पणजी: गोव्याने २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात गुरुवारी बिहारवर १७४ धावांनी मात केली. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने बीसीसीआय २०२६-२७ स्पर्धा मोसमात नोंदविलेला पहिला विजय ठरला.
चार दिवसीय सामना बिहारमधील राजगीर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. अखेरच्या दिवशी गुरुवारी सकाळी गोव्याने दुसऱ्या डावात ९ बाद २०१ धावांवर २०५ धावा करून पहिल्या डावातील ९१ धावांवर एकूण २९६ धावांची आघाडी संपादली. डावखुरा फलंदाज दिशांक मिस्कीन याने शतक पूर्ण करताना नाबाद १०१ धावा केल्या. त्याने २०४ धावांचा सामना करताना १२ चौकार व एक षटकार मारला. २०२६-२७ मोसमात गोव्यातर्फे नोंदविण्यात आलेले बीसीसीआय स्पर्धेतील हे पहिलेच शतक ठरले.
विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य असलेल्या बिहारचा दुसरा डाव गोव्याच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर १२२ धावांत संपुष्टात आला. डावखुरा फिरकी गोलंदाज अनुज यादवने ३७ धावांत ४ गडी बाद केले, तर वेगवानद्वयी राहुल विश्वकर्मा व विनायक कुंटे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना घरच्या मैदानावर २७ ऑक्टोबरपासून सांगे येथे ओडिशाविरुद्ध होईल.
एलिट क गटात आता तिसरा क्रमांक
बिहारविरुद्धच्या लढतीत गोव्याने एकूण १२ गुणांची कमाई केली. दोन लढतीनंतर त्यांचे आता १८ गुण झाले असून एलिट क गटात त्यांना आता तिसरा क्रमांक मिळाला आहे. या गटात मुंबईचे सर्वाधिक २७, बडोद्याचे २२ गुण आहेत. गोव्यानंतर ओडिशा (१६), बंगाल (१६), राजस्थान (११) बिहार (८) व हिमाचल प्रदेश (८) यांचा क्रम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.