Seven Sister Goddesses in India X
गोंयकाराचें मत

Seven Sister Goddesses: गोव्यातील सात बहिणींच्या पूजनाची वैविध्यपूर्ण परंपरा; सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्या

Seven Sister Goddesses History: सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाच्या पूजनाची परंपरा गोव्यातल्या लोकधर्मातल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्यांचे विलोभनीय असे दर्शन घडवत आहे.

राजेंद्र केरकर

Seven Sister Goddesses

भारतीय लोकमानसात पूर्वापार धर्मांचे बरेच मोठे प्रस्थ असून, इथल्या दैवत परिवारातून सांस्कृतिक आणि सामाजिक दर्शन घेण्यासाठी लोकधर्मात रूढ झालेल्या ग्रामदैवतांच्या एकंदर भारतभरातल्या आदिवासी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या असंख्य जनजातींत जी सात बहिणींच्या पूजनाची परंपरा आहे, ती खूप वैविध्यपूर्ण अशीच आहे.

कोकणात एकेकाळी पश्चिम किनारपट्टीवरच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या चौलच्या बंदराचा देशविदेशांतून येणाऱ्या व्यापारी यात्रेकरू यांचा संबंध होता. या गावात जी सात ग्रामदैवतांची मंदिरे आहेत ती सात बहिणींशी संबंधित असून, त्यांची चंपावती, शीतला, एकवीरा, पद्मावती, कळलागी, हिंगुळज आणि चतुर्सिती असा परिचय आहे. पूर्वाश्रमी चौल बंदर हे चंपावती म्हणून ओळखले जात होते. त्याला इथल्या सोनचाफ्याच्या वृक्षामुळे चंपावती हे नाव प्राप्त झाले असे मानले जाते. पूर्वी इथल्या सोनचाफ्याची पूजा भाविकांद्वारे केली जायची. कोकणाप्रमाणे दक्षिण भारतातल्या कर्नाटक आंध्रप्रदेश, तेलंगणा व तामिळनाडूत सात बहिणींची दैवत संकल्पना प्रचलित आहे.

जुन्या काळी जेव्हा एखाद्या रोगाची साथ यायची तेव्हा आजच्यासारखे वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्याकारणाने समाजाला लोकधर्माचा आधार होता आणि त्यातून त्यांनी रोगांच्या साथीतून आपली आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून लोकदेवतांची स्थापना केली. या देवता तामसी, रक्तलोलुप व रोगांच्या अधिष्ठात्या म्हणून नावारूपास आलेल्या असून त्यातली मरी किंवा शीतला ही देवीच्या आणि महामारीच्या रोगांची देवता म्हणून परिचित आहे.

तिला सात बहिणींच्या दैवत परिवारात मोठ्या बहिणीचे स्थान लाभलेले आहे. तेलंगणात पेड्डम्म, इसोदम्म, मरीअम्म, अंकम्म, एल्लम्म, नकुलम्म आणि अरिकम्म अशा देवतांना सात बहिणी म्हणून मानलेल्या असून, त्यांना भजणारा मोठा भक्तपरिवार आहे.

आंध्रप्रदेशात पोलेरम्म, अंकम्म, मुधिलम्म, दिल्ली पोलासी, बंगारम्म, माथम्म व रेणुका या नावांनी सात बहिणींना देवता स्वरूप मानलेले आहे.

पोलेरम्म ही देवीच्या रोगाची देवता असून, तिची अवकृपा होऊ नये म्हणून तिचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कर्नाटकातल्या म्हैसुरात सात बहिणींचा देवता परिवार मरीभगिनी म्हणून ओळखला जात असून त्यांची पूजा रोग निवारण व्हावे यासाठी केली जाते. तापाची दैवता म्हणून बिसलमरी, दम्याच्या विकारापासून मुक्ती लाभावी यासाठी गुर्रलमरी, मातीच्या भांड्याची देवता म्हणून केलमरीचे पूजन केले जाते.

या तीन देवतांच्या परिवाराबरोबर हिरी, सरूगेरे, मरी, चामुंडीश्वरी आणि उत्तनहळी अशा चार देवतांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या सात बहिणींचा पोट्टू राझू हा पुरुष देव, त्यांचा भाऊ किंवा पती म्हणून मानला जातो. तामिळनाडूतल्या कोइंबतूरमध्ये सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाची मंदिरे असून, तिथल्या लोकधर्मात या देवतांसमोर नतमस्तक होणारा मोठा भक्तजनसमुदाय आहे. सेनाकटची अम्मन, कोली अम्मन, उलकिरनी अम्मन, अकारी अम्मन, वंछी अम्मन, सेली अम्मन, आणि कुंथन अम्मन अशी या सात बहिणींची नावे असून, ऐनार हा त्यांचा भाऊ मानलेला आहे. शक्तिरूपिणी देवी पार्वतीशी या सात बहिणी संबंधित असून, तिच्यापासून त्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.

गुजरातात सात बहिणीची दैवत संकल्पना रूढ असून त्यात अवाल, जोगाल, तोगाल, होलबाय, बीजबाय, सोसाय आणि खोडियार अशा नावांनी त्या वंदनीय ठरलेल्या आहेत. सात बहिणीचा दैवत परिवार देशातल्या प्रदेशानुसार बदलत असून, बऱ्याच ठिकाणी त्यांना शीघ्रकोपी असल्याचे मानलेले आहे आणि त्यासाठी त्यांची अवकृपा होऊन आपणास नुकसान सोसावे लागू नये म्हणून भाविक त्यांच्या पूजनासंदर्भात सतर्क राहायचे. सात बहिणीच्या दैवतांपैकी फूल माता ही रोगांची देवता म्हणून पुजली जाते. उर्वरित सितला, बडी, पनसाही, गुसुलिया, कंकर आणि मलबाई यांचाही संंबंध विविध रोगांशी असून, रोग निवारण होण्यासाठी त्यांची पूजा भाविक करत होते.

कृत्तिकापुंज हा तारका समूह असून, आकाशात दर्शन होणाऱ्या कृत्तिकांनी शिव-शक्तीपुत्र कार्तिकेयाचे पालन केल्याचे मानले जाते. या कृत्तिका सात बहिणी म्हणून परिचित असून त्यांचा विवाह सात भावांशी झाल्याचे मानले जाते. एकदिवस सात ऋषींनी या सात बहिणीतल्या अरुंधीत वगळता अग्नीशी संबंध प्रस्थापित केल्याचा संशय घेऊन सहा बहिणींची घरातून हकालपट्टी केल्याची लोककथा रूढ आहे. गोव्यातल्या लोकधर्मात सात बहिणी आणि त्याच्या एकुलत्या एका भावाची कथा पूर्वापार प्रचलित आहे.

या सात बहिणींची नावे निश्चित कोणती होती याबाबत आजतागायत ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही आणि त्यामुळे या सात बहिणीच्या दैवत परिवाराच्या नावात भिन्नता पाहायला मिळते. परंतु भावाचे नाव मात्र खेतलो किंवा खेतोबा असे प्रामुख्याने मानले जाते. काहीजणांच्या मते ज्या सात बहिणी आपल्या भावासमवेत घाटावरून डिचोली महालातल्या मये गावातल्या वण्डयार येथे ऐरावताच्या पाठीवर बसून आल्या, त्यात केळबाय, सातेरी, शीतला देवी मयेत स्थायिक झाल्या, तर लईराय शिरगावी, मोरजाय मोरजी, जुयजाय जुवे आणि मिराबाय म्हापशात गेल्या. त्यांचा भाऊ खेतोबा मये जवळच्या वायंगिणीत स्थायिक झाला असे मानले जाते.

सात बहिणीत केळबाय ही ज्येष्ठ असल्याने तिने वण्डयार येथे आल्यावरती खेतोबाला अग्नी आणण्यासाठी मये गावात पाठवला. परंतु तो बराच वेळ आला नसल्याने, तिने लयरायला खेतोबाची चौकशी करण्यास पाठवला असता, तो गावात समवयस्क मुलांबरोबर खेळत असलेला दृष्टीस पडला. त्याच्या या कृत्याने म्हणे लईरायला राग आला आणि तिने खेतोबाच्या कंबरेत लाथ हाणली. त्यामुळे खेतोबा कंबरेत वाकलेल्या स्थितीत वायंगणीत मूर्तीस्वरुपात स्थायिक झाला.

या साऱ्या प्रकाराला आपण जबाबदार असल्याचे मानून केळबाय मुळगावला गेली. डिचोलीतल्या मुळगावची ग्रामदेवता ही देवी चैत्रात पेठेत बसून पारंपरिक मार्गाने मये येथे येते. मयेहून केळबाय मुळगावला निघते. त्या रात्री माल्याची जत्रा होते. या जत्रेत मध्यरात्रीला प्रज्वलित मातीचा महाकाय दिवा मस्तकी धारण व्रतस्थ भाविक आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवतो.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पंचमीच्या रात्री देवस्थानचा पुजारी लईराय देवीचे प्रतीक असणारा धातूचा कलश मस्तकी धारण करून धगधगत्या निखाऱ्यावरून चालत गेल्यानंतर व्रतस्थ भाविक हजारोंच्या संख्येने प्रवेश करतात. अग्निदिव्य करणाऱ्या लयराय देवीची जत्रा केवळ गोव्यातच नव्हे तर दक्षिण कोकणातल्या व्रतस्थ भाविकांना निखाऱ्यांवरून चालण्यास प्रवृत्त करते. सात बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एका भावाच्या पूजनाची परंपरा गोव्यातल्या लोकधर्मातल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्यांचे विलोभनीय असे दर्शन घडवत आहे. सात बहिणींची पूजन परंपरा भारतीय लोकधर्माशी असलेल्या ऋणानुबंधांची प्रचिती आणून देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT