पणजी: बंगालविरुद्धच्या अनिर्णित लढतीत गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघासाठी पहिल्या डावातील २७ धावांची आघाडी लाखमोलाची ठरली. त्यामुळे त्यांना कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात अव्वल स्थान कायम राखत बाद फेरी गाठणे शक्य झाले.
कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ उपउपांत्यपूर्व की उपांत्यपूर्व फेरीत खेळणार हे १६ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या फेरीतील सामन्यांनंतर स्पष्ट होईल. त्यांनी अग्रस्थान राखल्यास ते थेट उपांत्यपूर्व फेरीस पात्र ठरतील. पर्वरी येथील गोवा विरुद्ध चंडीगड आणि उत्तर प्रदेशविरुद्ध बंगाल यांच्यातील सामन्याकडे लक्ष राहील. सध्या गोव्याचे सर्वाधिक २३, उत्तर प्रदेशचे १९, बंगालचे १५, चंडीगडचे १४, तर छत्तीसगडचे सहा गुण आहेत. आसामला सर्व सहाही लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. गोव्याने चार लढतींत तीन विजय व एक अनिर्णित अशी अपराजित कामगिरी साधली आहे.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) कल्याणी येथे झालेल्या चार दिवसीय अनिर्णित सामन्यातून गोव्याला तीन, तर बंगालला एक गुण मिळाला. बंगालने सामन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण गोमंतकीयांनी चिवट खेळ केल्यामुळे त्यांना लक्ष्य साध्य झाले नाही. गुरुवारी सकाळी बंगालने ४ बाद १८५ वरून झटपट क्रिकेटला साजेसा खेळ केला. त्यांनी १२ षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात धावसंख्येत आणखी ७० धावांची भर टाकत दुसरा डाव ९ बाद २५५ धावांवर घोषित करून गोव्यासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. दिवसातील एक षटक बाकी असताना सामना अनिर्णितावस्थेत संपला तेव्हा गोव्याने दुसऱ्या डावात ७५ षटकांत ६ बाद १२६ धावा केल्या.
पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतलेल्या गोव्यासमोर बंगालने दुसऱ्या डावात ७६ षटके फलंदाजीचे आव्हान दिले. खेळपट्टी चौथ्या डावात फलंदाजीस कठीणच होती. अशा परिस्थितीत गोव्याने ७५ षटके फलंदाजी करून बंगालला निर्णायक विजय मिळू दिला नाही. सलामीचा सार्थक भिके (३४) व कर्णधार यश कसवणकर (४३) यांची तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी फुटल्यानंतर अचानक घसरगुंडी उडाल्यामुळे गोव्याच्या ड्रेसिंग रुममध्ये खळबळ माजली. ९ धावांत ३ विकेट गमावल्यामुळे गोव्याची स्थिती ६ बाद ११३ अशी झाली आणि दिवसातील ९.५ षटकांचा खेळ बाकी होता.
आराध्य गोयल (५७ चेंडूंत ११ धावा) व साई नाईक (२७ चेंडूंत २ धावा) यांनी किल्ला लढवत यजमान संघ अनपेक्षित विजयाला गवसणी घालणार नाही याची खबरदारी घेतली. अखेरचे एक षटक बाकी असताना बंगालने अखेर अनिर्णित निकाल मान्य केला.
बंगाल, पहिला डाव ः ३२५
गोवा, पहिला डाव ः ३५२
बंगाल, दुसरा डाव (४ बाद १८५ वरुन) ः ४३ षटकांत ९ बाद २५५ (अभिप्राय बिश्वास ७२, आशुतोष कुमार १६, समर्थ राणे १२-०-६२-०, चिगुरुपती व्यंकट ९-०-५८-३, यश कसवणकर ६-०-३५-०, शिवेन बोरकर ९-०-५२-२, मिहीर कुडाळकर ७-०-४२-१).
गोवा, दुसरा डाव (२२९ धावांचे आव्हान) ः ७५ षटकांत ६ बाद १२६ (आदित्य कोटा १०, सार्थक भिके ३४, शंतनू नेवगी १, यश कसवणकर ४३, दिशांक मिस्कीन ५, आराध्य गोयल नाबाद ११, मिहीर कुडाळकर ४, साई नाईक नाबाद २, रोहितकुमार दास २-२३, रोहित २-३३).
गोव्यासाठी या लढतीत चिगुरुपती व्यंकट याचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. त्याने पहिल्या डावात ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, त्याला आराध्य गोयल (५४) व मिहीर कुडाळकर (५१) यांच्या अर्धशतकांची साथ लाभली, त्यामुळे गोव्याला ५ बाद १२९ वरुन पहिल्या डावात आघाडी संपादन करता आली. नव्या चेंडूने गोलंदाजी टाकणाऱ्या व्यंकटने दोन्ही डावांत मिळून १०९ धावांत ८ गडी (५-५१ व ३-५८) बाद केले.
‘‘संघाच्या जिंकण्याच्या सवयीमुळे बाद फेरी गाठणे सोपे वाटते. अफलातून कामगिरीमुळे खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी गोवा (Goa) क्रिकेट असोसिएशन आणि राज्यासाठी अभिमानास्पद योगदान दिले आहे. प्रशिक्षकाचे (रॉबिन डिसोझा) विशेष आभार.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.