पणजी: गोव्यातील तिसवाडी महाल सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातच पोर्तुगिजांच्या ताब्यात आणण्याच्या दृष्टीने आफोंस द अल्बूकर्क यांचे षड्यंत्र आणि नियोजन यशस्वी ठरले. पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या आणि प्राचीन काळात देशविदेशातल्या प्रवासी, यात्रेकरू व्यापारी यांना प्रवेशद्वार ठरलेल्या महालावर ताबा प्रस्थापित केल्यानंतर आफोंस द आल्बकर्कने आपल्याबरोबर असलेल्या पोर्तुगीज सैनिक आणि सरदारांना इथल्या रूपवान मुस्लीम स्त्रियांशी विवाहबद्ध होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
जेव्हा तिसवाडी महालावर पोर्तुगिजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले तेव्हा हेळे म्हणजेच आजचे ओल्ड गोवा हे राजधानीचे शहर म्हणून नावारूपाला आले होते. १५१० साली आफोंस द आलबुकर्कने (Afonso de Albuquerque) तिसवाडी महाल जिंकल्यावर जेव्हा हेळे शहरात प्रवेश केला तेव्हा आपणाला जी विजयश्री प्राप्त झालेली आहे, त्याला सेंट कॅथरिनचे आशीर्वाद कारणीभूत असल्याची भावना त्यांच्यात होती.
आणि त्यासाठी हेळेत मांडवी नदीच्या किनारी सेंट कॅथरीनचे कपेल बांधले. १५३४साली पोप पॉल तृतीय याने या कपेलास कॅथेड्रलचा दर्जा दिला. तत्कालीन राज्यपाल जॉर्ज काब्राल यांच्या आदेशाने १५५०साली त्याचा विस्तार करण्यात आला.
हेळे हे ग्रामनाम ‘हळ्ळी’ या कन्नड शब्दातून आले की कधीकाळी इथे मृण्मय स्वरूपात असणाऱ्या देवी पार्वतीच्या एलम्मा नावावरून एला म्हणून रूढ झाले हे निश्चित सांगणे कठीण आहे. मांडवी नदी किनारी वसलेले हे बंदर समृद्ध गाव गोव्यातल्या अन्य प्रांताशी आणि देशविदेशांशी जलमार्गाद्वारे जोडलेले होते.
त्यामुळे प्राचीन काळापासून या गावाच्या संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यात आली असावी. आज जेव्हा जेव्हा बांधकाम करण्यासाठी उत्खनन केले जाते तेव्हा तेव्हा या परिसरात गतकालीन ऐतिहासिक वास्तू, तटबंदीचे जीर्णावशेष ठिकठिकाणी सापडत आहेत.
गोपकपट्टणम या राजधानीच्या शहराचा विध्वंस अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने केल्यावर कालांतराने हेळे या मांडवी किनाऱ्यावरती वसलेल्या शहराला राजधानीचा दर्जा लाभला. गोवा कदंब नृपती जयकेशी प्रथम याने हेळ्याला ब्रह्मपुरी स्थापन करून, ज्ञानवंतांना आश्रय दिला तो ११०७ साली.
सरस्वतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. परंतु हेळ्यावर जेव्हा मुसलमानांचे शासन आले तेव्हा त्या मूर्तिभंजकांनी सरस्वतीच्या मंदिराची नासधूस केली. विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात जेव्हा गोव्याची भूमी आली तेव्हा माधव मंत्री यांनी गोमंतेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी माधव तीर्थाची उभारणी केली. आजही त्याचे संदर्भ आढळतात.
गोवा कदंब, विजयनगर राजवटीत मांडवी नदी किनारी वसलेल्या हेळ्याचे महत्त्व कालांतराने वृद्धिंगत होत गेले. १४४०मध्ये होन्नावरच्या मलिक हुसेन याने गोवा जिंकल्यावर आपली राजधानी हेळे येथे वसवली. त्यानंतर जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गोवा आला. तेव्हाही राजधानीचा लौकिक हेळ्यालाच प्राप्त झाला. तिसवाडी महालात ज्या चाळीस गावांचा समावेश व्हायचा त्यात एळा किंवा हेळे या गावाचा संदर्भ आढळतो.
आदिलशाहीचा पराभव केल्यानंतर जेव्हा तिसवाडी महालावरती पोर्तुगीज सत्ता स्थापन झाली तेव्हा नव्या सरकारने राजधानीचा सन्मान हेळ्यालाच दिला होता. सोळाव्या शतकात हेळे गावाचे नामकरण ‘सिदाद दे गोवा’(Cidade de Goa - गोव्याचे शहर) असे केल्यानंतर तेथील मंदिरे, मशिदी पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे सत्र त्यांनी व्यापक प्रमाणात राबवले. मुस्लिमांच्या ताब्यात असलेला घोड्याचा व्यापार त्यानंतर जवळपास दोनशे वर्षे पोर्तुगिजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि घोड्यांच्या व्यापारातून प्रचंड पैसा कमावला.
पैसा, प्रतिष्ठा सहजासहजी मिळाल्याने त्याची नशा त्यांच्या डोक्यात शिरली. आर्थिक सुबत्तेमुळे व्यसने, चंगळवाद बोकाळला. त्यामुळे मदिरा आणि मदिराक्षीची विलक्षण चटक त्यांना लागली. अनैतिक स्त्री समागम आणि लैंगिकतेतील कहरामुळे गुप्तरोगासारख्या व्याधीने हां हां म्हणता पोर्तुगीज अधिकारी, सरदार, सैनिक आणि अन्य लोकांचा बळी गेला. डायगो दा कोत यांच्या मते इथे श्रीमंत पोर्तुगीज सरदारांनी जे वारेमाप वैभव भोगले, त्यातील एकसुद्धा ‘फिदाल्ग’ (थोर) पुन्हा पोर्तुगालला पोहोचू शकला नाही. रोगराईमुळे येथील नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात मेले की त्यांचे दफन करण्यास जागा मिळणे मुश्कील झाले.
जेजुईट इतिहासकार फ्रान्सिस्को द सौझा याने आपल्या ‘ओरिएंत काँकिस्तादो’ या ग्रंथात गोवा शहराचा जो र्हास झाला त्याला या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्रोतात हत्तीचे पिल्लू मरण पावले आणि त्यात ते कुजल्याकारणाने पेयजल प्रदूषित झाले आणि हे प्रदूषित पाणी पिऊन रोगराई पसरल्याने शहराचा र्हास झाला, असे मत नोंदवले आहे.
एकेकाळी उंच प्रासाद, भव्य इमारती, बाजारपेठा यामुळे गजबजलेले हे शहर त्याच्या नावलौकिकामुळे यशोशिखरावर असताना रोगराईमुळे विस्मृतीत जाऊ लागले आणि शेवटी १८४३ साली हेळ्याहून पोर्तुगीज साम्राज्याची नवी राजधानी ताळगावातल्या एका वाड्यावरती नेली जी ‘पणजी’ या नावाने प्रसिद्धीस पावली.
युसुफ आदिलशहाच्या राजवाड्याचे प्रवेशद्वार आणि तेथे आढळलेले जीर्णावशेष हे गोव्यातल्या कदंब राजवटीतल्या गतवैभवाची साक्ष देतात. पोर्तुगिजांनी इथे सेंट पॉल महाविद्यालयांची स्थापना करून ख्रिस्ती पंथ आणि संस्कृतीच्या शिक्षणाची सोय उपलब्ध केली. सेंट फ्रान्सिस झेवियर या महाविद्यालयात काही काळ स्थायिक झाला आणि ख्रिस्त पंथाचा प्रचार सक्तीने आरंभला. १८३२साली महाविद्यालयाची इमारत जमीनदोस्त झाली.
जेझुइट पंथीयांनी हेळ्यातल्या हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या समस्त खाणाखुणा नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अन्याय, अत्याचाराचे सत्र आरंभले. इन्क्विझिशन संस्थेद्वारे इथला चेहरामोहरा त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला. हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे, ब्रह्मपुरी यामुळे मांडवी किनाऱ्यावरचे हे पवित्र स्थळ समूळ नष्ट केले.
मारुती, भूमिका, नारायण, दत्तात्रेय, रवळनाथ आदी देवदेवतांची एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. आज खांडोळा येथील महागणपती संस्थानातली जुनी मूर्ती ही पूर्वाश्रमी एळाला होती, तेथून ती दीपवती बेटावर नेण्यात आल्याचे संदर्भ मिळतात. याशिवाय दुर्गादेवीचे मंदिर या गावची शान होती.
ब्रह्मपुरी येथील शिवाची उपासना गोवेश्वराच्या नावाने व्हायची, तेथील प्राचीन मूर्ती नष्ट करण्यात आली. सोळाव्या शतकात आर्चबिशप आलेक्सो द मिनेझीसच्या आदेशाने होली ट्रीनिटी चर्चचे जेथे बांधकाम करण्यात आले तेथे शिवाचे प्राचीन मंदिर आणि पवित्र तळी होती. इथे असलेल्या मंदिराचा विध्वंस केल्यावर जे जीर्णावशेष सापडले होते, त्याचे संदर्भ पोर्तुगीज दप्तरात मिळाले आहेत.
गजलक्ष्मीचे शिल्प बॉम जेझसच्या परिसरात सापडले होते. हेळे ग्रामसंस्थेत प्रभु, मुंगी आडनावांची कुटुंबे ‘गावकर’ होती. आज हेळे गावाचा उल्लेख ‘ओल्ड गोवा’ असा होत असून सेंट ऑगस्टीन मनोरा सांतामोनिका प्रार्थनागृह आणि आशिया खंडातील नन्सचे शिक्षण देणारे पहिले विद्यालय बासिलिका ऑफ बॉम जीझस, से कॅथेड्रल अशा वास्तूंमुळे हेळे शहराचे रूपांतर तत्कालीन पोर्तुगीज सरकारने ‘पूर्वेकडचे रोम’ म्हणून करण्यात यश संपादन केले.
एकेकाळी गोरक्षनाथाच्या मठाचे अवशेष या पवित्र भूमीत होते, त्याचे समूळ उच्चाटन करण्यात आले. आज युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत येथील भव्यदिव्य ख्रिस्ती प्रार्थनागृहांचा समावेश करण्यात आलेला आहे. जगभरातून लाखो पर्यटक ओल्ड गोवा येथे बासिलिका ऑफ बॉम जीझसच्या दरवर्षी येतात. आज ग्रामपंचायत क्षेत्रातला ८००.५४ हेक्टरातला हा गाव मूक, बेशिस्त आणि अराजक शहराच्या रूपात विकसित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.