भेटून, माझा निरोप घेऊन ते इंदूरला परतले. ‘चलो बेटा, फिर अगले साल इसी जगह मिलते हैं|’ हे त्यांचं माझ्यासाठीचं शेवटचं वाक्य!
बीबीसींसारखी माणसं क्वचितच आपल्याला भेटतात, ज्यांचं कामही मोठं असतं आणि व्यक्तिमत्वही. पुढच्यावर्षीही असाच काठी टेकत मी इफ्फीला येणार हे सांगून गेलेले बीबीसी यंदाचा महोत्सव चुकल्यामुळे हळहळ व्यक्त करत असतील का? असा विचार मनात येऊन गेला अन् कधी डोळ्यांतून पाणी वाहू लागलं माझं मलाच कळलं नाही...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.