सुदिन ढवळीकर हे गोव्याच्या राजकीय पटावरचे एक प्रमुख ’मोहरे’ गेली २६ वर्षे ते गोव्याच्या राजकारणाच्या क्षितिजावर तळपत आहेत. मडकई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी मगो पक्षाचे अस्तित्वही जोपासले आहे हे विशेष. रवि नाईक, रमाकांत खलप, प्रकाश वेळीप, डॉ. काशिनाथ जल्मी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी पक्षाशी फारकत घेतल्यानंतर मगोची डुबणारी नौका किनाऱ्याला नेली ती सुदिन यांनीच. आता ते या पक्षाला पूर्वीचे गतवैभव देण्यात थोडे कमी पडले असले तरी भाऊसाहेब बांदोडकरांच्या मगो पक्षाला अजूनही विधानसभेत प्रतिनिधित्व मिळत आहे ते सुदिनांमुळेच हेही तेवढेच खरे आहे.
पण हा पक्ष बहुमताने येत नसल्यामुळे मडकई मतदारसंघातून सलग सहा वेळा, तेही वाढत्या मताधियाने निवडून येऊनसुद्धा सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. दीर्घकाळ राजकारणात असूनसुद्धा मुख्यमंत्री न होऊ शकलेले फोंडा तालुयातील दोन आमदार म्हणजे एक सुदिन अन् दुसरे सुभाष शिरोडकर. परवा सुभाषभाऊंना माझ्या ’गोमंतकीय राजकारणातील बदलते प्रवाह ’ या पुस्तकाची हजारावी प्रत देण्यास गेलो असताना हाच विषय छेडला गेला.
त्यावेळी सुभाष भाऊंनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण १९८४सालापासून विधानसभेत असलेले व तब्बल आठ वेळा निवडून आलेले सुभाषभाऊ मंत्री व्हावेत असे अनेकांना वाटत होते व वाटत आहेही. तिथे त्यांच्या कार्यालयात असलेल्या अनेकांनी ही इच्छा बोलूनही दाखवली. सुदिनांबाबतही असेच म्हणता येईल. ते मुख्यमंत्री व्हावेत असे अनेकांना वाटते. तशी चर्चाही फोंडा तालुक्यात सुरू आहे.
हल्लीच सुदिन यांनी फोंड्यात पत्रकारांशी बोलत असताना याच गोष्टीवर बोट ठेवले. ‘लोकांची इच्छा व नशिबात असेल तर मी अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतो’, असे ते बोलून गेले. लोकांची इच्छा आहेच प्रश्न आहे तो नशिबाचा. २०१८साली मनोहर पर्रीकर उपचारांसाठी दिल्लीला जाणार होते तेव्हा ज्येष्ठ मंत्री म्हणून सुदिनांचीच मुख्यमंत्रिपदी निवड होणार होती. तशी तयारीही सुरू झाली होती.
फोंड्यात तर फटाकेसुद्धा वाजविण्यात आले होते. पण ऐनवेळी तेव्हा मंत्री असलेले गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, अपक्ष गोविंद गावडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे पर्रीकरांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. ‘नसीब मे जिसके जो लिखा था वो तेरी महफिल में काम आया ’ असे जे म्हटले जाते त्याची अशावेळी आठवण येते. यामुळे सुदिनांच्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास हिरावून घेतला गेला.
मध्यंतरी ‘मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करा तुम्हांला मुख्यमंत्री करतो’, अशीही त्यांना ऑफर होती. पण ते या ऑफरला न बधल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले. पण त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत पक्षांतर न करणारे एकमेव आमदार अशी कीर्ती ते संपादन करू शकले यात शंकाच नाही. मात्र ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्री होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते हेही तेवढेच खरे आहे.
गेल्या निवडणुकीत मगोला जर पाच जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करून सुदिन मुख्यमंत्री बनले असते असेही बोलले जात होते. पण मगोला फक्त दोन जागा मिळाल्यामुळे या शयतेलाही पूर्णविराम मिळाला होता. आता सुदिन आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात असल्यामुळे २०२७सालची निवडणूक ही त्यांची या संदर्भातील शेवटची निवडणूक ठरू शकते. त्यांचे निवडून येणे वादातीत आहे.
प्रश्न आहे तो बदलत्या समीकरणाचा. सध्या मगो पक्ष सरकारात असून स्वतः सुदिन वीजमंत्री आहेत. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ते कोणती समीकरणे मांडतात यावर त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भाजप - मगो युती झाली तर प्रियोळ मतदारसंघ मगोकडे जाऊ शकतो असे सध्याच्या स्थितीवरून दिसते आहे.
मडकई व प्रियोळ हे फोंडा तालुयातील दोन मतदारसंघ आणि इतर तालुयातील आणखी काही मतदारसंघ मगोला देऊन भाजप आपले स्थान बळकट करू शकतो असा अंदाजही वर्तविला जात आहे. पण तसे झाल्यास व युतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री भाजपचा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे परत सुदिनांना एखाद्या मंत्रिपदावर समाधान मानावे लागणार हेही तेवढेच खरे आहे. हे पाहता सुदिनांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर वेगळ्या समीकरणांचा विचार करावा लागेल. आता वेगळी कोणती हे आणखी एका वर्षानंतरची परिस्थितीच सांगू शकेल.
मात्र ’नाऊ ऑर नेव्हर’ हा बाणा बाळगून आणि परिस्थितीचे आकलन करून त्याप्रमाणे निर्णय घेतला तर मुख्यमंत्रिपद सुदिनांच्या दृष्टिक्षेपात येऊही शकते. सुदिनांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अगदी उपमुख्यमंत्रिपदासह जवळजवळ सर्व मंत्रिपदे भूषविली आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च पदासाठी त्यांना योग्य अशी ’गेम’ खेळावी लागणार आहे.
ते म्हणतात त्याप्रमाणे नशीब वगैरे ठीक आहे, पण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही उक्तीही खोटी म्हणता येत नाही हेही इथे लक्षात घ्यायला हवे. आता प्रयत्न श्रेष्ठ की नशीब याचे उत्तर मिळण्याकरता तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात तरी सुदिन मुख्यमंत्रिपदी आरूढ होतात की नाही हे बघण्याकरता आणखी दीड वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.
मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.