Sea Turtle Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

World Turtle Day: समुद्रमंथनात मंदार पर्वताला आधार देणाऱ्या, गोमंतकीय धर्मजीवनात विष्णुरूप मानलेल्या 'कासवांचे' अस्तित्व संकटात

World Turtle Day: आज ‘विश्व कासव दिवस’ जगभर साजरा केला जातो. कासव हा उभयचर प्राणी पर्यावरणाचे रक्षण करण्यात आपले योगदान देत असल्याने त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे, गोव्यासाठी आवश्यक आहे.

राजेंद्र केरकर

केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या धर्मजीवनात कासवाला देवतेसमान स्थान लाभले आहे. अत्यंत मंदगतीने चालणारा कासव हा दीर्घकाळ जगणारा चतुष्पाद प्राणी आहे. त्याची पाठ वज्रासारखी कठीण असते आणि त्यामुळे मोठ्या कासवाच्या पाठीचा उपयोग लढाईच्यावेळी ढालीसारखा केला जायचा.

देव-दानवांनी जेव्हा सागर मंथन आरंभले तेव्हा मंदार पर्वताला आधार देण्यासाठी भगवान विष्णूने कूर्मावतार घेतला. समुद्र मंथन करताना कासवानेच मंदार पर्वताला आधार दिल्याकारणाने चौदा रत्नांची प्राप्ती झाली, अशी पुराणकथा आहे. त्यामुळे उंच शिखरयुक्त मंदिर उभारणे म्हणजे मंदारपर्वत तर त्या मंदिरात कासवाची प्रतिकृती, सागर मंथनावेळी त्याने केलेल्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठेवली जाते.

त्यासाठी बऱ्याच मंदिरांत, सभामंडपात किंवा अन्यत्र दगडात कासवाची आकृती खोदण्याला प्राधान्य दिलेले आहे. प्रदीर्घ जीवनरेषा लाभलेल्या कासवाविषयी लोकमानसात पूर्वापार लोकसंकेताचे पालन-केलेले आहे आणि त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या बऱ्याच प्राचीन संस्कृतींनी कासवाला पवित्र मानलेले आहे. भारतीय धर्मसंस्कृतीने श्रीविष्णूच्या दशावतार संकल्पनेत मत्स्यावतारानंतर कूर्मावताराला महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांच्या पूजनाला प्राधान्य दिले आहे.

कंबोडियातील अंकोरवाट येथील समुद्रमंथनाविषयी असलेल्या मूर्तीशिल्पात मंदार पर्वताला आधार देताना कासवाला चित्रित केलेले आहे. जगभरातल्या प्राचीन संस्कृतींनी कासवाला पांडित्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानलेले आहे. ग्रीक संस्कृतीत चेलोन ही कूर्मदेवता म्हणून वंदनीय आहे. ग्रीक देशातल्या एजिना शहरात कासवाविषयी नाणी, शिक्के आणि प्रतिमा आहेत. आदिमानवांनी ऑस्ट्रेलियासारख्या देशात जी प्रस्तर चित्रे काढलेली आहेत, त्यात कासवाची चित्रे काढलेली आहेत.

ऑफ्रिकेतल्या बऱ्याच लोककथांत त्याचप्रमाणे इजिप्शिअन संस्कृतीत कासवाला स्थान लाभले आहे. चिनी संस्कृतीत पावित्र्य आणि चिरंतन जीवनाचे प्रतीक म्हणून कासवाकडे पाहिले जाते. पाणी, चंद्र, पृथ्वी, काळ, अमरत्व, सर्जनांचे प्रतीक म्हणून कासवाला मानसन्मान दिलेला आहे. कासवाला निर्मितीशी जोडलेले असून, विश्वातील व्याप आणि ताप सोसण्याचे सामर्थ्य कासवात असल्याचे मानलेले आहे.

ससा आणि कासवाविषयी मराठीत अजरामर झालेले बालगीत इसापनितीतल्या कथेवर आधारित आहे. भारतीय संस्कृती कासवाच्या पाठीवरचे उभे असलेले चार हत्ती पृथ्वी धारण करून आहेत, असे मानते; तर उत्तर अमेरिकेत कासवाच्या पाठीवरती पृथ्वी विराजमान झालेली आहे असे मानलेले आहे.

सुफी तत्त्वज्ञान अंड्यात बाहेर आलेली कासवाची पिल्ले परमेश्वरी मार्गदर्शनामुळे सागरात जातात असे मानते. प्रशांत महासागरातल्या इक्वेडोर देशात जो गालापगोस बेटांचा समूह आहे त्याचे नामकरण कासवांमुळेच झालेले आहे. ‘गालापगोस’ म्हणजे कासवाचे बेट. सहा फुटीची कासवे या बेटाचे वैशिष्ट्य आहेत. गालापगोसच्या इसाबेला बेटावरती असलेल्या संशोधन केंद्रातल्या भित्तिचित्रात सर्वांत प्रथम मानव कासवाची शिकार करताना दाखवलेला आहे.

गोमंतकीय धर्मजीवनात कासवांना विष्णुरूप मानलेले असले तरी त्यांची शिकार मांस आणि कवचासाठी केली जायची. डिचोलीतील नावेली गावात पावसाळ्यानंतर भातशेती करण्यापूर्वी ‘बारस’ हा विधी जेव्हा करतात तेव्हा पिठापासून मगरीची जशी प्रतिकृती करतात तशीच कासवाचीही करतात.

गोव्यातल्या केवळ श्रीविष्णूच्या मंदिरांत कासवाच्या एकापेक्षा एक सुंदर प्रतिकृती नसून अन्य लोकदेवतांच्या मंदिरातही कासवाच्या सुबक मूर्तींना स्थान लाभलेले आहे. दगडाप्रमाणे धातूच्या सुंदर मूर्ती मंदिराच्या सभामंडपात असून त्यांना गंध, पुष्प अर्पण करण्याची परंपरा रूढ आहे.

कासव हा प्राणी सत्त्वगुणप्रधान असून मंदिरात त्याला प्रथम नमस्कार करतात. त्याच्या अंगी असलेल्या सहनशीलता, स्थैर्य आदी गुणांचा स्वीकार व्हावा, अशी भावना लोकमानसात असली पाहिजे. फोंडा तालुका पोर्तुगिजांनी जिंकण्यापूर्वी तेथे सौंदेकर घराण्याची सत्ता होती. बंदिवडे येथे सौंदेकर राजघराण्याचा जुना वाडा असून त्यांच्याकडे जशी शस्त्रास्त्रे जतन करून ठेवलेलीत, त्याचप्रमाणे कासवाची प्रेक्षणीय अशी काष्ठशिल्पे सुरक्षित ठेवलेली आहेत, जी आजही गणेशचतुर्थीवेळी इथे भेट देणाऱ्यांना पाहायला मिळतात.

आपल्या संस्कृतीने एक पवित्र आणि वंदनीय प्राणी म्हणून कासवाकडे पूर्वापार पाहिलेले असले तरी आज मांस आणि कवचासाठी कासवांची निर्घृणपणे शिकार केली जात आहे.

Sea Turtle

निसर्गातल्या या निरुपद्रवी प्राण्याचा संहार आपण थांबायलाच हवा, ही मानसिकता समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकेकाळी सत्तरीतील कोपर्डे गावची देवराई कासवांनी समृद्ध होती. जेव्हा या देवराईत आग लागली तेव्हा शेकडो कासव जळून खाक झाले होते. बार्देस तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या ‘कायसुव’ या गावाला तिथे कासव मोठ्या प्रमाणात आश्रयाला येत असल्याने ते ग्रामनाम लाभले असल्याचे मानले जाते.

आज सागरी पर्यटनातली बेशिस्त, कायसुव गावातल्या कासवांच्या अस्तित्वाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरली आहे. सत्तरी तालुक्यातील नानोडा गावात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात जो कासवाच्या आकाराचा पाषाण आहे, त्याची ओळख कासव म्हणून केलेली आहे.

पेडण्यातील मोरजी गावातला तेंबवाडा ऑलिव्ह रिडले कासवांसाठी नावारूपास आला होता, परंतु आज पर्यावरणातील अराजकतेमुळे इथल्या कासवांच्या अस्तित्वाला संकटे निर्माण झाली आहेत. काणकोणातील गालजीबागचा त्याचप्रमाणे इथल्या बऱ्याच किनाऱ्यावरती ऑलिव्ह रिडले कासव हक्काने आश्रय घेण्यास यायचे, आज ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

गोव्यातील मंदिर परिसरात ज्या देवतळ्या, देवाच्या पवित्र मानलेल्या विहिरी आहेत, तेथील कासवांना मंदिर संस्थांनी आश्रय देऊन त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केलेले आहे. जगभर दरवर्षी २३ मे हा ‘विश्व कासव दिवस’ म्हणून साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कासव संरक्षण आणि संवर्धन किती महत्त्वाचे आहे याविषयीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

कासव हा उभयचर प्राणी पर्यावरणात आपले योगदान करत असल्याने त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे गोव्यासाठी आवश्यक आहे. भगवान विष्णूचा दशावतारातील कूर्म अवतार महत्त्वाचा असून त्यासाठी तरी आम्ही कासवांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करून, त्याचे पालन केले तर कासवे वाचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT