अॅड. सूरज मळीक
निसर्ग म्हणजे आनंद आणि उत्साह. माणसाच्या तनामनाला प्रसन्न करण्याचे विलक्षण सामर्थ्य निसर्गातच असते. फुलांचे आणि माणसाचे नाते हे सनातन आहे. फुलांचे सौंदर्य आणि त्यांच्या हार गजऱ्यांचे महत्त्व वैदिक कालखंडापासून मानवाच्या लक्षात आलेले आहे.
पहिल्यांदा फुलांचे कान पिळले जातात आणि त्यानंतरच त्यांना एका धाग्यात गुंतले जाते. सुरंगीच्या फुलांसंदर्भात रुजू झालेली अशी व्याख्या आपल्याला गोव्यातील लोकमानसाचा या फुलांशी असलेल्या परस्पर आणि अतूट संबंधाची जाणीव करून देते.
डिचोली तालुक्यातील सर्वण हा गाव कधीकाळी सुरंगीच्या वनामुळे ख्यात होता. आजही गोव्यामध्ये सुरंगीच्या झाडांची लक्षणीय संख्या या गावामध्ये आढळते. त्यामुळेच या गावाला ‘सुरंगीचे वन’ किंवा ‘सर्व वन’ यावरून सर्वण असे नाव मिळाले असेल.
या गावात देवराईची संकल्पना असून येथील सातेरीच्या राई जवळील सड्यावर विशेषत: सुरंगीची झाडे आहेत. या कातळ सड्यावर एकाच ठिकाणी हुरो, काजरो, घोटींग, बकुळ, फणस, उक्षी, भेरली माड यांसारखी झाडे असून त्यांच्या गर्द छायेत मध्यभागी वारुळे आहेत. निसर्गातील अशी रचना कधीकाळी येथे अस्तित्वात असलेल्या जंगल क्षेत्राची ओळख करून देते.
ग्रीष्म ऋतूतील तळपणारा सूर्यसुद्धा किती आनंददायी असू शकतो हे सुरंगीच्या पिवळ्या पांढऱ्या फुलांकडे पाहिल्यावर लक्षात येते. दरवर्षी अगदी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सुरंगीला बहर येतो. सुरंगीच्या नाजूक फुलांचे नयनरम्य दृश्य आणि त्यांचा अतिशय विलक्षण सुगंध तनामनाला इतका मोहतो की सूर्याच्या प्रखर किरणांचा आभाससुद्धा अत्यल्प होतो. आज सर्वण गावातील सड्यावर आणि रस्त्याच्या बाजूला असलेली सुरंगीची झाडे गावात प्रवेश करणाऱ्या माणसांच्या स्वागतासाठी बहरलेली आहेत.
सुरंगी एक प्रदेशनिष्ठ वृक्ष असून ते फक्त पश्चिम घाटातील जंगलातच आढळतो. गोव्यातील काही मोजक्याच गावांत सुरंगीची झाडे पाहायला मिळतात. पूर्वी सुरंगीच्या फुलांना बरीच मागणी होती. वर्षाच्या प्रारंभीच्या तीन महिन्यात या गावातील लोक सुरंगीच्या फुलांची विक्री करत होते. त्यामुळे उन्हाळ्यात या गावाला आर्थिक दृष्टीने भरपूर लाभ व्हायचा.
गावातील महिला, पुरुष आणि लहान मुलेसुद्धा रोज सकाळी झाडावर चढून उमललेले कळे काढायचे व ते बाजारात नेऊन विकायचे. माणूस निसर्गाशी एकरूप झाल्याने फुले गुंफण्याची विशेष पद्धत त्यांनी अवलंबली. फुलांचे देठ काढून त्यांचे कान म्हणजेच निदलपुंज पिळले जातात. असे करून दोन्ही निदलपुंज एकत्र केल्याने त्यांना एक एक करून धाग्यात गुंफणे सोपे होते.
आजही डिचोली व साखळीतील बाजारपेठेत सुरंगीची फुले सर्वण गावातून आणली जातात. या दिवसांत फुलांच्या घमघमाटात त्यांचा उत्सवच सुरू होतो. फुलांमधील निसर्गातील चमत्कारांनी आपण स्तंभित होतो. शिशिर ऋतू उलटून ग्रीष्म ऋतूत प्रवेश करत असताना हवामानातील उष्णता जशी वाढत जाते तशी सुरंगीच्या झाडाच्या फांद्यांना हळदीच्या रंगाने भरभरून टाकणारी ताजी टवटवीत फुले बहरायला सुरुवात होते.
झाडाची एकंदर पाने आणि खोड जांभळीच्या झाडाशी साधर्म्य दर्शवते. पानाचा आकार लांबट असून ती जाड आणि मजबूत असतात, तर खोड आणि इतर फांद्या उजळदार राखेच्या रंगाच्या असतात. गर्द पर्ण आच्छादनाने व्यापलेला हा एक सदाहरित वृक्ष आहे. सुरंगीच्या फुलांना शोधण्यासाठी झाडाखाली उभे राहून फांद्याच्या दिशेने पाहावे लागते.
कारण ही फुले आतील फांद्यावरच बहरतात. त्यामुळे झाडाच्या पर्ण छायेत आल्हाददायक सावलीत सूर्यकिरणांचा मारा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ती संपूर्ण दिवस ताजी असतात. फांद्या पसरट असल्यामुळे झाडावर चढणे सोयीस्कर असते. फुले काढण्यासाठी झाडावर चढलेला माणूस बाहेरून दिसणार नाही अशी या पानांची गर्द छत्रधार रचना असते.
गोमंतकातील लोकमानसात सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने सुरंगीच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व लाभले होते. गोव्यातील विविध लोकगीतांमध्ये सुरंगीचे वर्णन आढळते.
तिसऱ्या दिवशी जाईन सातेर
हाडिन झेले सुरुंगाचे,
हाडिन झेले बुरंगाचे,
हाडिन झेले भुताचे.
पौष महिन्यात साजरा होणाऱ्या धालोत्सवातील गीतात गोमंतकातील वैविध्यपूर्ण फुलांचा उल्लेख करत असताना सातेर देवतेला नैसर्गिक फुलांची माळ किती प्रिय असते, याचा प्रत्यय येतो.
सुरंग आणि बुरंग हे एकाच प्रजातीच्या झाडाची नर आणि मादी फुले असून त्यांची स्वतंत्र झाडे असतात. या फुलाचे शास्त्रीय नाव आहे ‘माम्मीया सुरीगा’. चार पांढऱ्याशुभ्र पाकळ्या असलेल्या या फुलातील नर फुलांना सुरंग तर मादी फुलांना बुरंग अशी नावे आहेत.
बुरंगीपेक्षा सुरंगी जास्त सुगंधित आणि आकर्षक असल्यामुळे सुरंगीला लोकमानसात प्रमुख स्थान लाभलेले आहे. बुरंगीची फुले दिसायला लालसर असतात कारण त्या फुलाच्या परागकोषामधील एक पुंकेसर जाड व लाल रंगाचा असतो, तर सुरंगीची फुले त्याच्या पूर्णपणे पिवळ्या असलेल्या पुंकेसरमुळे अगदी हळदीसारखी दिसतात.
ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या परिसरात एक असा प्रयोग केलेला आहे ज्यामुळे एकाच वृक्षाला सुरंगी आणि बुरंगीची फुले फुललेली पाहायला मिळतात. पश्चिम घाटाचा वारसा लाभल्याने इथल्या जंगलात व देवराई असलेल्या ठिकाणी नानाविध फुलांचे दर्शन घडत असते.
२०१८साली डॉ. ऋतुजा कोलते यांच्या संशोधनाद्वारे या नवीन प्रजातीची ओळख झालेली आहे. या पुष्प वनस्पतीचे नाव ‘कन्सकोरा श्रीरंगीयना’ असे असून ती एक नष्टप्राय वनस्पती बनलेली आहे. चहूबाजूंनी सुगंध दरवळणारी ही फुले पक्षी, फुलपाखरे, भुंगे व इतर कृमी कीटकांना भरपूर प्रमाणात खाद्य उपलब्ध करून त्यांचे जगणे सुबक बनवतात.
सुरंगीच्या झाडावर आपले स्थान प्रस्थापित करून कोतवाल, कोकीळ, सूर्यपक्षी यांसारखे पक्षी वेगवेगळे आवाज काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. ही फुले मधुमयी असल्यामुळे लहान मोठ्या आकाराच्या मधमाश्यांचे थवे मधुरस टिपण्यासाठी येतात. मुंग्यांनासुद्धा या फुलांची चटक लागलेली असते, त्यामुळे फुले काढताना काळजी घ्यावी लागते. ही फुले सुकल्यावरसुद्धा त्यांचा सुगंध टिकून राहतो. त्यामुळे अत्तर बनविण्यासाठी त्याचा वापर होतो.
सुरंगी हे पुष्पवृक्ष आज धोक्यात आले आहे. गोव्यातील काही भागांतच या वृक्षांचे पावित्र्य जपून ठेवले आहे. ही झाडे घनदाट जंगल, पाणथळ जागेपासून ते कातळ सड्यांपर्यंत आढळतात. डिचोली तालुक्यातील साळ या गावातील कुमयामळ येथे राष्ट्रोळीची देवराई आहे. या सदाहरित वृक्षसंपदेत जास्त प्रमाणात लहान मोठी सुरंगीची झाडे आहेत.
सुरंगीच्या झाडाला राष्ट्रोळी देवतेच्या स्वरूपात पुजले जाते. सत्तरीतील वांते गावात सुरंगीसाठी ख्यात असलेल्या परिसराला ‘सुरंगिणी’ असे नाव आहे. गोव्यातील खोतिगाव, पालये, वेळगे, झाडांनी, पडोशे, कुडचिरे या गावात काही प्रमाणात सुरंगीची झाडे आहेत. फोंडा येथील साफा मशिदीच्या प्रांगणात सुरंगीचे दर्शन होते. आल्तिन्हो येथील डोंगरावर असलेला जॉगर्स पार्क व सातपाल येथील आर्बोरेटममध्ये सुरंगीची झाडे आहेत. गोव्यातल्या पुष्प वैभवाची महती अनुभवण्यासाठी माळरान व जंगलात प्रवेश करावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.