Shiroda Stream Canva
गोंयकाराचें मत

Shiroda: सफर गोव्याची! शिरोड्याचा ओहळ सिद्धनाथ पर्वतावरून वाहत कामाक्षीच्या चरणांवरून पुढे शिवाचे दर्शन घेतो

Shiroda village stream: ओहोळाच्या पाण्यावर भाजी आणि कडधान्ये पिकवून ती अन्नफळे प्रथम देवाला अर्पण केली. आपण फक्त भोक्ते आहोत, मालक नाही ही भावना त्यामागे होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

पाण्याच्या ओलाव्याने माती आपल्या अंगातून हिरवे कोंब उगवून स्वत:ला झाकून घेते. पडणाऱ्या पावसाचे शुभ्र पाणी मातीत मिसळून चिकटपणा दाखवते. अचानक पाऊस कोसळल्याने एखाद्या ओहोळातून सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे पाणी वाहते. तेव्हा मन बेचैन होते. मात्र त्या प्रकाराने वसुंधरेला सुखशांती मिळते.

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे वसुंधरेचे तीन ऋतू प्राणिमात्रांसाठी भावभावनांचे वस्त्र लेऊन येतात. पावसाळ्यात ओलसर हिरवेपणा, हिवाळा कडक थंडीने गोठवत आणि उन्हाळ्यात वैशाखवणवा मानवी जगणे नकोसे करून सोडतो. या ऋतुचक्राशीच पाणी आपल्या वेगवेगळ्या भावभावना जोडून घेत असते.

पहाट नव्या जन्माची द्योतक असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ बाल, प्रौढत्व आणि वृद्धत्व दाखवते, रात्र गूढ मृत्यूचे कोडे घालते. त्यात गांभीर्य, उदास, वेदना जोडल्या आहेत. सुख दुःखाच्या गोष्टी ऋतूशी जोडण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. पाश्चात्त्य साहित्यात तारुण्याशी ‘स्प्रिंग’, प्रौढत्वाशी ‘ऑटम्’ वृद्धत्वाशी ‘समर’ आणि मृत्यूशी ‘विंटर’ जोडले आहेत.

आपल्याकडे ऋतूत विरघळणाऱ्या पाण्यात जरा वेगळेपण आहे. वसंत सुख, आनंद, प्रसन्नता देतो. ग्रीष्म रणरणते वैराण आणतो आणि वर्षा ग्रीष्मावर मात करीत करीत ओलाव्याने भूमीच्या गर्भातून सृजनांचे नवे कोंब दाखवतो. शरद उबदारपणा, तर शिशिर पाणी साठवत पानगळ करतो. स्वत:भोवती फिरणारी वसुंधरा ऋतुचक्रांची वस्त्रे आवडीने अंगावर झेलून आपल्या अंगावर खेळणाऱ्या सजीवांना पाण्याने नवसंजीवनी देते. क्षितिजाच्या पोटी जन्म घेणारे ऋतू स्वत: कष्ट भोगून पृथ्वीवरील जैवविविधतेला सुख देतात. प्रत्येकाच्या मनात असलेली भीती मारून टाकीत ताकद आल्याची जाणीव देतात.

ऋतू आणि वसुंधरेचा हा खेळ प्राणिमात्रांना मोहरून सोडतो. ऋतू ऊर्जेत खेळत असलेला लपंडाव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. ऋतूंच्या आगमनाने येत असलेल्या पाण्याच्या छटा वसुंधरा आपल्या अंगावर झेलून गिरकी घेत स्वत: भोवती फिरत राहते. तल्लख वैशाखापेक्षा करुणा वतनदार वाटते.

तिने पृथ्वीशी काव्य प्रक्रियेचा पहिला पुरावा मांडला, त्याची काठोकाठ भरलेली दीप्ती करुणेच्या प्रगाढ विश्वावर वाऱ्याने डोलत सागराचे पाणी आणि जमिनीवरील वृक्ष आपली हालचाल दाखवतात. ओहोळाच्या काठावर वर्षाव फुललेला नागचाफा, सोनचाफा, पिवळ्याहून सुवर्ण वाटतो. त्यातून हिवाळ्याशी प्रारब्धीय सख्य असणारे चढउतार दिसतात. त्यांच्या आयुष्यात कट्यार घुसल्यासारखे वाटते.

झरे, तळी, तलाव, ओहळ, नदी, समुद्र यांच्या रूपात आपल्या अंगात साठवलेले अमृत-पाणी बाहेर काढून हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अंगावर घेणे ती पसंत करते. खरेच पृथ्वीच्या संक्रमणाचा काळ वाटतो तितका सोपा नाही. ती बदलताना तिच्यात शारीरिक बदल घडतात. ज्याप्रमाणे वयात आलेला मुलगा, मुलगी यांना तारुण्याचा काळ अवघड वाटतो, त्यांना त्यांना हवासा वाटणारा स्पर्श, हरवलेली नजर, ठाव शोधणारे डोळे, मनात उठणारे हलकल्लोळाचे विचार त्याच प्रकारे सजीवांना पाणी देणाऱ्या पृथ्वीचे होते.

तरी आपल्या वसुंधरेला मार्ग दाखवणारे तिच्या कक्षेत फिरणारे ग्रह तारे तिचे मार्गदर्शक ठरतात. आपल्या वसुंधरेच्या उपासक पूर्वजांना तो इतिहास माहीत होता. म्हणून ते शेती, पाणी, आग, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, संक्रांत या दिवशी एखादे काम करण्यास वेळ काळ पाहत होते.

नागपंचमी, बारस (कातया) सप्तर्षी पौर्णिमा या दिवशी शेतात, बागायती डोंगरावर काम करीत नव्हते. सांगणे घालणे, चोरू वाढणे, औषध करणे, आवाळी भोजन, वसंतोत्सव, खेत्रपूजा करणे, कोंबडा बळी देणे ही कृत्ये त्या त्या वेळी ते पार पाडीत होते. आज आपण त्याला ‘अंधश्रद्धा’ म्हणून मोकळे होतो. पण, त्यांचे जगणे निसर्गाशी एवढे एकरूप झालेले होते की, त्यांना वेगळे विज्ञान शिकण्याची गरज नव्हती. तेव्हा झाडे हवा शुद्ध करायची, आता आपण ‘एकरफ्रेशनर’ वापरतो.

ओहोळांच्या शोधात हिंडताना हे असे विचार डोक्यात, एखाद्या फुलपाखराने फुलावर बसावे, इतक्या सहजतेने येत राहतात. या विचारांच्या नादात चालत चालत मी कामाक्षी देवालयासमोरील तळ्याकडे येऊन कधी पोहोचलो, ते माझे मलाही कळाले नाही. भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवालयाच्या समोर पवित्र आणि शुद्ध पाण्याचे तलाव असतच. त्यांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. देवळाकडून पुढील चढावाने चिकनगाळ शिरोडा येथे व शिरोडा गावच्या ओहोळाच्या उगमाकडे पोहोचलो.

सिद्धनाथ पर्वताच्या नैसर्गिक समृद्धतेने बोरी, शिरोडा, निरंकाल आणि बेतोडा गावांची जैवविविधता आपल्यातून वाहणाऱ्या चार ओहोळांच्या पाण्यावर जगवली आहे. शिरोडा ओहोळाचा उगम सिद्धनाथ पर्वताच्या ‘वसंतर’ या दुर्मीळ जैवविविधता पोसणाऱ्या भागात होतो. या परिसरात हिंस्र प्राण्यांची वर्दळ चालूच असते. वसंतरकडून तो आनंदवाडी, थळ, शिवनाथीकडून तारीवाड्यापर्यंत नारळ, सुपारी, आंबा, फणस, केळ, ओटम, सीताफळ, मिरी , कोकम अशा फळफळावळींच्या बागायतींना वर्षभर पाणी पुरवठा करतो.

तारीवाड्याकडून शेतीला पाणी देत कुणगे या ठिकाणी खालच्या भागात ओहळ पोहोचतो. कुणगी भागात त्याला सिद्धनाथ पर्वतावर कावडे-फातर परिसरात उगम पावलेला दुसरा ओहळ मिळतो. हे दोन ओहळ उगमाकडे बऱ्याच दूर अंतरावर असले तरी खालच्या भागात बैलाच्या जोडीने चालल्याप्रमाणे त्या भागातून जोडीने खाली वाहत येतात. हा खरा निसर्गाचा चमत्कार आहे.

कावडे - फातराकडून वाहणारा दुसरा ओहळ खाली वाहत सातोरे तळ्याकडून म्हाड्डानकडे पोहोचत वरील भागातील मरड शेती आणी भल्यामोठ्या कुळागराला पाणी देतो. म्हाड्डानकडून तो थळ भागातील कुळागरला पाणी देतो. शिवनाथी परिसराला पाणी पुरवून खालच्या भागातील शेतीला पाणी पुरवतो. कुणगे या ठिकाणी वसंतर ओहोळास मिळून त्याचा प्रवाह बराच मोठा होतो.

पुढच्या प्रवासात शेतीला पाणी देत तो कुणशे खाण बंधारा पार करून करमणे ओलांडून काराय भागाला पाणी देत खालच्या भागात खाणीर येथे पोहोचतो. त्या परिसरात त्याला चिकनगाळ डोंगराळ भागात उगम पावलेला तिसरा ओहळ मिळतो. त्या ओहोळाचा उगम वसंतर भागात होऊन तो प्रवासात खालच्या सातोरें भागातील वनराईला पाणी देतो. वाळपें भागातून कुणगेकडून शेतातून प्रवास करीत खाणीर या ठिकाणी मुख्य ओहोळास मिळतो.

या ओहोळाचे पाणी साठवण्यासाठी पूर्वजांनी चिकनगाळ परिसरात तलाव निर्माण केला होता. तो तलाव आपल्या सरकारने काही वर्षांपूर्वी दुरुस्ती काम हाती घेतले आणि सिमेंट काँक्रीटचा वापर करून त्याची डागडुजी केल्याने तळ्याचे पाणी गायब झाले.

आज त्याचा वाईट परिणाम तिथल्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना भोगावा लागतो, हे शिकलेल्या जाणकारांना कोण सांगणार? निसर्गाची शक्ती अमाप आहे, तिला कोणच तोलू मोजू शकत नाही. ईश्वराने निर्माण करतानाच तिच्या हातात सर्व कायदेकानून ठेवले आहेत, त्या कायद्याप्रमाणेच माणसाने वाटचाल केली पाहिजे. नाहीतर तो आपली हत्यारे स्वत:स शहाणे समजणाऱ्या माणसावर फेकतो. मात्र माणसाच्या वाईट कृत्याचे परिणाम बाकी सर्व प्राण्यांना भोगावे लागतात.

शिरोडा गावचा ओहळ सिद्धनाथ पर्वतावरून वाहत कामाक्षीच्या चरणांकडून पुढे शिवनाथी येथे शिवाचे दर्शन घेतो. तिथून पुढे खालच्या अवाढव्य शेतीला पाणी देत शेताच्या बांधावरील मानशीतून बाहेर पडतो. येथे खाऱ्या पाण्यात गोडे पाणी मिसळून समुद्रीय जैवविविधतेचा जन्म होतो. ओहोळाच्या गोड्या पाण्यावर पूर्वजांनी शेती केली.

दिवटें, अटल, नायकातड, भेले, शिड्डोटे, नागले, या सर्द-वायंगण शेतीत शिट्टो, नेरमार, बाबरी, बेळो, करंगूट, मुणे, आजगो पिकवून शेतातील मासळी पकडून दोन जीवनसत्त्वे खाऊन आमचे पूर्वज मोठे झाले.

त्या ओहोळाच्या पाण्यावर भाजी आणि कडधान्ये पिकवून ती अन्नफळे प्रथम देवाला अर्पण केली. आपण फक्त भोक्ते आहोत, मालक नाही ही भावना त्यामागे होती. निसर्गाविषयी आदर होता, कृतज्ञता होती. आज आपण फक्त पर्यावरणाच्या गप्पा हाणतो, आदर व कृतज्ञता नावासही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT