Goa Liberation Day
गोवा मुक्तीदिनाचा ताजा इतिहास लक्षात घेताना आपल्याला कळते ते हे की, समाजवादी नेते व स्वातंत्र्यसेनानी डॉ. राममनोहर लोहिया देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगून विश्रांतीसाठी आपले गोमंतकीय मित्र डॉ. जुलियाना मिनेझीस यांच्याकडे त्यांच्या असोळणा, केपे येथील निवासस्थानी डॉ. मिनेझीस यांच्या विनंतीवरून आले होते; पण येथील जुलमी पोर्तुगीज राजवटीकडून जनतेवर चाललेला जुलूम, जबरदस्ती, दहशत आणि अन्याय त्यांच्या कानावर येताच ते खवळून उठले.
त्यांनी विश्रांतीचा बिछाना बाजूला केला आणि सशस्त्र पोर्तुगीज सैनिकांसमोर निवडक लोकांसह मडगाव शहरात उभे ठाकले. त्यांनी आपल्या तेजस्वी कर्तृत्वाने गोमंतकीयांच्या हृदयास चेतना व चैतन्याची ठिणगी पेटवली तो दिवस होता १८ जून १९४६ याचा परिणाम डॉ. लोहियांना अटक करून तुरुंगवासात डांबण्यात आले. गोव्याची मुक्ती आणि स्वराज्य यासाठी डॉ. लोहिया यांनी जी मशाल पेटवली होती. त्याची परिणती अखेर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या सैनिकी कारवाईमुळे दमण व दीव या संघप्रदेशांसह गोवा मुक्त होण्यात झाली.
आपला भारत देश १९४७ साली स्वतंत्र होऊनही गोवेकरांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. यावर मग कालांतराने खरमरीत टीका व्हायला सुरुवात झाली, पण पं. नेहरू यांनी हा प्रश्न शांततेने सुटावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले प्रयत्न, त्यांनी यासंबंधी संसदेत दिलेले आश्वासन आणि गोमंतकीय शिष्टमंडळास केलेले संयम व विवेकाचे आवाहन या साऱ्या गोष्टी केंद्रातील पुराभिलेख खात्याने समोर आणल्यामुळे विरोधकांचा विरोध कमी झाला; पण अजूनही काहीजण वादासाठी हा मुद्दा पुढे करतात, त्याला इलाज नाही.
आता प्रत्येक १९ डिसेंबर हा गोवा राज्याचा मुक्तिदिन म्हणून शासकीय पातळीवर धूमधडाक्यात साजरा केला जातो व या प्रदेशाची चाललेली चौफेर विकासाची घौडदौड जनतेच्या लक्षात आणून दिली जाते. १९८७ साली मिळालेल्या घटक राज्यामुळे हा विकास अधिक गतीने होत आहे.
गोवा परकीयांच्या जोखडातून मुक्त झाला, तेव्हा येथील परिस्थिती काय होती बरे? गोवा मुक्त झाला, तेव्हा येथील एकूण लोकसंख्या साडेपाच ते सहा लाखांच्या घरात होती. येथे शेती-बागायती- कुळागरे आणि खाण उद्योग विशेष तेजीत होते. ग्रामीण भागातील सगळे रस्ते मातीचे होते. काही प्रमुख शहरांतील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण वगळता सर्वत्र मातीच्या रस्त्यांचे साम्राज्य होते. दूध-दुभते, चिकन, मटण, मासे, भाज्या, फळफळावळ इ. वस्तू मुबलक नसल्या, तरी लोकसंख्येच्या मानाने पुरेशा होत्या.
मूळ ३७०२ चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ व मानवी वस्तीने युक्त अशी ३७४ गावांची भूमी असलेले हे राज्य आता ६० वर्षानंतरच्या कालावधीत जमीनअस्मानाचा फरक जाणावा, इतके बदलून गेले आहे. मुख्य म्हणजे मूळच्या लोकसंख्येत तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पूर्वी शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील लोकांचा विविध प्रकारच्या कामासाठी भरणा होता, पण आता येथे हे ‘विश्वचि माझे घर’ याची छोटी आवृत्ती दृष्टीस पडत असून आता येथे गुजरात, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड आदी राज्यांतील लोकांनीही गोवा व्यापून टाकला आहे.
भरीस भर म्हणून किनारपट्टी भागांत विदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे व त्यात दिवसेंदिवस भर पडत आले. शिवाय सरकारने येथे बारमाही पर्यटनाची सोय केल्यामुळे वर्षाकाठी ५० ते ७५ लाख पर्यटकांची येजा सुरू असते. बसभाडे वाढले, रेल्वेचे दर वाढले, विमानाचे दर आकाशाला भिडले तरीही पर्यटकांची संख्या वाढतच आहे.
अर्थात त्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यटन सफरी आयोजित करणे, हॉटेल निवासाची सोय, खाणे-पिणे या साऱ्यांमुळे सरकारसह संबंधितांच्या महसुलामध्ये भरीव वाढ होत असली, तरी येथील मत्स्यव्यवसाय, शेतीची सर्व प्रकारची कामे, बांधकामे, रस्त्यांच्या दुरुस्तीपासून केशकर्तनालयापर्यंत सर्व कामे परप्रांतीयांच्या हाती गेल्यामुळे किंबहुना आपल्या ‘सुशेगाद’ वृत्तीमुळे ती त्यांच्या हातात गेल्यामुळे मूळ गोवेकरांची स्थिती जणू ‘न घरका न घाटका’ अशी झाली आहे.
मूळ ‘गोंयकारा’स भाड्याने चांगले घर मिळणे, चांगले घर बांधणे मुश्कील होत असले तरी सरकारच्या वरदहस्तामुळे परप्रांतीयांना ते सहजासहजी शक्य होते, हे आपल्या लक्षात येते व यात विशेषतः आपली ‘व्होट बँक’ तयार करणे हा राजकारण्यांचा मुख्य हेतू असतो, हे आता अनेक शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील मतदारसंघातही आपल्याला दिसून येते. इथपर्यंत हे ठीक आहे. असे आपण समजून चाललो, तरी गोवा मुक्त झाला; गोवेकर खऱ्या अर्थाने मुक्त झाला का? हा लाखमोलाचा प्रश्न मात्र आपणास चिंतन करायला लावतो.
याला फक्त येथे वाढत असलेले परप्रांतीयांचे लोंढे हेच कारण नसून विविध राज्यांतून आणि विदेशांतून येत असलेले नागरिक आपल्याबरोबर अनिष्ट व समाजाचे संतुलन बिघडवून टाकणाऱ्या ज्या गोष्टी बरोबर घेऊन येतात व संधी मिळताच त्याचा यत्रतत्र सर्वत्र फैलाव करतात हे होय. याची सुरुवात मग अमली पदार्थांची देवघेव, अनैतिक व्यवहार, गुंडगिरी, स्थानिकांना हाताशी धरून होणारी बेकायदेशीर बांधकामे, डोंगरकापणी, जंगलतोड, काँक्रीटीकरण, जमीन हडप प्रकरणे, कायदेशीरपेक्षा जास्त बेकायदेशीर जंगले उभी राहणे आदींवर होत असतो.
कॅसिनो ही काही गोव्याची संस्कृती नव्हे, पण महसुलाच्या नावाखाली सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे. गेल्या अनेक वर्षांचा ‘सनबर्न’चा अनुभव चांगला नसतानाही आता हे प्रकरण पंचायत, सरकार यांच्या अरेरावीमुळे न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. छोटे प्रकल्प काय किंवा मोठे प्रकल्प काय ग्रामपंचायत, सरकार यांना न जुमानता प्रत्यक्षात येऊ लागले आहेत. ‘भूतानी ’ प्रकल्पाला लोकांचा विरोध, पंचायतीचा विरोध; तरीही भूतानी प्रकरणाचे भूत बाजूला करायला अजूनही टंगळमंगळ केली जात आहे. एका बाजूने सरकारला प्रदूषणमुक्त प्रकल्पच राबवणार, जनतेला त्यापासून त्रास होणार नाही, असे सांगायचे व कुणाचे तरी हित जपण्यासाठी तडजोड करायची, याला काय म्हणावे बरे?
येथे मला वानगीदाखल २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी गोवा मुक्तीदिनी सुवर्णमहोत्सवाच्या वेळी जनतेला दिलेला ‘संदेश’ आठवतो. ते म्हणाले होते, ‘गोमंतकीयांच्या प्रत्येक प्रकल्पाला आणि विकासाला होणारा विरोध गोव्याला आदर्श राज्य बनविण्यास मदत करणार नाही. परंतु त्यामुळे गोव्याच्या समृद्धीच्या मार्गात तो विरोध अडथळा ठरेल. आपली स्वतंत्र प्रतिमा आपण राखली पाहिजे. परंतु ते काम विकास आणि आपल्या भावी युवा पिढीचा बळी देऊन होता कामा नये. याचा प्रत्येकाने विचार करावा.’ पण गोवा मुक्तिदिनी कामत यांनी दिलेला ‘संदेश’ कितपत प्रत्यक्षात आला. विकासाच्या नावाखाली गोव्याची वाटचाल नैतिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या विध्वंसाकडे तर चालली नाही ना?
या पार्श्वभूमीवर गोवा मुक्त झाला पण खऱ्या व बऱ्या अर्थाने गोवेकर मुक्त झाला का? तो मुक्त श्वास घेत असेल पण साऱ्या अशिष्ट, अनिष्ट, अरेरावी गोष्टींमुळे त्याला श्वास कोंडला तर नाही ना? याचे सामान्य जनतेपासून सुशिक्षितांपासून आणि राजकारण्यांपासून सत्ताधारी पक्षांपर्यंत सर्वांनी मुक्तचिंतन करणे गरजेचे आहे. त्यातून मग गोवेकरांना ‘भिवपाची गरज असा की भिवपाची गरज ना’ हे ही स्पष्ट होईल.गोवा मुक्तिदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.