47th Konkani Drama Competition  Dainik Gomantak
गोवा

47th Konkani Drama Competition : 'ताची करामत' नाटक म्हणजे मनोरंजक अनुभूती; नाट्यप्रेमींचा उत्साह शिगेला

दैनिक गोमन्तक

47th Konkani Drama Competition : नाट्यप्रयोगांच्या वेळी अनपेक्षितपणे उद्‍भवणाऱ्या संकटांचा जुना इतिहास भारतीय रंगभूमीला आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात दिलेल्या पृथ्वीतलावरील पहिल्या नाट्यप्रयोगाच्या वृत्तांतातही त्याचे उदाहऱण सापडते. अशा संकटांवर धैर्याने मात करणाऱ्या नाट्यप्रेमींमुळेच नाट्यकला आजतागायत टिकून आहे.

४७व्या कोंकणी नाट्य स्पर्धेतील सहाव्या नाटकाचे परीक्षण करण्यासाठी येताना वाटेत एका परीक्षकाचा टायर पंक्चर झाला. मात्र साठ वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या मोजक्या दर्दी प्रेक्षकांनी आणि सादरकर्त्यांनी आपला उत्साह पंक्चर होऊ दिला नाही. साठ वर्षांत आणखी बारा-पंधरा मिनिटांची भर पडली तर काय बिघडले, असा आशावाद विघ्नहर्त्या गणरायाच्या प्रार्थनेच्यावेळी नाट्यगृहात भरलेला होता.

ओढाताणीचा गोड शेवट...

‘मावसो’ हे नाटकातील गोंधळ दूर करून समधानता साधणारे पात्र आहे. सामंती जीवनशैलीतून भांडवली संस्कृतीत प्रवेश करताना होणाऱ्या ओढाताणीचा गोड शेवट दाखवणाऱ्या या अभिजन कॉमेडीतील सूज्ञ पात्र पंधरा लाखांचे स्थळ सहा लाखात जुळवते.(दुर्मीळ लोकप्रियता मिळालेले साठ वर्षांपूर्वीचे नाटक रसिकांपर्यंत पुन्हा पोहोचविण्यासाठी कस्टम खात्याने पुढाकार घेतल्यास रंगभूमीची भरभराट होईल.) कला म्हणजे समाजमनाला पडलेली स्वप्ने असतात. तिथे स्थळकाळाचे भान हरपणे स्वाभाविक आहे.

पणजीतील एक अभिजन कुटुंब. ‘कस्टम’ ऑफिसर नवरा. त्याची कामचुकार बायको. घरातल्या कामांसाठी तीन-चार घरगडी. त्यामुळे कस्टम ऑफिसरचे दुःख दुहेरी. लग्न झाल्यापासून त्याला बायकोच्या हातचे अन्न मिळालेले नाही.

वर घरगड्यांच्या पगाराचा बोजा. असा दुःखीकष्टी कस्टम ऑफिसर, मडगावचा मोठा व्यापारी बाबू नायक याचा कस्टममध्ये अडकलेला माल सोडवतो. वर बाबू नायक कस्टम ऑफिसरच्या बायकोचा सोयरा निघतो. त्यामुळे बाबू नायकचा मेडिकलचे शिक्षण घेणारा निर्व्यसनी मुलगा आणि कस्टम आफिसरची कॉलेजमध्ये शिकणारी- वर्गात दुसऱ्या नंबरवरून नुकतीच पहिल्या नंबरवर आलेली- मुलगी यांची सोयरिक जुळणे तेवढे बाकी राहते.

त्यातली एकमेव अडचण म्हणजे पंधरा लाख वरदक्षिणेची- त्याशिवाय इतर खर्च- व्यापारी वरपित्याची मागणी. हा बाबू नायक प्रत्येक गोष्ट पै न् पै मध्ये मोजणारा. इतका की त्याच्या जीवलग मित्राचे आडनावच पै! कात्रीत सापडलेल्या कस्टम ऑफिसरला त्याचा जुना मित्र सापडतो.

मुंबईहून गोव्याला येणाऱ्या आपल्या ‘मावश्या’ची गोव्यात राहायची सोय शोधणारा मित्र, ‘मावसो’ पैसेवाला असल्याचे सांगून कस्टम ऑफिसरच्या गळ्यात घालतो. ‘मावसो’ पैसेवाला आहे या जाणिवेने सर्वच पात्रांचे वर्तन बदलते. शेवटी ‘मावसो’ कस्टम आफिसरला परवडेल अशा पाच-सहा लाख वरदक्षिणेत सोयरिक जुळवून देतो. अर्थातच, मावश्याने नाटक केल्याचेही उघड होते.

सध्या मनुष्य अनेक काळांमध्ये जगतो आहे, असे म्हणतात. त्याचे प्रतिबिंब प्रयोगामध्ये उत्तम उमटले होते. गेल्या २ वर्षांत प्रचलित झालेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या घरामध्ये दिसतात. मोबाईलदेखील आलेला आहे. बदललेली नाहीत ती माणसे. (‘यंदाही दगा दिला पुन्हा पावसाने, की ऋतूही वागू लागले माणसाप्रमाणे?’, असे कविवर्य विष्णू सूर्या वाघ यांनी म्हटले ते ‘ताची करामत’ लिहिले गेल्यानंतर सुमारे ५० वर्षांनी) त्या दृष्टीने न बदललेली माणसे या प्रयोगाच्या निमित्ताने गोवेकर नाट्यरसिकांना पाहायला मिळाली.

मात्र नाटक आहे बदलाचे. किंबहुना बदलावे किती आणि कसे याबद्दलचे. त्याची लोकप्रियता पाहता, त्यातील दृष्टिकोन बऱ्याच जणांना भावलेला असावा, असे गृहित धरता येते. शहरी जीवनात घरगड्यांना रोख पगार द्यावा लागतो. म्हणून ‘मावसो’ घरगडी कमी करून चुलीसह एकूण घर सांभाळण्याची जबाबदारी कस्टम आफिसरच्या बायकोला घ्यायला भाग पाडतो. लग्नातील देवाणघेवाण वस्तुरूपात करण्याची रूढ पद्धत टाळून रोखीमध्ये करण्याकडे जरा जास्तच कल असलेल्या वरपित्यालाही थोडा आवर घालतो.

योगायोगाने, ‘कम्युनिस्ट फेनिफेस्टो’ या पुस्तिकेला १७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी कोकणी नाट्यस्पर्धेत ‘ताची करामत’ या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग सादर केला. या पुस्तिकेत युरोपीय समाजाच्या संदर्भात पुढील शब्द आढळतात- “कुटुंबस्थेचे उच्चाटन! कम्युनिस्टांच्या या कुख्यात प्रस्तावावर जहालांचीसुद्धा माथी भडकतात.

सध्याची कुटुंबसंस्था- भांडवली कुटुंबसंस्था- कोणत्या पायावर उभी आहे? भांडवलाच्या पायावर. खासगी नफ्याच्या पायावर. असा परिवार- त्याच्या संपूर्ण विकसित रूपात- फक्त भांडवलदारांमध्येच अस्तित्वात असतो; परंतु या परिस्थितीची दुसरी बाजू म्हणजे मजुरांसाठी परिवाराचा अभाव आणि सार्वजनिक देहविक्रय.”

एखाद्या वृद्ध व्यक्तीने एके दिवशी लेटेस्ट फॅशनचे कपडे घातले तर पाहणाऱ्यांना अवघडल्यसारखे होते खरे, पण म्हणून वृद्धांचा वेशस्वातंत्र्याचा अधिकार काढून घेता येणार नाही, असे एका विचारवंताने म्हटले आहे.

नारायण आशा आनंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT