Shigmo Durigotsav Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Durigotsav: अश्मयुगापासून आदिमानवाला आकर्षित करणारा दूधसागरचा किनारा, पिढ्यानपिढ्या जपलेली शिगम्यातील 'दुरीगोत्सवाची परंपरा'

Shigmo Durigotsav Goa: दरवर्षी दुरीग म्हणून उभ्या केल्या जाणाऱ्या बुळबुळीत खांबावरती चढण्यासाठी लागणारे कौशल्य आणि कला ज्याच्याजवळ आहे तोच त्यात यशस्वी ठरतो.

राजेंद्र केरकर

चांद्र कालगणनेतील शेवटचा फाल्गुन महिना शिगम्याची लोकोत्सवासाठी गोवा-कोकणात प्रसिद्ध आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत वसलेल्या गोव्यात शिगम्याचा, महाशिवरात्री ते गुढीपाडव्यापर्यंत साजऱ्या होणाऱ्या विविध सणांचा, उत्सवांचा, विधींचा आणि परंपरांचा अभ्यास केला तर इथल्या कष्टकरी जातीजमातींच्या समृद्ध लोकजीवनाचे आणि लोकसंस्कृतीच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे दर्शन घडते.

पूर्वीच्या काळी कष्टकरी लोक शेती, बागायती पिके परिश्रमपूर्वक घ्यायचा आणि त्यामुळे भूमीत पैदास होणाऱ्या फळफुले, कंदमुळे, कडधान्य यांद्वारे आपले जगणे सुसह्य करायचा. आपणाला अन्नधान्य पुरवण्यात धरित्री कारणीभूत असल्याकारणाने तिच्या सृजन आणि सर्जनाच्या शक्तीविषयी त्याच्या मनात अत्यंत आदर आणि भक्तिभाव नांदत असे. त्यासाठी तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोव्यात शिगम्याच्या काळात नाना विधी, परंपरांचे नियोजन करण्यात आले.

त्यात कुठे अगम्य वाटणाऱ्या देवचाराच्या मशालीच्या मागे भारल्यागत धावणारे गडे, कुठे डोंगरमाथ्यावर घुमट-कासाळेच्या संगीतावर, कुठे देवतेच्या सांन्निध्यात एका लाकडी खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने गड्याला लटकावून आसमंतात त्याला फिरवणारी बगाडाशी साधर्म्य सांगणारा शिडियोत्सव हे सारे लोकोत्सव, पिढ्यान्पिढ्या प्रचलित असलेल्या विधी, परंपरांतून कष्टकऱ्याच्या लोकधर्माच्या आणि लोकदैवताविषयीच्या भावस्पंदनांची आणि लोकश्रद्धांची प्रचिती आणून देतात.

शिगम्यातल्या उत्सव, विधी, परंपरा, लोकाचार, लोकसाहित्य, लोककला यांच्या सादरीकरणातून कष्टकरी जातीजमातींच्या अंगी वास करणाऱ्या शारीरिक सामर्थ्य, बौद्धिक चातुर्य, निर्भीडपणा, निसर्गातल्या शक्तीभोवती असणाऱ्या गुढरम्यतेचे वलय यांची प्रकर्षाने प्रचिती येते. गोवा-कोकणातल्या बऱ्याच गावांत शिगम्यात होळी म्हणून मंदिरासमोर खड्डा खणून त्यांना आम्रपल्लवांनी सजवलेला सरळसोट खांब पुजण्याची परंपरा आहे.

या होळीबरोबर तर काही गावांत सावरीवृक्षाचा खांब, ‘दुरीग’ म्हणून उभारला जातो आणि या खांबावर चढून ठरावीक हेतूची पूर्तता करण्याचे आव्हान युवकांसमोर असते. त्यात सफल होणारा तरुण त्यावर्षीच्या दुरीगोत्सवाचा विजेता म्हणून मानांकित होतो. सांगेतील काले, धारबांदोड्यातील शिगाव, डिचोलीतील न्हावेली आणि फोंड्यातील पंचवाडी मापा येथे दुरीगोत्सवाची परंपरा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे.

पुरुषाच्या अंगी असणाऱ्या कला, बुद्धी, शक्ती यांचा आविष्कार घडवण्यासाठी शिगमोत्सवाचे व्यासपीठ खुणावत असते. चांद्र कालगणनेतील वर्षाला निरोप देऊन चैत्र या नववर्ष, मासारंभाला सामोरे जाऊन मान्सूनातील शेती बागायतीसाठी आवश्यक ऊर्जेची चाचपणी व्हावी म्हणून की काय, शिषारान्नी, चोरोत्सव, शिडियोत्सव, दुरीगोत्सव यांचे बहुधा प्रयोजन केलेले असते.

धारबांदोडा तालुक्यातील शिगावात सातेरी, रंगाई, शांतादुर्गा, महादेव ही प्रमुख ग्रामदैवते आहेत. महाशिवरात्रीपासून दररात्री पारंपरिक मांडावर शिगम्याचे नमन घालून ढोल, ताशे यांच्या लोकसंगीतावर मेळ लोकनृत्यांची पूर्वतयारी करू लागतात.

फाल्गुन कृष्ण पंचमीला लोकवाद्यांच्या सुरेल वादनाचा आविष्कार घडवणाऱ्या सुवारीत ‘होरगायो’चा उच्चार करत महादेवाच्या मंदिरासमोर सावरी वृक्षाचा खांब उभा केला जातो. त्यानंतर सामूहिकरीत्या गार्‍हाणे घातल्यावर दोरखंडासारखा उपयोग करून आदिवासी तरुण खांबाच्या टोकावरती आसनस्थ होतो आणि त्यानंतर कलशातून त्या उंच खांब्यावरती पाणी अशा तर्‍हेने ओतले जाते की, त्याच्या गुळगुळीतपणावर मात करून खाली उभे असलेले तरुण घोळक्याने दुसऱ्याच्या खांद्यावरती उभे राहून दुरीगावरती चढण्याचा प्रयत्न करतात.

शेवटी प्रयत्नाची शिकस्त करून वर चढणारा अबोली फुले आणि धवल वस्त्राचा मानकरी ठरतो. सावरी वृक्षाची साल काढल्यानंतर हा खांब त्याच्यातल्या चिकामुळे इतका बुळबुळीत झालेला असतो की तरुणांना तृणपाती गवताचा आधार घेत वर चढू न जाण्यासाठी अंगी असणारे सर्व कसब पणाला लावावे लागते.

दुधसागर नदीकिनारी वसलेला शिगाव अश्मयुगापासून आदिमानव समूहाला आकर्षित करत असून, दुरीगोत्सवाची लोकपरंपरा वृक्षज्ञानातून उदयास आलेली आहे. दरवर्षी दुरीग म्हणून उभ्या केल्या जाणाऱ्या बुळबुळीत खांबावरती चढण्यासाठी लागणारे कौशल्य आणि कला ज्याच्याजवळ आहे तोच त्यात यशस्वी ठरतो आणि शिगम्यातल्या दुरीगोत्सवाचा आकर्षण बिंदू ठरतो आणि उपस्थितांच्या कौतुकाचाही विषय ठरतो.

धारबांदोड्याच्या सीमेशी संलग्न असणाऱ्या सांगे तालुक्यातला काले गाव एकेकाळी घनदाट वृक्षवेलींनी समृद्ध वनक्षेत्राचा भाग होता. त्यामुळे इथल्या आदिवासी आणि अन्य जंगलनिवासी लोकसमूहाच्या जीवनावरती निसर्ग आणि पर्यावरण संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.

कालेच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या अगम्य ‘कातोर’, ‘फातोर’ शिलाखंडाच्या पायथ्याशी शिवस्वरूपी कलनाथाचे मंदिर आहे. तेथे आम्रवृक्षाची आम्रपल्लवांनी अलंकृत होळी, पावित्र्याचे लोकसंचित ठरलेली आहे.

फाल्गुन कृष्ण चतुर्थीच्या रात्री इथले गावकरी पायकामळ इथल्या जंगलात वसलेल्या अश्वारूढ पायकदेवाच्या श्रद्धास्थानाच्या उजव्या बाजूला साल काढलेला सावरीचा उंच खांब मोठ्या शिताफीने जंगली वेली आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून खणलेल्या खड्ड्यात उभा करतात. विधियुक्त पूजा आणि गार्‍हाणे झाल्यावर वेळीप तरुण वेलीच्या मदतीने वर आसनस्थ होऊन सावरीच्या खांबावरती पाणी ओतून, त्याच्या बुळबुळीतपणावर शिक्कामोर्तब करून, उत्साही तरुणाईला खांब्यावरती चढण्यास प्रवृत्त करतो.

एकमेकांची मदत घेऊन आणि साथीदारांच्या खांद्यावरती उभे राहून तरुण आपल्या चापल्य कौशल्याच्या आधारे हा पवित्रखांब चढण्यासाठी अपयश येत असतानाही प्रयत्नांची शिकस्त करून पूर्वीच्या काळी कंबरेला गुंडाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या धवल वस्त्राचा (वालो)मानकरी होतो. बुळबुळीत असणाऱ्या सावरी खांबावरती चढण्यात ज्याला झाडावरती चढण्याचे कौशल्य आणि ऊर्जा आहे तोच सफल होतो.

काले गाव एकेकाळी ऐतिहासिक घाटमार्गाच्या कुशीत वसलेला असल्याने तेथे पूर्वापार नाना जातीजमातींचे लोकसमूह आकर्षित झाले होते. परंतु आज वार्षिक सण, उत्सवाप्रसंगी चाकरमानी गावाकडे वळतात आणि गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विधीत सहभागी होतात आणि सांसारिक तापाव्यापातून मोकळा श्वास घेऊन लोकसंस्कृतीच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यात धन्यता मानतात आणि श्रमसाफल्याचा अनुभव घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT