Manish Jadhav
शनिवारवाडा हा मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे मुख्य निवासस्थान होते. याचे बांधकाम थोरले बाजीराव पेशवे यांनी 10 जानेवारी 1730 रोजी सुरु केले होते. हा वाडा पेशव्यांच्या शौर्याचे आणि पुण्याच्या श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो.
या वाड्याचे बांधकाम पूर्ण होण्यास सुमारे दोन वर्षे लागली. त्यावेळी याच्या बांधकामासाठी सुमारे 16110 रुपये खर्च आला होता. वाड्याचा पाया दगडाचा आहे, तर वरचे मजले विटांचे बांधले होते.
शनिवारवाड्याला पाच मुख्य दरवाजे आहेत, त्यापैकी 'दिल्ली दरवाजा' हा सर्वात मोठा आणि भव्य आहे. या दरवाजावर हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी लोखंडी टोकदार खिळे बसवलेले आहेत, जे आजही पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
वाड्याच्या मध्यभागी असलेल्या बागेत 'हजारी कारंजे' आहे. हे त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कमळाच्या आकाराच्या या कारंज्यातून एकाच वेळी हजारो जलधारा उडत असत, असे सांगितले जाते.
शनिवारवाड्याच्या भिंती एका दुर्दैवी घटनेच्या साक्षीदार आहेत. 1773 मध्ये पाचवे पेशवे नारायणराव यांची हत्या याच वाड्यात झाली होती. त्यांच्या मृत्यूपूर्वीची 'काका मला वाचवा' ही हाक आजही इतिहासात अजरामर आहे.
1828 मध्ये या वाड्याला मोठी आग लागली होती, जी सलग सात दिवस धगधगत होती. या आगीत वाड्याचे सातही मजले आणि आतील लाकडी कोरीव काम पूर्णपणे खाक झाले. आता केवळ वाड्याचा पाया आणि दगडी तटबंदी शिल्लक आहे.
आज शनिवारवाडा हे पुण्याचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र आहे. वाड्याच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी 'लाईट अँड साऊंड शो' आयोजित केला जातो, ज्यातून पेशवेकालीन इतिहास उलगडला जातो.
स्थानिक लोककथांनुसार, अमावास्येच्या रात्री आजही या वाड्यातून काही आवाज ऐकू येतात असे म्हटले जाते. यामुळे शनिवारवाडा हा भारतातील सर्वात 'हॉन्टेड' ठिकाणांच्या यादीतही अनेकदा चर्चेत असतो.