Rama Kankonkar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख: मूळ प्रश्न अनुत्तरित! रामा काणकोणकरवर हल्ला कोणी केला?

Opinion: रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला जरूर विशिष्ट हेतूने आहे. मारेकऱ्यांच्‍या सूत्रधाराचा शोध घेणे आणि त्यामागे जर काही राजकीय हेतू असतील तर त्यांची उकल करणे हे पोलिसांचे कर्तव्य ठरते.

गोमन्तक डिजिटल टीम

‘एसटी’ समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या २४ दिवसांनंतर त्यांनी आपल्यावरील हल्ल्याचे सूत्रधार म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची नावे घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे भाजपने एकसंघरित्या काणकोणकर यांचा समाचार घेतला. भाजपचे सारे नेते, त्यात एसटी समाजातील नेत्यांचाही समावेश आहे. सतत रामा काणकोणकर यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

भाजपच्या प्रमुख नेत्यांनी, विशेषतः मुख्यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री खंवटे यांनी या प्रकरणामागचा बोलवता धनी कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, रामा काणकोणकर यांनी पोलिसांना जी जबानी दिली, त्यात कोणाही राजकीय नेत्याचे नाव घेतले नव्हते. परंतु, रामा काणकोणकर यांना आता नवी राजकीय खळबळ निर्माण करायची आहे, ही खळबळ निर्माण करण्यासाठी त्यांना कोणीतरी फूस दिली आहे.

हे सरकारविरोधातील कारस्थान आहे, असा काहीसा आरोप सावंत-खंवटे, तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे. भाजपने अगदी ठरवून आणि सूत्रबद्धरित्या आपल्या आरोपांचा रोख रामा काणकोणकर यांच्यावर ठेवलाच; परंतु अज्ञात कोणा राजकीय सूत्रधाराच्या नावे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रामा काणकोणकर यांनी कोणाही राजकीय नेत्यावर सूत्रधार म्हणून अंगुलीनिर्देश केला नव्हता, असा खुलासाही पोलिसांनी तात्काळ केला आहे.

गोव्यातील पोलिस दलाचे राजकीयीकरण सर्वश्रुत आहे, त्यामुळे आपल्या राजकीय साहेबांना श्रीमानस्वच्छतेचे प्रमाणपत्र देण्याची त्यांना घाई झाली आहे, हे समजू शकते. रामा काणकोणकर यांची इस्पितळात जाऊन जबानी घेतल्यानंतर त्यांनी कोणाही राजकीय सूत्रधाराचे नाव घेतलेले नाही. ही मारझोड वैयक्तिक कारणामुळे झाली होती, अशी माहिती याच पोलिसांनी गोव्यातील काही माध्यमांना-सरकारला निकट असलेल्या एका वृत्तवाहिनीला सोईस्कररीत्या दिली होती.

त्यानंतर रामा काणकोणकर यांच्या पत्नीला तत्काळ खुलासा करावा लागला. या वृत्तसंस्थेने पोलिसांना उद्धृत करून दिलेली काणकोणकर यांची जबानी निखालस खोटी असल्याचे मत काणकोणकर यांच्या कुटुंबीयांतर्फे देण्यात आले. त्यावेळची पोलिसांची भूमिका आणि आताही सरकारची सारवासारव करणारी प्रवृत्ती जवळजवळ सारखीच आहे. याच दरम्यान रामा काणकोणकर यांनी सरकारवर केलेल्या आरोपांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

हल्‍ल्‍यापूर्वीचा तो व्‍हिडिओ आहे. रामा काणकोणकर यांनी यापूर्वीही सरकारमधील काही मंत्र्यांची नावे घेऊन त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरून रामा काणकोणकर यांनी मध्येच आपली भूमिका बदलली; ते सारखे आपले वक्तव्य बदलत आहेत; रामा काणकोणकर यांना राजकीय ईप्सित साध्य करायचे आहे, असे जे प्रश्न उपस्थित होतात, त्यांना परस्‍पर उत्तर मिळते. शिवाय पोलिसांनी खरोखरच या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले तर त्यांना खरे गुन्हेगार सहज सापडू शकतात.

शिवाय रामा काणकोणकर यांच्या वक्तव्यातील बोलवता धनी कोण, असा प्रश्न उपस्थित करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला असला तरी मूळ प्रश्न अनुत्तरित राहतो. तो म्हणजे रामा काणकोणकरवर हल्ला कोणी केला? या प्रकरणाचे सुसंगत सूत्र लावायचे ठरवले तर दिसून येईल, की रामावर झालेला हल्ला हा काही उत्स्फूर्त आणि कोणीतरी गुंडांनी वैयक्‍तिक डूक धरून केलेला नाही.

रामा काणकोणकर यांच्या गाडीला अपघात झाला आणि काही गुंडांशी त्यांचा वाद झाला होता, त्यामुळे हा हल्ला वैयक्तिक होता, असे पोलिसांनी सुरवातीला काढलेले अनुमान फारसे खरे मानता येणार नाही. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि त्यामागे जरूर काही सूत्रधार असू शकतात. शिवाय रामा काणकोणकर किंवा इतर समाजकार्यकर्ते अलिकडे जरूर काही प्रकरणे धसास लावत आहेत.

विशेषतः काही तथाकथित विकास विषयक प्रकल्पांवर त्यांनी आवाज उठवला आहे. या प्रकरणांतील धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचले असल्याची शक्यता समाजमाध्यमांवर व्यक्त झाली आहे. काही महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी जमीन व्यवहार आणि विकासविषयक कामांमध्ये विशिष्ट रस घेतला आहे आणि त्यांनी गुंडही पोसलेले आहेत, अशी खुली चर्चा समाजात सुरू आहे.

असे हल्ले होतात, तेव्हा या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करणे पोलिसांचे कर्तव्य ठरते, दुर्दैवाने पोलिसांनी तसे केलेले नाही. रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला जरूर विशिष्ट हेतूने आहे. मारेकऱ्यांच्‍या सूत्रधाराचा शोध घेणे आणि त्यामागे जर काही राजकीय हेतू असतील तर त्यांची उकल करणे हे पोलिसांचे कर्तव्य ठरते. सध्या या प्रकरणाला जो राजकीय रंग दिला जातोय, तो दुर्दैवी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Beef Smuggling: आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

टीम इंडियाचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वेस्ट इंडीजला सलग 10व्या कसोटी मालिकेत चारली पराभवाची धूळ; दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी केली बरोबरी VIDEO

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

Viral Post: एका रात्रीसाठी 60 हजार, ओला - उबेर नाही; पर्यटकांची गोव्याकडे पाठ व्हिएतनाम, थायलंडला पसंती? पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT