कौस्तुभ नाईक
आयबेरियन द्वीपकल्पात स्पेन आणि पोर्तुगालमध्ये साम्राज्यविस्तारासाठी निर्माण झालेल्या स्पर्धेतून, पोप अलेक्झांडर (सहावे) यांनी जगाची विभागणी केली. १४९४मध्ये ही विभागणी रेषा पश्चिमेकडे हलवल्यामुळे ब्राझील ते आशिया हा विस्तीर्ण भूभाग पोर्तुगिजांच्या वाट्याला आला. या विस्तारात राजा जॉनचा तिसरा पुत्र, ‘हेनरी द नेव्हिगेटर’चे योगदान पायाभूत ठरले. गादीवर हक्क सांगण्यापेक्षा त्याने सागरी मार्ग शोधण्यात अधिक रस दाखवला आणि अनेक सागरी मोहिमांना बळ दिले.
मार्गक्रमणासाठी खलाशी किनाऱ्यावर खुणेसाठी ‘पाद्रांव’ (क्रूस) उभारत असत. १४८२मध्ये डायगो कांव कॉंगो नदीपाशी पोहोचला आणि आफ्रिकेत पोर्तुगीज सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली. मोझांबिक आणि अंगोला या प्रमुख वसाहतींसह गिनी-बिसाउ, सांव टोम व प्रिन्सेप येथेही त्यांनी बस्तान बसवले. १९७४पर्यंत टिकलेल्या या साम्राज्याने सोने, हस्तिदंत आणि मसाल्यांच्या व्यापारावर पकड मिळवली. साखर, कापूस व तंबाखूच्या मळ्यांमध्ये राबण्यासाठी आफ्रिकेतून गुलामांची मोठी निर्यात केली जाई.
या गुलाम व्यापारात गोव्यातील म्हामाय कामत यांसारख्या स्थानिक व्यापारी घराण्यांचाही सहभाग असल्याचे पुरावे आढळतात. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगालला आफ्रिकेत आपल्या अखत्यारीखाली असलेला भूभाग वाढविण्याची इच्छा झाली व त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केले. पण ह्या प्रयत्नांना स्थानिकांतर्फे बऱ्यापैकी विरोध झाला.
ह्या प्रतिकाराला तोंड देण्यासाठी पोर्तुगीज नौदलाच्या प्रमुख फेरेरा दे आल्मेदा ह्यानं पोर्तुगीज गोव्याच्या गव्हर्नर जनरलला टेलिग्राफ पाठवून सुमारे चारशे ‘सच्चे मराठे’ सैनिक पाठविण्याची विनंती केली. हे मराठे म्हणजे सत्तरी, डिचोली ह्या नव्यानंच पोर्तुगीज अखत्यारीत आलेल्या नव्या काबिजादी भागांतले सैनिक होते. त्यात प्रामुख्याने सत्तरी तालुक्यातल्या राणेंचा समावेश होत. राणेंकडे सत्तरीची मोकासदारी होती (आणि आजही आहे). ह्या काळात मराठा सैनिकांविषयी जे काही प्रचलित समज होते, त्यांच्या बळावरच त्यांना सरकार दरबारी सैन्यात नोकरी वगैरे मिळत असे.
आणि ह्या नोकरीचा भाग म्हणून त्यांना इतर वसाहतीत जावं लागणं हेही काही नवं नव्हतं. ह्या आधी मराठा सैनिकांच्या तुकड्या आफ्रिका, तिमोर, मकाऊ इथे पाठवण्यात आल्या होत्या. पण ह्यावेळी परिस्थिती बदलली होती. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज साम्राज्याचं वैभव कमी होत चाललं होतं. त्यामुळे जे बदल आले त्यांत सैन्यावरच्या खर्चात कपात करण्यात आली होती. सैनिकांमध्ये असंतोष होता कारण त्यांचे पगार कमी झाले होते.
तसंच, सत्तरीच्या जमिनीच्या कारभारात स्थानिक सारस्वत कारकुनांचा वाढत जाणारा फेरफार हेही एक कारण होतं. नुकत्याच आफ्रिकेतून परतलेल्या एका मराठा तुकडीनं आपले तिथले अनुभव व्यक्त केल्यावर तर तिथं जाणं शक्यच नाही असा पवित्रा सैनिकांनी घेतला. आफ्रिकेत पाठविलेल्या सैनिकांची सर्वांत मोठी समस्या होती की हिंदू सैनिकांसाठी वेगळं स्वयंपाकघर नव्हतं आणि इतर लोकांबरोबर बसूनच त्यांना जेवावं लागत असे.
ह्यामुळे त्यांच्या जातीशुचितेचा प्रश्न निर्माण झाला. समुद्र पार करणं हेही धर्मामुळे वर्ज्य होतं. ह्या धर्तीवर जेव्हा सैनिकांना आफ्रिकेत पाठवायची वेळ आली तेव्हा त्याचं रूपांतर बंडात झालं. १८९५साली दादा राणेंनी सुमारे ९०० सैनिक घेऊन पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ते लगेच शमवण्यात पोर्तुगीज सरकारला यश आलं.
पण ह्या बंडाचा धसका त्यांनी घेतला. १८९७साली जेव्हा परत मराठा सैनिकांना आफ्रिकेत पाठविण्याचा आदेश मंजूर झाला तेव्हा त्यांना पगार वाढवून मिळाला; आणि हिंदू सैनिकांच्या चालीरीतींत पोर्तुगीज फेरफार करणार नाहीत असं आश्वासनही दिलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.