Ganesh Chaturthi Best Status Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

Ganesh Festival: त्या काळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत जमीनअसमानाचा फरक असला तरी टिळकांनी ज्या उद्दिष्टाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता ते उद्दिष्ट बदललेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

त्या काळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत जमीनअसमानाचा फरक असला तरी टिळकांनी ज्या उद्दिष्टाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता ते उद्दिष्ट बदललेले नाही. ते उद्दिष्ट म्हणजे सामाजप्रबोधनाचे. हे पाहिल्यास आजची बरीच मंडळे गणेशोत्सवाच्या मुख्य उद्दिष्टापासून दूर जायला लागली आहेत असेच म्हणावे लागेल.

पूर्वी गणेशोत्सव मंडळे ही फक्त मुख्य शहरापुरतीच मर्यादित असायची. पण आता या मंडळाचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले दिसत आहे. ही बाब चांगली असली तरी यामुळे काय साधले, हेही बघावे लागेल. याद्वारे खरेच सामाजिक प्रबोधन होते का, याचेही अवलोकन करावे लागेल.

आजची बहुतेक गणेशोत्सव मंडळे ही सामाजिक प्रबोधनाऐवजी करमणूकप्रधान कार्यक्रमांवर भर देत आहेत. यामागचे कारण ते ‘लोकांची आवड’ असे सांगत आहेत.

पण ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग यांसारख्या संपूर्णपणे करमणुकीवर आधारित असलेल्या कार्यक्रमांचे स्थान गणेशोत्सव होऊच शकत नाही. या कार्यक्रमाला आपले असे स्थान आहे हे जरी मान्य केले तरी गणेशोत्सवातील कार्यक्रमांचे एक वेगळे स्थान असते हे विसरता कामा नये.

प्रबोधन करणारी नाटके वा तत्सम कलेचा प्रकार गणेशोत्सवात चालू शकतो. पण लोकांची आवड हे कारण देऊन गणेशोत्सवाच्या उद्दिष्टांना फाटा देणारे कार्यक्रम आयोजित केले तर त्याला अर्थच राहत नाही. शेवटी आवड ही निर्माण करायची असते आणि गणेशोत्सवाचे हेच तर काम असते.

काही वर्षांपूर्वी मी आमच्या फोंड्याच्या बुधवारपेठ गणेशोत्सव मंडळात प्रा. रमेश सप्रे यांचे व्याख्यान ठेवले होते. ते जेव्हा मंडपात आले तेव्हा मंडपातील उपस्थिती अगदीच नगण्य होती. ते पाहून इथल्या लोकांना अशा कार्यक्रमात रस दिसत नाही, असे म्हणत तिथून जाण्याची तयारी सप्रेंनी सुरू केली.

तेव्हा मी त्यांना तुम्ही व्याख्यान सुरू करा नक्कीच लोक येतील असा विश्वास व्यक्त केला. इथल्या लोकांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवड नाही हे जरी खरे असले तरी आवड निर्माण करणे हे आपल्याच हातात असते हेही तेवढेच खरे आहे, असेही त्यांना सांगितले.

त्यांना माझे म्हणणे पटले आणि त्यांनी व्याख्यान सुरू केले. अपेक्षेप्रमाणे गर्दी वाढतच गेली आणि मंडप अर्ध्याहून अधिक फुल्ल झाला. त्याचा परिणाम पुढील वर्षी दिसून आला. पुढच्या वर्षी प्रा. दिलीप बेतकीकर यांच्या व्याख्यानाला मंडप आधीच फुल्ल झाला होता.

असे काहीतरी बुद्धिवादी उपक्रम आखणे हेच गणेशोत्सव मंडळाचे कार्य असते. मळलेल्या, रुळलेल्या मार्गावरून वाटचाल करणे म्हणजे गणेशोत्सवाच्या मूळ हेतूशी वंचना करण्यासारखे असते हे विसरता कामा नये.

त्याचप्रमाणे सध्या गणेशोत्सव मंडळात ‘लॉटरी’ ज्यांना ‘देणगी कुपन्स’ या गोंडस नावाने ओळखले जाते, त्याचे प्रस्थ फारच बोकाळले आहे. या संदर्भात दैनिक ‘गोमन्तक’ने २००६साली आयोजित केलेला एक परिसंवाद आठवतो. लॉटरी म्हणजे जुगाराचा एक प्रकार असल्यामुळे तो सार्वजनिक गणेशोत्सवात त्याज्य असावा असा परिसंवादाचा विषय होता.

या परिसंवादात गणेशोत्सव मंडळाचा एक पदाधिकारी म्हणून मीही सामील झालो होतो. लॉटरी म्हणजे ‘देणगी कुपन्स’ हा जुगाराचा भाग असूनसुद्धा तो मंडळाला उत्पन्न देण्याचा एक स्रोत ठरतो असा सूर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आळवला होता.

त्यात अर्थात मीही होतो. गणेशोत्सव मंडळे सरकारी मदतीशिवाय जनतेच्या मदतीवर चालणाऱ्या संस्था असल्यामुळे त्यांना उत्सवाला लागणारा निधी स्वबळावर तयार करावा लागतो. त्यामुळे मग निधी जमा करण्याकरता वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात;

लॉटरी हा त्यांपैकीच एक. तरीसुद्धा गणेशोत्सव मंडळाच्या दृष्टीने हा चुकीचा मार्ग आहे यात शंकाच नाही. त्यामुळे यंदापासून आमच्या बुधवारपेठ गणेशोत्सव मंडळांनी लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव मंडळाचा खरा आधार म्हणजे भक्तांची निष्ठा आणि या भक्तांनीच मंडळांना भरभराटीला आणले आहे.

यामुळेच पुण्याचे दगडूशेठ हलवाईसारखे गणेशोत्सव मंडळ आज देशातील एक अग्रगण्य संस्था बनली आहे. या मंडळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्याचबरोबर हे मंडळ बाराही महिने विविध उपक्रम राबवून या निधीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते हेही तेवढेच खरे आहे.

महाराष्ट्रात आज अशी बाराही महिने विविध उपक्रम राबविणारी अनेक सधन गणेशोत्सव मंडळे आहेत. महाराष्ट्राचे सोडा आमच्या फोंड्याच्या मंडळाचेच उदाहरण घ्या. आमच्या मंडळाचे बेतोडा येथे स्वतःचे देऊळ आहे. त्याद्वारे बाराही महिने विविध उपक्रम राबविले जातात.

हे पाहता आज मंडळाची जबाबदारी वाढायला लागली आहे यात शंकाच नाही. लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव मंडळांकडे पाहायला लागले आहेत आणि हा लौकिक जोपासण्याची नैतिकता मंडळांची आहे यातही दुमत असण्याचे कारण नाही.

म्हणूनच कार्यक्रम आयोजित करताना वा एखादा उपक्रम राबविताना मंडळांनी या लौकिकाचा विचार प्रथम करायला हवा. काही चुका होत असल्यास त्या त्वरित दुरुस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. वर्षभर विधायक उपक्रम राबविण्याचेही बघायला हवे. असे झाले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे योग्य कार्य करत आहेत, असे म्हणता येईल, एवढे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT