मधू य.ना.गावकर
चंदनाचे झाड सुपीक जमिनीत चांगले वाढते, पण त्याला सुगंध कमी असतो. जे खडकाळ डोंगरावर वाढते, त्याला वास जादा असतो. चंदनाचे लाकूड वजनाने सोने धातूप्रमाणे जड असते. त्या लाकडाच्या खालोखाल सागवान, सिसम मारट, चिंच, शिरस, जांभा लाकडालाही वजन असते.
निसर्गाने आपल्याला अनेक आभूषणे दिली आहेत, ती पाहून माणूस आश्चर्यचकित होतो. वृक्ष, झुडपे, वेलींना पाहिल्यास त्यावर दिसणारी फुले, फळे, त्यांच्यातील सौंदर्य, दरवळ, आंबट, तुरट, गोड, कडू असे अनेक अनुभव माणसांच्या डोक्यात शिरतात. नाकाला सुगंधाचा चांगला वाईट परिणाम जाणवतो. फळातील कडू, गोडपणाची जिभेला चव जाणवते. सुरंग, केवडा, सोनचाफा, मोगरी, जाई, कस्तुरीमृगाची आठवण करून देतात. आंबा, फणस, ऊस, कैरी, चिंच, बोरे, कोकम, ओटम,आंबाडा, लिंबू आंबटपणाची जाण देतात. कार्वी, कांदळ, तिरडा, सुरंग, जास्त मध देणारी फुले. निसर्गाने अशा फुला फळांशिवाय अतिसुवासिक वृक्षही जन्मास घातले आहेत. त्यात चंदनाच्या वृक्षाचा समावेश होतो.
हिंदू संस्कृतीत चंदनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राम, कृष्ण यांच्या कपाळी चंदनाचा टिळा पहायला मिळतो. विष्णूला तुळस, पारिजातक आणि चंदन प्रिय आहे. महादेवाला भस्म, बेल, रुई, मंदार, बकुळी आवडते. दिगंबररुपी ब्रह्मदेवाला रात्री फुलणारे ब्रह्मकमळ आणि पिवळी हळद आवडते. हे सारे जरी वेगवेगळ्या रुपात, रंगात आणि वासात असले तरी त्या सर्वांचा कर्ता करविता धनी पाणी हा द्रव आहे. या पाण्यानेच पृथ्वीवर जैविक संपदेला जन्म दिला आहे. मात्र, वैज्ञानिकांनी वनस्पतींचा अभ्यास केल्याने त्या औषधी असल्याचे सिद्ध झाले.आषाढी, कार्तिकी एकादशीला संतांची वारी पंढरपूरला जाताना तुळशीची माळ, कपाळी चंदनाचा टिळा प्रत्येक वारकऱ्याने लावलेला पहायला मिळतो.
कुंभमेळा आणि शिवरात्रीला कपाळी भस्म आणि रुद्राक्षांची माळ भाविक घालतात, असे दिसून येते. फुला-फळांचा सुगंध आणि चव जरी वृक्षांच्या मोहरातून जन्म घेऊन आली तरी चंदन वृक्ष स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देतो. म्हणूनच बौद्ध ध्यानाच्या विठ्ठलाने त्या चंदनाला आपल्या कपाळावर स्थान दिले असावे? तशाच प्रकारे महादेवाने आपल्या मस्तकात गंगेला स्थान दिले आहे. चंदन वृक्षाचे रोपटे दुसऱ्या रोपाच्या सहाय्याने वाढते. हा निसर्गाचा अजब प्रकार आहे.असाच प्रकार पक्ष्यांतील कावळा आणि कोकिळेबाबत आहे. चंदनाचे प्रमाण दक्षिण भारतातील राज्यांत जास्त आहे. इतर राज्यांत चंदनाचे प्रमाण कमी आहे.
तरी कावेरी आणि गोदावरीच्या पट्ट्यात ती अति प्रमाणात पहावयाला मिळतात.पुण्यातील स्मृतीवनाच्या परिसरातही चंदन लागवड केली आहे. कालिदासाने रघुवंश आणि ऋतूसंहारात मलयगिरी पर्वताच्या वर्णनात तमालवृक्षाबरोबर चंदनवृक्षालाही महत्त्व दिले आहे. चंदनाच्या पानाफुलांना सुगंध येत नाही, तरीही एखादे झाड दिसताच लोक वास घेतात. या झाडाचे रहस्य म्हणजे ते परिपूर्ण होण्यात ४० ते ५० वर्षे जावी लागतात. त्यानंतर त्याच्या खोडाला व फांद्यांना सुवास भरण्यास सुरुवात होते. तो उंचीने १५-२० मीटर वाढतो. साल काळपट तपकिरी रंगाची बनते, खोडाकडून फुटणाऱ्या फांद्या नाजूक असून जमिनीकडे वाकतात. पानांचा रंग हिरवा दिसतो. पावसाळा सुरू होताच त्याला तपकीरी लालसर फुलांचे गुच्छ दिसू लागतात. पाकळ्या चार असून मध्ये पुंकेसर असतो. फळे पक्व होईतो हिवाळा सुरू होतो.
फळे पिकल्यावर जांभूळ रंग धारण करतात. जांभूळ, करवंद, हासळ, चार, कण्हेर, फातरफळ, संगम, कुसडी, भेसड ही फळे जांभळी असतात. हा रानमेवा पक्ष्यांचा चारा आहे. संस्कृतमध्ये चंदनाला सुगंध, अरबी भाषेत चंडल किंवा संडल, ग्रीकमध्ये सॅटेलॉन, इंग्रजीत सॅंडलवूड, वनस्पती शास्त्रीय नाव सॅटॅलम अल्बम म्हणजे आपल्या शरीरातून सुगंध देणारा दुसरा वृक्ष नाही. चंदनाच्या सालीला आणि बाहेरील सफेद लाकडाच्या तपकिरी पिवळ्या भागाला सुगंध येतो. चंदनाचे झाड सुपीक जमिनीत चांगले वाढते, पण त्याला सुगंध कमी असतो. जे खडकाळ डोंगरावर वाढते, त्याला वास जादा असतो.
चंदनाचे लाकूड वजनाने सोने धातूप्रमाणे जड असते. त्या लाकडाच्या खालोखाल सागवान, सिसम मारट, चिंच, शिरस, जांभा लाकडालाही वजन असते. चंदन, सिसम लाकडापासून मूर्ती, रथ, हार्मोनियम बनवतात. चंदनाच्या लाकडापासून लोक गंध बनवतात.त्याला पित म्हणतात. सफेद लाकडाला श्रीखंड म्हणतात. लाकडाचा औषधासाठीही उपयोग करतात. कफ-डोकेदुखी, हृदयविकार, ताप अशा आजारांच्या नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. चेहऱ्यावर मुरमे आल्यास मोहरीचे तेल आणि चंदन मिश्रणाने चेहऱ्याला लावतात. अति तहानेसाठी चंदनाची पावडर शहाळ्याच्या पाण्यात मिसळून पिण्यास देतात.
चंदनाचे लाकूड होमहवन, आणि मनुष्यप्राण्याला अग्नी देताना वापरतात. रामायणातील पंचवटी, मलयगिरी,अरण्यकांड, किष्किंन्धाकांड, अयोध्याकांड भागाच्या लिखाणात चंदनाचा उल्लेख आढळतो. महाभारतात द्रौपदी पांडवांचे वर्णन करताना म्हणाली होती की, हे भरत कुलोत्पन्न पुत्रांनो मी तुम्हाला चंदनाप्रमाणे सुवासिक आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी पाहिले होते. पण आज तुम्ही वनवासाला जाताना मलीन झालेले पाहून मी दुःखी झाली आहे. त्या काळातही लोक चंदनाचा वापर कोरीवकामासाठी करत होते.
चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळी चंदनाला मौल्यवान वस्तू म्हणून पाहिले जात होते. भारतातील रोमन कॅथलिक त्यांच्या उत्सवाच्या वेळी चंदनाचा टिळा लावतात. तामीळनाडूतील नागापट्टणम, तिरुविली मिलालाई विलीनाथर देवाचे भक्त चंदनाची पूजा करतात. देवांचा राजा इंद्र नंदनवनात पांच वृक्षांना महत्त्व होते, त्यात चंदनवृक्षाचा समावेश होतो, असे पुराणात सापडते. मात्र मलयगिरी पर्वताच्या कुशीत राहणारे आदिवासी भिल्ल लोक अन्न शिजवण्यासाठी सरपण म्हणून चंदनाची सुकी लाकडे वापरतात. नशिबवान म्हणावेसे वाटते त्या आदिवासी लोकांना?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.