Mapusa News वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक प्रभू मोनीच्या म्हापसा येथील प्रभू चेंबर्समधील 40 ग्राहकांना (युनिट्सधारक) अखेर आज इमारतीचा ताबा मिळाला. जिल्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार बेलीफकडून आदेशाची अंमलबजावणी झाली. एकजुटीतून बिल्डरला शिकवलेला हा धडा आहे.
पणजीतील जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास जात, म्हापसा येथील प्रभू चेंबर्सच्या युनिटधारकांकडे या इमारतीचा ताबा देण्यात आला. आदेशाची बेलीफकडून अंमलबजावणी करण्यात आली.
पीडित ४० जणांनी वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश प्रभू मोनी यांच्याकडून व्यावसायिक इमारतीमधील कार्यालयीन युनिट्स आणि दुकाने खरेदी केली होती. २०१२मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून, आजतागायत बांधकाम व्यावसायिकाला युनिटधारकांना ताबा देण्याचा अपयश आले होते.
त्यानुसार, युनिटधारकांनी २०१९ मध्ये ‘रेरा’कडे धाव घेतली. यावेळी ‘रेरा’ने १७ मार्च २०२२ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या दोन स्वतंत्र आदेशांद्वारे प्रभू मोनी यांना ९ कोटी रुपयांची रक्कम व्याजासह भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले.
पूर्वपीठिका अशी...
१ बिल्डर थकबाकी भरण्यात अपयशी ठरल्यामुळे ‘रेरा’ने जमीन आणि महसूल थकबाकी अंतर्गत भरपाई व व्याज वसूल करण्यासाठी सदर प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते.
२ उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बिल्डर मोनीची सुकूर-पर्वरी येथील ३,४७५ चौरस मीटर क्षेत्रफळाची मालमत्ता मामलेदारांनी जप्त केली.
३तिसवाडीच्या मामलेदारांनी करंजाळे येथील मोनींच्या मालकीच्या ८ सदनिका जोडल्या आहेत. ज्यांचा युनिटधारकांची थकबाकी वसूल करण्यासाठी लवकरच लिलाव केला जाईल.
ग्राहक सदस्यांनी मानले आभार
युनिट्सचा ताबा मिळताच संबंधित ग्राहक सदस्यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश, बेलीफ, रेरा, उत्तर जिल्हाधिकारी, बार्देश, तिसवाडी मामलेदार, म्हापसा पोलिसांचे आभार मानले. कायदेशीर प्रक्रियेत सदर यंत्रणांचा पाठिंबा उपयुक्त ठरला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.