तेनसिंग रोद्गीगिश
यल्लम्मा पंथातून निर्माण झालेल्या सर्वांत ठोस आणि दृश्य स्वरूपातील वैशिष्ट्यम्हणजे तृतीयपंथी होय. ब्रॅडफर्ड यांच्या मताप्रमाणे, ‘खरंच, एखाद्या व्यक्तीचे लिंग बदलण्याची शक्ती व प्रवृत्ती यल्लम्माच्या सामर्थ्याचा आणि स्वभावाचा एक भाग मानली जाते: गंडा होगी हेन्ना माडताताळा, हेन्ना होगी गंडा माडताताळा(पुरुष म्हणून जा, ती तुला स्त्री करेल; स्त्री म्हणून जा, ती तुला पुरुष करेल).’ (संदर्भ : ब्रॅडफर्ड, १९८३ : ट्रान्सजेंडरिझम अँड द कल्ट ऑफ यल्लम्मा, इन जर्नल ऑफ अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च, ३१०).
यल्लम्मास भजणाऱ्यांत तृतीयपंथी असणे हे दख्खनातील क्षत्रिय समुदायाच्या सामूहिक स्मरणात कोरलेल्या त्या भीषण ऐतिहासिक घटनेशी निगडित असावे, ज्यातून धार्मिक लैंगिकतेचे अर्थशास्त्र उदयास आले. परंतु या संदर्भात हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्या संहाराचे बळी फक्त क्षत्रिय नव्हते; ब्राह्मणांच्या ‘खालील’ सर्व समाजघटकांवर त्याचा खोल परिणाम झाला.
तथापि, ‘खालील’ हा शब्द येथे तसा लागू होत नाही, कारण त्या काळात दख्खनमध्ये चतुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात नव्हती. कदाचित इ.स.पूर्व दुसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याही पुढे ती अस्तित्वात नसावी.
फुलर यांच्या मते, इ.स.पूर्व १९००च्या सुमारास क्षत्रियांनी आणलेल्या गहू व बार्लीचे (जवाचे) काही पुरावे दख्खनमध्ये सापडतात; मात्र इ.स.पूर्व १६०० ते ७०० या कालखंडातील इनामगाव उत्खननांत गहू व बार्लीचा ठसा दिसत नाही. यावरून ब्राह्मणांचा आगमनकाल त्यानंतरचा असल्याचे सूचित होते. खरे तर परशुरामाच्या ‘गनिमी काव्या’मुळेच ब्राह्मण व त्यांची चातुर्वण्य व्यवस्था दख्खनमध्ये प्रवेश करू शकली, असे म्हणणे उचित ठरेल.
‘वडुकर’ हा बहुधा एक तुलनेने एकसंध समुदाय होता, जो सुमारे इ.स.पूर्व ३००० मध्ये स्थानिक भारतीय व क्षत्रिय वंशांच्या संमिश्रणातून निर्माण झाला असावा. रेणुका ही या सर्वत्र पसरलेल्या वडुकर समुदायातील स्त्री होती.
या वडुकरांत दोन उपसमुदाय असावेत, ज्यांच्यातील क्षत्रियांचे प्रमाण वेगवेगळे असले तरी सामाजिक स्थानावर त्याचा विशेष परिणाम नव्हता. दख्खनच्या इतिहासातील त्या काळोख्या कालखंडात त्यांनी भोगलेल्या आघाताच्या बाबतीत मात्र हा फरक महत्त्वाचा नव्हता.
रेणुका आणि इतर दख्खनी स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचा जो नाश अनुभवला, त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करताना दोन प्रकारच्या वैधव्यातील फरक ओळखावा लागतो. पहिली घटना म्हणजे कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली. दुसरी घटना म्हणजे परशुरामाने क्षत्रिय पुरुषांचा केलेला संहार केल्यामुळे असंख्य क्षत्रिय स्त्रिया विधवा झाल्या.
महाभारतात याचा उल्लेख असा आहे :
‘... त्या वेळी जेव्हा पृथ्वी क्षत्रियांविना झाली, तेव्हा क्षत्रिय स्त्रिया संततीच्या इच्छेने ब्राह्मणांकडे जात असत, आणि ब्राह्मणांनी आपल्या कठोर व्रतांचे पालन करत त्यांच्याशी संबंध ठेवले ... .’ (संदर्भ : महाभारत, पुस्तक १ : आदिपर्व : आदिवंशावतरण पर्व : अध्याय ६४)
‘रांडे हुणीमे’ (विधवोत्सव) या समारंभात नेमकी कोणत्या वैधव्याची स्मृती जिवंत ठेवली जाते? वरवर पाहता ती रेणुकेच्या पतीवियोगाची आहे, परंतु दख्खनातील स्त्रियांच्या सामूहिक स्मरणात टिकून राहिलेला वैधव्याचा आघात कदाचित त्या दुसऱ्या संहाराशी अधिक संबंधित आहे.
लहान मुले - मुलगे आणि मुली दोघेही - देवीला (यल्लम्माला) अर्पण केली जात. हे अर्पण दोन कारणांसाठी होत असे : एकतर तिच्या कोपापासून (राग किंवा अप्रसन्नतेपासून) वाचण्यासाठी, किंवा त्या रागापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी.
देवीचा राग हा त्या कुटुंबाने तिला तुच्छ मानल्याने किंवा विसरल्याने उत्पन्न होतो, असे मानले जाई. देवी व तिच्या लोकांमध्ये एक अतिशय दृढ नाते आहे, आणि ते सतत जपले पाहिजे. इतके प्रखर नाते निर्माण होण्यामागे कोणता ऐतिहासिक आधार आहे हे समजणे कठीण आहे; पण कदाचित त्याची मुळे त्या काळातीलच आघातात आहेत - जेव्हा रेणुका, आता यल्लम्मा - आपल्या लोकांच्या बाजूने उभी राहिली होती.
मुले ज्यांना ‘जोगप्पा’ म्हणतात, हे रेणुकेच्या तीन मोठ्या पुत्रांचे वंशज मानले जातात - ज्यांनी आपल्या आईशी निष्ठा राखून तिचा शिरच्छेद करण्यास नकार दिला व पित्याचा शाप घेणे पसंत केले. (संदर्भ : रॅमबर्ग, २०१६ : बॅकवर्ड फ्यूचर्स अँड पास्ट्स फॉरवर्ड - क्विअर टाइम, सेक्सुअल पॉलिटिक्स, अँड दलित रेलिजिऑसिटी इन साउथ इंडिया, एलजीक्यू : अ जर्नल ऑफ लेस्बियन अँड गे स्टडीज, २२.२, २३४). दीक्षा घेताना हे जोगप्पा रेणुकेच्या पतीशी, जमदग्नीशी लग्न करतात.
ते जोग (भिक्षा मागणे), गायन व नृत्य करून उपजीविका करतात आणि येलम्माच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. पुरुष म्हणून ते जेव्हा स्त्रीरूप धारण करतात, तेव्हा त्यांचे वस्त्र पांढऱ्या धोत्यापासून रंगीबेरंगी साडीत रूपांतरित होते; नावेही स्त्रीनावे बनतात.
ते केस लांब वाढवून वेणी किंवा अंबाडा बांधतात आणि गावोगावी फिरून लोकांना यल्लम्मा देवीचे दर्शन घडवतात.
ब्रॅडफर्ड यांच्या मते, बहुतेक जोगप्पा लैंगिकदृष्ट्या ‘असामान्य’ दिसतात; परंतु हिजड्यांप्रमाणे त्यांच्यात विधीपूर्वक जननेंद्रिय काढून टाकण्याचा पुरावा नाही. ही निवड नैसर्गिकरीत्या घडते, कारण पुरुषत्वातील कमकुवतपणा हेच देवीच्या कोपाचे लक्षण मानले जाते.
ब्रॅडफर्ड म्हणतात त्याप्रमाणे, ‘हे रूपांतरित पुरुष - जे स्त्रिया झाले आहेत; किंवा अधिक नेमके सांगायचे तर, सामान्य पुरुष जे पवित्र स्त्री-पुरुष बनले आहेत.’ (संदर्भ : ब्रॅडफर्ड, १९८३ : ट्रान्सजेंडरिझम अँड द कल्ट ऑफ यल्लम्मा, इन जर्नल ऑफ अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च, ३११).
यल्लम्मा देवीला अर्पण झालेल्या मुली ‘जोगम्मा’ किंवा ‘जोगती’ (कधी कधी देवदासी म्हणूनही ओळखल्या जातात) बनतात. त्या देवीच्या पत्नी मानल्या जातात आणि यल्लम्मा देवीच्या सेवेसाठी स्वत:स वाहून घेतात.
यल्लम्मा देवी त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारते. देवीच्या पत्नी म्हणून त्या ज्या गावात वा शहरात राहतात, तेथे तिचे साक्षात अस्तित्व घेऊन जातात आणि भक्तांना तिच्या नावाने आशीर्वाद देतात. जोगम्मा एखाद्या यल्लम्मा भक्ताच्या घरी आली असताना, त्या भक्ताने तिला काही अर्पण न केल्यास किंवा विधीच्या वेळी तिची पूजाअर्चा न केल्यास, देवीच्या कोप होऊ शकतो. या धार्मिक समजुतीमुळे जोगती आपल्या जातीय स्थानाच्या पलीकडे उभ्या राहतात, आणि समाजाकडून मिळणाऱ्या अपमानापेक्षा उच्च स्थान प्राप्त करतात. यल्लम्मा देवीचे भक्त कोणत्याही जातीचे असोत - अगदी ब्राह्मणसुद्धा - देवीची कृपा मिळवण्यासाठी त्यांना जोगम्माची आवश्यकता असते.
यल्लम्मा पंथ त्यामुळे केवळ एका प्राचीन आघातातून मुक्ती मिळवण्याचे साधन नाही; तर त्या आघातावर उपचारक साधन आहे, ज्याद्वारे वर्तमान आणि भविष्य त्या वेदनेपासून सुरक्षित राखले जाऊ शकते. त्यांचे जोगप्पा, जोगम्मा होणे अशा अनेक प्रयत्नांपैकी एक असावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.