Solkadhi benefits, Goan solkadhi, Traditional solkadhi Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

Goan Traditional Solkadhi: सोलकढीची एक गंमत आहे. ती अशी की-तुम्ही जेवणाच्या आधी भूक अधिक प्रज्वलित व्हावी म्हणून सोलकढी घेऊ शकता. भूक चांगली लागेल, याची हमखास गॅरंटी.

गोमन्तक डिजिटल टीम

सोलकढीची एक गंमत आहे. ती अशी की-तुम्ही जेवणाच्या आधी भूक अधिक प्रज्वलित व्हावी म्हणून सोलकढी घेऊ शकता. भूक चांगली लागेल, याची हमखास गॅरंटी. जेवणात भाताबरोबर कालवायला म्हणून घेऊ शकता-आणि जेवण अधिक सामिष, अधिक खुलून येतं. आणि जर जेवण थोडं जास्त झालं, किंचित अंमळ जास्तच झालं, आणि पोटाला तडस लागली-तर नक्कीच जिरवण म्हणून सोलकढी घ्यायलाच हवी.

या सोलकढीला कुठलाच प्रहर, कुठलाच स्वर वर्ज्य नाही-असं म्हणा ना! जेवणाच्या ताटात कडेकडेने वाहणारी सोलकढी ही गोवन आहारशास्त्रातली एक प्रवाही रीत आहे. गोव्यात लहान बाळाला ‘लावण’-म्हणजे पहिला घास-भरवला जातो. तो पहिला घास काऊ-चिऊचा नसतो, तर शीतकढीचा असतो.

आणि हा पहिला घास घेतला की त्या लहान बाळाचा गोमंतकीय गोत्रात यथोचित प्रवेश होतो. पुढे आयुष्यभर त्याच्या धमन्यांमधून ही सोलकढी-त्यातल्या नारळाच्या दाट रसासारखी-अगदी रसरसून वाहत राहते.

सोलकढीसाठी लागणारे जिन्नस अगदी माफक असतात-

भिरंडे, मीठ, हिंग (शंकर छाप हिंग धडाधड घातलेला!) आणि ताज्या नारळाचा रस, म्हणजे नारळाचं दूध. हे झालं बेसिक.

त्यात ‘गोल्ड’, ‘प्रो’ आणि ‘अल्ट्रा प्रो’ आवृत्ती हवी असेल, तर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि लसूण (शाकाहारी नको असेल तर) अधिक रंगत आणतात.

थोडं अधिक पाचक हवं असेल तर ओवा, जिरं-हे तर येतंच येतं. सोलकढीचे प्रकारही काही कमी नाहीत. फुटीकढी किंवा तिवळ (बिनरसाची कढी), लसणीची कढी, ओवा-जिराकढी, गंजनकढी (म्हणजे गवती चहा), तिरफळाची कढी (हिरवी तिरफळं मात्र हवीत!), लाल मिरचीची कढी, फोडणीची कढी-

या फोडणीच्या कढीत सोलकढीला करविलाची पानं (कढीपत्ता), हिरवी मिरची आणि मोहरी (राई) यांची मस्त फोडणी दिली जाते.

गोमंतकीय गृहिणीचं एक खास कौशल्य म्हणजे-नारळ जर किंचित लागला, तर त्यावर योग्य वेळी दिलेली फोडणी!

अशा वेळी ही ‘चर्चरित’ फोडणी सोलकढीची चव आणखीनच खुलवते. हे सगळं झालं चवीचं. पण आरोग्यदृष्ट्याही सोलकढीचं योगदान काही कमी नाही. ही सोलकढी उष्णता कमी करते, पचन सुधारते, तोंडाची चव आणते, वातावर (ओवा-हिंग घालून) गुणकारी ठरते आणि भूक प्रज्वलित करते.

एक नाही-अनेक फायदे!

गोव्यातलं आयुष्य आनंदी आणि प्रवाही असतं. हा प्रवाह जर एखाद्या निरूपणकाराच्या ओघवत्या शब्दांत सांगायचा झाला, तर काय सांगावं महाराजा! वाटीतली सोलकढी जितकी सहज ताटात येते, आणि ते ताट ओठाला लावून अलगद पोटात उतरते-

तितक्याच अलगदपणे हा जीवनप्रवाह तुम्हांला संसाररूपी भवसागर तरून नेतो. फरक इतकाच की- अध्यात्म पचवायला नाम लागतं, आणि उदरभरणाच्या संतुष्टीसाठी सोलकढीचं आचमन लागतं.

असं म्हणतात की पहाटेची झोप ही साखरझोप असते, आणि या साखरझोपेत पडणारी स्वप्नं गुलाबी असतात. किंचित अतिशयोक्ती होईल, पण राहवत नाही-

गोंयकाराची ही पहाटेची स्वप्नं थोडी अधिक दाट गुलाबी असतात. कारण त्यात सोलकढीतल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा अगदी बेमालूमपणे मिसळलेला असतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT