पणजी: एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे सोमवारी सकाळी स्पॅनिश आंजेल बियादेरो यांनी स्वीकारली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पुढील लढतीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे पहिले सराव सत्र झाले.
गौरमांगी सिंग यांची जागा ५७ वर्षीय बियादेरो यांनी घेतली आहे. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बचावपटू गौरमांगी व एफसी गोवा यांनी सामंजस्याने करार संपुष्टात आणला. सध्या चार सामन्यानंतर एक विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह एफसी गोवाच्या खाती पाच गुण आहेत. त्यांचा पुढील सामना २१ रोजी गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल. सध्या त्यांचा कार्यकाळ २०२६-२७ मोसमअखेरपर्यंत असेल.
एफसी गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पुस्कुर यांनी बियादेरो यांच्या अनुभवावर विश्वास व्यक्त केला आहे. संघाला शिस्तबद्ध, स्पर्धात्मक आणि निकाल मिळवून देणारा संघ बनविण्याची त्यांची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. शमील चेंबकथ हे संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बियादेरो यांचे साहाय्यक प्रशिक्षक असतील.
सर्वोत्तम कामगिरीस प्राधान्य
संघातील प्रत्येक खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी घडवून आणण्यास आपले प्राधान्य असेल, असे बियादेरो यांनी सांगितले. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या क्षमतेचा योग्य वापर करणे तसेच आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर संघाला सक्षम बनविण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी नमूद केले.
‘‘संघाने चेंडूवरील नियंत्रण राखत आक्रमक, वर्चस्व गाजविणारा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा फुटबॉल खेळण्याची माझी इच्छा आहे. शिस्त आणि कामातील गुणवत्ता यांना मी महत्त्व देतो,’’ असे ते म्हणाले. स्पेनमधील सांतांदेर येथे जन्मलेल्या बियादेरो यांच्यापाशी स्पेन आणि मोरोक्कोमधील फुटबॉल क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ प्रशिक्षकपदाचा अनुभव असून, त्यांनी ७०० हून अधिक व्यावसायिक सामन्यांत विविध संघांना मार्गदर्शन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.