Psychological Reactance Theory Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Psychological Reactance Theory: मुलं सांगितलेल्या गोष्टींच्या उलटच का वागतात? पालकांनी समजून घ्यावा मानसशास्त्रातील 'हा' सिद्धांत

Child Development: व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर बंधने येत असल्याची जाणीव झाल्यावर ही मुलं आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या सूचनांना विरोध.

गोमंतक ऑनलाईन टीम

सुलक्षा गावस

व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर बंधने येत असल्याची जाणीव झाल्यावर ही मुलं आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या सूचनांना विरोध. पालकांचा हेतू मुलांचे हित त्यांना दाखवून  देण्याचा असतो, मात्र आदेशात्मक सूर विरोध भावनेला दुजोरा देतो. मुलांशी अशावेळी बोलताना त्यांच्या आत्मसन्मानाला, भावनांना ठेच लागणार नाही याची थोडी काळजी घेतली तर सुसंवाद साधता येतो.

आम्ही त्याच्या भल्यासाठी सांगतो, पण त्याला मात्र सतत असे वाटते की आम्ही त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ पाहत आहोत. आम्ही जे सांगतो, त्याच्या अगदी उलट त्याला करावेसे वाटते. यातूनच आमच्यात वारंवार वाद होतात.’ किशोरवयीन मुलांच्या पालकांच्या तोंडून असे संवाद अनेकदा ऐकायला मिळतात. पालकांच्या दृष्टीने त्यांच्या सूचना या काळजीपोटी आणि मुलांच्या हितासाठी असतात. मात्र, किशोरवयीन मुलांना त्याच सूचना अनेकदा बंधने वाटतात. आपल्याला पुरेसे स्वातंत्र्य दिले जात नाही, आपली बाजू समजून घेतली जात नाही अशी  भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते.

परिणामी, पालकांच्या सूचनांचा विचार करण्याऐवजी त्यांना विरोध करणे, अगदी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींच्या उलट वागणे, तावातावाने आपली बाजू कशी योग्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न करणे  ह्यातून मुलं आपली निर्णय क्षमता चाचपडून पाहू लागतात. अशा वेळी पालकांना मुलांच्या वागण्यात हट्टीपणा दिसतो, तर मुलांना पालकांच्या वागण्यात नियंत्रण ठेवण्याची वृत्ती जाणवू लागते. एकमेकांना समजून घेण्याऐवजी वागण्याचा आपापल्या  परीने अर्थ  लावला जातो आणि त्यातून गैरसमज बळावून संघर्ष निर्माण होतो. मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि वेगळेच शीत युद्ध जन्म घेते.

एखादी गोष्ट आपल्यासाठी निषिद्ध ठरवली की, आपण आपले व्यक्तिस्वातंत्र्य जपण्यासाठी आटापिटा करतो. अस्वस्थ होतो. आपल्या निर्णय क्षमतेवर समोरची व्यक्ती विश्वास ठेवत नाही,आपल्याला समजून घेतले जात नाही,मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही हे विचार आपल्याला अस्वस्थ करतात. विशेषतः किशोरवयात, जेव्हा स्वतःची ओळख घडवण्याची आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची इच्छा अधिक तीव्र होत असते, तेव्हा बंधनांचा अनुभव या निषिद्ध गोष्टी करण्याच्या आकर्षणाला आणखी बळ देऊ शकते.

हा गुंता समजून घेण्यासाठी जॅक ब्रेहम यांच्या  Psychological Reactance Theory  अर्थात मानसशास्त्रीय प्रतिक्रियात्मकतेच्या सिद्धांताची मदत घेता येईल. या सिद्धांतातून विरोध करण्यामागची मानसिक प्रक्रिया अधिक स्पष्ट होते.जेव्हा दुसऱ्यांनी दिलेले सल्ले, उपदेश किंवा सूचना आपल्या स्वातंत्र्यावर बंधन आणत आहेत, असे आपल्याला वाटते, तेव्हा आपली स्वायत्तता आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार जपण्याची गरज अधिक तीव्र होते. आपल्या निवडीचे स्वातंत्र्य हिरावले जात असल्याची भावना निर्माण झाली की, आपण त्या सल्ल्याला किंवा सूचनेला विरोध करू लागतो.याचाच अर्थ अनेकदा आपला विरोध हा सल्ल्याच्या आशयाला नसून, तो आपल्यावर लादला जात असल्याच्या भावनेला असतो. 

हाच मुद्धा आपण समजून घेतला तर या वादावर तोडगा निघू शकतो. प्रत्येकाला आपले व्यक्तिस्वातंत्र्य प्रिय असते. त्यातूनच माणसाचा आत्मविश्वास आकार घेऊ लागतो. अगदी नुकतेच चालू लागलेल्या  बाळाला सुद्धा आपण हात सोडून एकटे चालण्याचा मोह होतो. अगदी ते पडले धडपडले तरी. त्यांना सांभाळणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींना बाळाला लागेल ही काळजी असते. बाळ मात्र आपल्या दुडूदुडू  धावणाऱ्या पावलांची मजा घेण्यास आसुसलेले असते. त्याला उचलून घेतल्यावर ते विरोध दर्शवते. तिथे पालकांना दुखावणे हा हेतू नसतो. मला मोकळे सोडा, माझ्या मनीचे करू द्या, हा निरागस अट्टहास असतो. इथे जसे, थोडे त्याच्या कलाने घेऊन, थोडे ठामपणे सांगून त्या बाळाला समजावतो  तसेच पुढे मोठेपणी त्यांच्या भावनिक जगाला ठेच न लागता त्यांना समजावता आले तर हा तिढा सुटू शकतो. 

मुलांच्या  खाण्यापिण्याच्या सवयी, आभासी जगात रममाण होणे असो अभ्यासाच्या सवयी किंवा वागण्या बोलण्यातील आपल्याला दिसत असलेल्या त्रुटी याबद्दल पालकांनी वारंवार सूचना केल्या, निर्बंध लादले ‘बस अभ्यासाला’, ‘ ठेव तो मोबाईल बाजूला’.‘रोज बाहेरचे मागवून खायची गरज नाही’ अशा थेट आज्ञा दिल्या तर  मुलं अनेकदा ऐकत नाहीत. उलट या सूचनांनी  त्यांचा अहं दुखावला जातो आणि ती आपल्या मर्जी प्रमाणेच वागणार  हे पालुपद ती मुलं मनोमन जपतात. मुलांची वर्तणूक,त्यांचा स्वभाव अनेकदा आपल्याला खटकतो. त्यांनी एखादी  गोष्ट न केलेलीच  बरी असे वाटल्यावर ‘नाही,नको’ असे आपण सांगत राहतो आणि त्यांना मात्र ‘का नको’? याचे उत्तर हवे असते. लादलेल्या निर्णयाने त्यांची चिडचीड  होते आणि मुलं ऐकत नाही म्हणून आपला त्रागा होतो.

व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर बंधने येत असल्याची जाणीव झाल्यावर ही मुलं आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या सूचनांना विरोध .पालकांचा हेतू मुलांचे हित त्यांना दाखवून  देण्याचा असतो, मात्र आदेशात्मक सूर विरोध भावनेला दुजोरा देतो. मुलांशी  अशावेळी  बोलताना त्यांच्या आत्मसन्मानाला, भावनांना ठेच लागणार नाही याची थोडी काळजी घेतली तर सुसंवाद साधता येतो. परिस्थितीचे विविध पैलू आणि उपलब्ध पर्याय त्यांच्यासमोर ठेवून निवड करण्याची संधी देणे हे जास्त परिणामकारक ठरते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतले कि त्यांच्या विरोधभावनेला जागाच उरणार नाही.‘रोज खातोस  बाहेरून  मागवून  याने  अपाय नाही का होणार? कर बघू तुझा तू विचार? हा संवाद कुठे तरी सुरू व्हायला हवा.

एका दिवसात लगेचच फरक जाणवणार नाही मात्र परस्परांना समजून घेण्याची प्रक्रिया मात्र सुरु होते. यातून कालांतराने बदल जाणवू लागेल. मुलांनाही  विचार करणारे एक हळवे मन आहे ह्याचा विसर पडू  देऊ नये. तावातावाने बोलणारी मुलं समुपदेशनात आपल्या पालकांच्या विचारांनी हळवी होताना समुपदेशनात मी पहिली आहेत. बाळ आम्ही  तुझ्या हिताचाच विचार करतो हे सांगतानाच सूर आणि त्यामागच्या भावना नीट मांडता आल्या तर मुलांची मनं जिंकण सोपं होऊ शकतं.  मुलांबरोबरच्या  संवादाचे मर्म  जाणले आणि थोडा संयम ठेवला तर वादविवाद टाळले  जाऊ शकतात. मुलांना घडवण्यापेक्षा त्यांचे मायेने केलेले संगोपन त्यांना योग्य दिशा देऊ शकते.

‘अमुक गोष्ट कर अथवा करू नको’ ह्या थेट सूचना करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीवर चर्चा आणि त्यातून पर्याय, मुलांना  विश्वसात  घेऊन त्यांच्यासमोर  ठेवले जाऊ शकतात. मुलांनी  आपल्या सूचनांचे पालन करावे असा आग्रह धरण्यापेक्षा त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य, त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले तर एकमेकांप्रती  आदर भावना निश्चित  निर्माण होईल त्याचबरोबर मुलांवर समजूतदारपणाचे संस्कार होतील. मुलांना स्वेच्छेने निर्णय घेतल्याचा आनंदही मिळेल.  नियंत्रणाच्या आडकाठीने मुलांवर निर्णय लादण्यापेक्षा  त्यांना योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून  स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देऊया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naman Dhir Success Story: क्रिकेट सोडून कॅनडात नोकरीचा प्लॅन, पण वडिलांच्या सल्ल्यानं पालटलं आयुष्य, 'MI'कडून मिळालेल्या संधीचं केलं सोनं; 'नमन धीर'ची संघर्ष कहाणी

8th Pay Commission: मुंबईतील बैठकीत 'बेसिक पे' आणि 'फिटमेंट फॅक्टर'वर महाचर्चा, वेतन आयोगासमोर युनियन्सचा मास्टरस्ट्रोक; वार्षिक पगारवाढ 6 टक्के करण्याची मागणी

France Protests 2026: स्वातंत्र्य, समतेची भूमी असंतोषाने पेटली! महागाई अन् बेरोजगारीचा फ्रान्समध्ये उद्रेक; मॅक्रोन सरकार हवालदिल

Pension Rules: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांत मोठा बदल; नव्या SOP मुळे कागदपत्रांचा त्रास संपणार

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वाढली! महागाई भत्ता वाढीची घोषणा रखडली; आता 28 ऑक्टोबरच्या कॅबिनेट बैठकीकडे लक्ष

SCROLL FOR NEXT