PSA Tour Level Professional Squash Tournament in Limoges France Tiltle Winner Akanksha Salunkhe
पणजी: गतवर्षी राज्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकलेली गोव्याच्या आकांक्षा साळुंखे हिने फ्रान्समधील लिमोज येथे झालेल्या पीएसए टूर पातळीवरील व्यावसायिक स्क्वॉश स्पर्धेत विजेतेपदास गवसणी घातली.
आकांशाने दुसऱ्या खुल्या फेमिनिन द कॉझेस स्पर्धेच्या अंतिम लढतीत मलेशियाच्या याश्मिता कुमार हिच्यावर ३-० (११-७, ११-६, ११-६) असा विजय नोंदविला. या स्पर्धेच्या महिला विभागात आकांक्षाला सहावे मानांकन होते. उपांत्य लढतीत तिने इजिप्तच्या मीना वालिद हिलाही ३-० फरकाने नमविले होते. या स्पर्धेपूर्वी आकांक्षा फ्रान्समधील लागॉ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक स्कॉश स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
भारताचा नावाजलेला आंतरराष्ट्रीय स्क्वॉश खेळाडू माजी राष्ट्रीय विजेता ऋत्विक भट्टाचार्य याच्यासमवेत आकांक्षा सराव करते. ऋत्विकने मुंबईजवळ कलोते येथे स्क्वॉश प्रशिक्षण सुविधांची निर्मिती केली आहे. आकांक्षाचे वडील हेमंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजलिस येथे २०२८ साली होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा सहभागासाठी आकांक्षा प्रयत्नशील आहे. परदेशी स्पर्धांतील सहभागासाठी तिला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून भारत सरकारचे सहकार्य लाभत आहे. ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट योजनेतही तिचा समावेश झाला आहे.
फ्रान्समधील एका स्पर्धेत विजेतेपद, तसेच अन्य स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी यामुळे आकांक्षाचे जागतिक महिलांतील मानांकनही उंचावले आहे. ती आता ७४व्या क्रमांकावरून ६९ स्थानी आली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांत तिचा सहभाग असेल. १२ नोव्हेंबरपासून ती मलेशियातील ब्राँझ पातळीवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळेल. नंतर ९ डिसेंबरपासून हाँगकाँग येथे होणाऱ्या जागतिक सांघिक स्क्वॉश स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. मुंबईत होणाऱ्या ७९व्या सीसीआय पश्चिम भारत स्पर्धेतही तिचा सहभाग असेल. या स्पर्धानंतर आकांक्षा पुन्हा न्यूयॉर्कला परतेल, तिथे ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळेल, तसेच सरावातही भाग घेईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.