चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा अर्थ आहे विचारधारा किंवा तत्त्वज्ञान. चंगळवाद म्हणजे सुखसाधनांची रेलचेल असलेलं जीवन असावं, असा दृष्टिकोन मानणं.
आपण समजा कोणालाही असा प्रश्न विचारला की ‘जीवनात सुखसाधनांची रेलचेल असावी की असू नये?’ तर काय उत्तर येईल? अर्थातच ‘असावी’ असं उत्तर येईल. त्याच माणसाला आपण समजा पुढचा प्रश्न विचारला की समाजात किंवा माणसाच्या जीवनात ‘सुखसाधनांची रेलचेल का असावी?’ तर तो म्हणेल, ‘हा कसला फालतू प्रश्न विचारताय. माणसाने सुखाने जगण्यासाठी!’
त्याचे हे उत्तर स्वाभाविक आहे, तर्कशुद्ध वाटते आहे. पण आपला अनुभव काय आहे? सुखासमाधानांची रेलचेल असल्यामुळे मानवी जीवनात सुख वाढलेय का? पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा सामान्य लोकांच्या जीवनात आजच्याप्रमाणे सुखसाधने नव्हती, तेव्हा माणसांच्या जीवनात कमी सुख होते का?
गेल्या पन्नास वर्षांत सुखसाधनांच्या वाढीसोबत सुख वाढत गेलेय असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही!’ असेच आहे. सुखसाधनांच्या रेलचेलीमुळे सुख वाढलेले तर नाहीच, उलट सुखाने जगणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘मनोविकार’ हा विषय निवडला तेव्हा अनेक सामान्य मंडळींनी मला ऐकवले की ‘बरे केलेत. सायकीयॅट्री निवडलीत. आजच्या काळात सायकीयॅट्रीला स्कोप आहे!’ म्हणजे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ माणसांची संख्या वाढते आहे, हे पंचवीस वर्षांपूर्वी सामान्य लोकांनादेखील जाणवू लागले होते.
सुखसाधने जसजशी वाढत जात आहेत, तसतसा आनंद वाढत नाही, असे का होतेय? एक उदाहरण घेऊन याचे एक उत्तर समजून घेऊ. आपल्याला हा अनुभव असतो की आपल्याकडे चप्पल नसेल, आपल्याला अनवाणी शाळेत जावे लागत असेल तर आपल्याला दुःख असते. अशा वंचिततेमध्ये चप्पल मिळाले की आपल्याला आनंद होतो.
आपली सांपत्तिक स्थिती बरी झाली आणि चपलांसोबत बूटदेखील मिळाले तर आणखी आनंद होतो. पण समजा या दोन जोडी पादत्राणांशिवाय आपल्या मावशीने चपलाचा आणखी एक जोड दिला तर पहिले चप्पल मिळाले तेव्हा जसा आनंद झाला होता, तितकाच आनंद तिसऱ्या पादत्राणाने मिळतो का? नाही.
तो कमी मिळतो. समजा, यापुढे अशा चपला मिळतच राहिल्या तर प्रत्येक नव्या चपलांसोबत आनंदाचे प्रमाण कमीकमी होत जाते. कदाचित पाचव्या जोड्यासोबत असा आनंद मिळणे शून्य होऊन जाईल. याला म्हणतात ‘थिअरी ऑफ मार्जिनल युटीलिटी’.
पण आजच्या समाजात असे घडतेय की यापेक्षा वेगळे घडतेय? नव्या सुखसाधनांनी आनंद वाढत नाही, पण नवनव्या वस्तूंचा हव्यासही कमी होत नाही. पूर्वीच्या काळी एकाच महिन्यात चपलांचा चौथा जोड मिळाला असता तर ‘आपण याचे काय करू? गळ्यात बांधून फिरायचे आहे का?’
असा तुच्छतादर्शक प्रश्न विचारला गेला असता. पण आज अशी मंडळी आढळतील की ज्यांच्याकडे एका माणसाच्या चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटाची सोय करण्यात आलेली आहे. गरज नसताना नव्या वस्तू खरेदी करण्याचे, गरज नसताना घरे खरेदी करण्याचे, गरज नसताना उत्सव साजरे करण्याचे जणू व्यसन समाजाला लागलेय. यातून आनंद वाढलेला तर नाहीच, उलट मानसिक अस्वास्थ्य मात्र वाढलेय. सहकाराऐवजी संघर्ष, द्वेष, शत्रुत्व वाढलेय.
जेव्हा अन्नाचे किंवा सुखसाधनांचे दुर्भिक्ष होते तेव्हा मिळेल ते, मिळेल तेथील साठवणे आवश्यक होते. ते मिळवण्यासाठी इतरांशी संघर्ष करणे आवश्यक होते. तिथे अस्तित्वासाठी शत्रुत्व आणि भविष्यातही अन्न व सुखसाधने आपल्या वाट्यास यावीत यासाठी सत्तेचा हव्यास, हे तार्किक वाटले असते.
पण आता सुखसाधनांची रेलचेल झाल्यावरही या भावना का शिल्लक राहिल्या? नुसत्या राहिल्या नाहीत तर वाढल्या. केवळ मानसिक स्वास्थ्यच नाही, सामाजिक स्वास्थ्यदेखील धोक्यात आलेय. वाढत्या उपभोगाचा परिणाम वाढत्या प्रमाणात नैसर्गिक स्रोत नष्ट करण्यात होत आहे. हे स्रोत मर्यादित तर आहेतच, शिवाय जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल असे पर्यावरणीय प्रश्न उभे राहिलेत. म्हणजे ही चंगळवादी शैली आत्मनाशी आहे.
गंमत म्हणजे आपल्याला आज जाणवणारा हा प्रॉब्लेम डॉ. एरिक फ्रॉम या मानसोपचारतज्ज्ञाला फार पूर्वीच जाणवू लागला होता. १९७६मध्येच त्यांनी ‘टू हॅव ऑर टू बी?’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मानवजातीने औद्योगिक युगाच्या प्रारंभी पाहिलेले मानवमुक्तीचे महान स्वप्न भंग पावले आहे असे जाहीर केले होते.
असे का घडले? काय झाला परिणाम? मानवजात अशी अविवेकी, आत्मघातकी का वागते आहे? या अविवेकी वागण्यामागे मनाचे कोणते नियम आहेत? डॉ. फ्रॉमनी याचे स्पष्टीकरण त्याच्याही आधी तीस वर्षे म्हणजे १९४६च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या ‘फियर ऑफ फ्रीडम’ या पुस्तकात केले आहे.
ते म्हणतात, ‘मानवाला स्वातंत्र्यासोबत एकटेपणा मिळाला आहे.’ डॉ. फ्रॉमच्या या म्हणण्याचा अर्थ काय? त्यासाठी आपल्याला लांबच्या भूतकाळात जायला हवे. जेव्हा माणूस हा ‘प्राणी-अवस्थे’तून ‘माणूस-अवस्थे’त आला, तेव्हाच्या काळात जायला हवे. आणि प्राण्याचा माणूस बनला म्हणजे नेमके काय झाले हे समजून घेतले पाहिजे.
‘मी एक स्वतंत्र प्राणी आहे. मी वेगळा आणि इतर माणसे वेगळी. मी वेगळा आणि निसर्ग वेगळा,’ याची जाणीव माणसाला होऊ लागणे म्हणजे माणूस बनणे. अशी जाणीव फक्त माणसालाच असते. ती गायीला नसते, मांजराला नसते, इतर कोणत्याच प्राण्याला नसते. या जाणिवेचे जैविक कारण आहे, माणसाला मिळालेला विचार करणारा मेंदू!
या तार्किक मेंदूमुळे झाले काय, की माणसाला जीवनातील अनिश्चितता कळू लागली. आपण आपल्या सोबत्यांच्या आधी मरू किंवा सोबती आपल्याआधी मरतील हे लक्षात येऊ लागले. गायीला हे कळत नाही, कुत्र्याला हे कळत नाही. म्हणजे माणसाला आपण स्वतंत्र आहोत या जाणीवेसोबत विभक्त आहोत, एकटे आहोत ही जाणीवदेखील आली.
अगदी सुरुवातीच्या काळात माणसाला आपल्या स्वतंत्रपणाची किंवा विभक्तपणाची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा तो जंगलातच होता. त्याला मानसिक पातळीवर निसर्गापासून विभक्तपणा जाणवू लागला असला तरीही तो निसर्गाच्या कुशीतच होता.
त्यावेळी तो प्राण्यांचे मुखवटे धारण करून, प्राणी-झाडे ही कुललक्षणे मानून जुजबी कर्मकांडे करून एकटेपणावर मात करी. या एकटेपणावर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग मानवी समाजाने आतापर्यंत वापरले आहेत.
अर्थात हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की निसर्गापासून विभक्त होण्याची प्रक्रिया जरी लाख वर्षांपूर्वी सुरू झालेली असली तरी ती औद्योगिक युगाच्या आरंभापर्यंत पूर्णत्वास गेलेली नव्हती. मध्ययुगात माणूस हा अमुक एका जातीचा, अमुक एका वस्तीचा, अमुक एका गावाचा असे. पण औद्योगिक युगाने हे बंधदेखील तोडून टाकले. माणूस पूर्णपणे एकटा केला. या एकटेपणावर मात कशी करायची हा औद्योगिक युगातील माणसासमोरचा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी माणसाने कनफॉरमिटीचा मार्ग पत्करला. कनफॉरमिटी म्हणजे काय, हे आपण पुढील रविवारी येणाऱ्या लेखात पाहू...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.