मिलिंद म्हाडगुत
विजय हजारे चषक एक दिवसीय स्पर्धा म्हणजे देशातील एक महत्त्वाची आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सामील होत असतात. यंदा या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, शुभम गिल, ऋतुराज गायकवाड सारखे अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट खेळाडू सामील झाले होते.
या स्पर्धेत चार विभाग केले जातात. प्रत्येक विभागात आठ राज्यांचा समावेश असतो. प्रत्येक विभागातले पहिले दोन संघ उपांत्यपूर्व म्हणजे ‘नॉक आउट’ फेरीत पोहोचत असतात. या स्पर्धेत यंदा गोव्याचा समावेश एलीट ‘क’ गटात केला गेला होता.
या गटात गोव्याचा सामना मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, सिक्कीम व पंजाब या संघाशी होता. पण गोव्याचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्यामुळे त्यांना पुढची फेरी गाठता आली नाही.
वास्तविक छत्तीसगड, हिमाचल प्रदेश व सिक्कीम यांच्या बरोबरचे पहिले तीन सामने जिंकून गोव्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. त्यांचा क्रमांकही तीनकडे पोहोचला होता. आणखी दोन सामने जिंकले असते तर गोवा उपांत्यपूर्व फेरीत आरामात पोहोचू शकला असता.
पण नंतरचे चार सामने सलगपणे हरल्यामुळे गोव्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राविरुद्धची हार तर जास्त बोचरी होती. शेवटच्या षटकात विजयासाठी हव्या असलेल्या सहा धावासुद्धा गोव्याच्या शेवटच्या दोन फलंदाजांना नोंदविता आल्या नाहीत. आणि हे शेवटचे षटक निर्धाव गेल्यामुळे गोव्याच्या खेळाडूंची मानसिकताही अधोरेखित झाली. हातात असलेला सामना यामुळे निसटला.
या स्पर्धेत गोव्याची परवड होण्याचे मुख्य कारण म्हणजे गोलंदाजांची दिशाहीन गोलंदाजी. उत्तराखंड व मुंबईबरोबरच्या सामन्यात याचा जास्त प्रत्यय आला. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पुत्र अर्जुनची गोलंदाजी तर भरपूर महागडी ठरली.
सहा सामने खेळलेल्या अर्जुनला भरपूर धावा देऊन फक्त एकच बळी मिळवता आला आणि तोही महाराष्ट्राविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात. त्याला फलंदाजी करता ओपनिंगला पाठवण्याचा प्रयत्नही अंगलट आला.
तिथेही अर्जुन विशेष कामगिरी करू शकला नाही. सुयश प्रभू देसाई, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ, ललित यादव, वासुकी कौशिक, कप्तान दीपराज गावकर यांनी स्पर्धेत बऱ्यापैकी कामगिरी केली असली तरी त्यात सातत्य नसल्यामुळे त्याचा संघाला म्हणावा तेवढा फायदा होऊ शकला नाही. तीन सामने सलग जिंकल्यावर उत्तराखंड विरुद्धची अनपेक्षित हार गोव्याला मागच्या बाकावर बसवून गेली.
या एक दिवसीय स्पर्धेआधी ‘सय्यद मुस्ताक अली ट्वेंटी-ट्वेंटी’ स्पर्धेतही गोव्याची अशीच हालत झाली होती. तिथेही चांगली सुरुवात करून नंतर गोवा पिछाडीवर पडला होता. सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतही गोवा मागे पडत चालल्याचे दिसत आहे.
जीसीएने याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. त्या दृष्टीने काही कडक पावले उचलावी लागतील यात शंकाच नाही. पूर्वी शादाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर सारखे खेळाडू गोवा संघात असताना संघाला जो दर्जा होता तो परत प्राप्त करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पाहुण्या खेळाडूंची निवडही काळजीपूर्वक व्हायला हवी.
काही का असेना, पण सध्या सुरू असलेली गोव्याच्या अपयशाची मालिका खंडित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता जीसीएने युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवे. एखाद्या सामन्यात हरणे, अपयश याचे फारसे काही वाटत नाही.
यश, अपयश यावरूनच दर्जा ठरत नाही, हेही खरे. पण, चुका सुधारण्यासाठी प्रयत्नच न करणे पटत नाही. यश मिळवण्यासाठी आवश्यक बदल करावेच लागतील. अन्यथा विजय हजारे स्पर्धेसारखेच मागच्या कितीतरी क्रिकेट स्पर्धांत अपयश मिळाल्यामुळे गोव्याच्या पुरुष क्रिकेट संघावर जो अपयशी संघाचा शिक्का बसला आहे तो पुढेही कायम राहील हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.