पणजी: गोमंतकीय लोकजीवन आणि संस्कृतीत हळद या वनस्पतीला आणि तिच्या कंदाला अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. औषधी गुणधर्माने युक्त हळदीचा इथल्या अन्नसंस्कृतीतही सनातन काळापासून उपयोग केला जात आहे. गोव्यात कधीकाळी हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती, त्याला या वनस्पतीच्या कंदाला आणि पानाला असलेली मागणी कारणीभूत ठरली होती.
‘झिंजी बरेसी’ वनस्पती कुळातली हळद शास्त्रीय परिभाषेत ‘कुर्कुमा लाँगा’ या नावाने ओळखली जाते. कुर्कुमा प्रजातीत हळदीच्या सुमारे शंभर जाती आहेत. हळदीच्या वाळवलेल्या जमिनीखाली वाढलेल्या खोडांना ‘हळकुंड’ म्हटले जाते. अशी हळकुंडे दळून हळदीची जी भुकटी तयार केली जाते, तिचा दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. हळदीच्या कोवळ्या पानांपासून सुगंधी, पिवळ्या रंगाचे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. गोव्यातल्या दैनंदिन आहारात, शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न पदार्थांत हळदीचा वापर मसाल्यातील एक प्रमुख घटक म्हणून केला जातो.
आयुर्वेदात त्वचा, यकृत, फुफ्फुस यावरील उपचारासाठी हळदीचा वापर करण्याची परंपरा आहे. हळदीच्या भुकटीच्या वापराने जखम लवकर बरी होते, त्याचप्रमाणे जखम होऊन जेव्हा रक्त भळभळ वाहू लागते, तेव्हा ते थांबवण्यासाठी ती प्रभावीपणे कार्य करते. हळद व चुन्याचे द्रावण एकत्र करून, जी तांबड्या रंगाची पूड प्राप्त व्हायची तिची पूर्वी प्रामुख्याने कुंकू तयार करण्यासाठी वापर केला जायचा. भारतात इसवी सनाच्या पूर्वी तीन हजार वर्षे हळदीची लागवड केली जात असल्याचे संदर्भ आढळतात.
हळद, अन्न, सौंदर्यप्रसाधने, पारंपरिक विधी, औषधे, रंग यासाठी भारतीय लोकमानसाने पूर्वापार वापरलेली असली तरी हळदीच्या जखमा भरून काढण्याच्या गुणधर्मासाठी १९९५साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी पेटंट मिळवला. भारतीय वैज्ञानिकांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढाई देऊन अमेरिकन शास्त्रज्ञांनी मिळवलेले पेटंट रद्द करण्यात यश मिळवले होते. महाराष्ट्रात सांगली आणि वाईत कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
त्यामुळे सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी पूर्वापार ख्यात आहे. आमटी-भाजी व अन्य तिखटमिठाचे अन्नपदार्थ बनविताना रंग व खमंगपणा येण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. गोव्यातल्या धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहारात हळदीचे महत्त्व उल्लेखनीय आहे. पूजा व मंगल संस्कारात कुंकवाच्या जोडीने हळद वापरली जाते. त्यामुळे ती सौभाग्यकारक मानली जाते. त्याचप्रमाणे भूतप्रेतबाधा दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. गोव्यात प्रत्यक्ष विवाहाचा सोहळा होण्यापूर्वी वर आणि वधूला पाटावर बसवून वाटीत हळदीची भुकटी घेऊन ती सुवासिक तेलात कालवून वर-वधूच्या अंगाला आंब्याच्या पानांनी हे मिश्रण लावण्याची विधियुक्त परंपरा होती. डोके, पाय, गुडघे, बाहू आणि कपाळ यांना चढत्या क्रमाने हळद लावतात आणि त्यानंतर स्नान घालतात. याप्रसंगी बायका हळदीची सुरेल स्वरात गाणी म्हणतात.
लग्नमंडपात दिवा लावताना जी लोकगीते गातात, त्यात हळदीचा प्रामुख्याने उल्लेख येतो. त्यावेळी दिव्यासंदर्भात गाताना स्त्रिया म्हणतात:
थिसून दियो चालीन गेला
हरडेच्या माटवा गेला
या गाण्यातली ‘हरड’ म्हणजे हळद. गोव्यातल्या जातीजमातीत हळदीची लोकगीते गाण्याची परंपरा असून, पोर्तुगीज राजवटीत धर्मांतरीत झालेल्या ख्रिस्ती समाजातही हळदीविषयी लोकगीते गायली जात होती. अंगाला हळद लावण्याच्या पद्धतीला ‘हळदुणी’ म्हणतात. खंडोबा देवाचा भंडारा म्हणून हळद उधळण्याची व देण्याघेण्याची प्रथा रूढ आहे. देवतांनाही हळद-कुंकू अर्पण केले जाते. गोव्यात पशुपालक धनगर जमातीच्या लोकधर्मात हळदीला विशेष स्थान लाभलेले आहे. लग्न समारोहात मांडवालाच नव्हे तर मुसळाला, जात्याला बांधण्यासाठी हळकुंडे वापरतात. हळकुंडे बांधणे याला पारंपरिक महत्त्व असून, हळदीला संततिदायक, सौंदर्यवृद्धिकारक मानली जाते. गोव्यात वरवधू यांच्याबरोबर उत्सवप्रसंगी देवालाही हळद लावण्याची ‘हळदुणे’ ही परंपरा प्रचलित असून, तिला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभलेले आहे.
हळदीच्या कंदाप्रमाणे वनस्पतीलाही गोव्यातल्या लोकसंस्कृतीत उल्लेखनीय स्थान लाभलेले आहे. पावसात हळदीच्या कंदाला जी पाने फुटलेली असतात, त्यांचा वापर नागपंचमीच्या सणाला ज्या पातोळ्या उकडीपासून तयार करतात, त्यात गूळ-खोबऱ्याचे मिश्रण घालून त्यांना खास हळदीच्या पानात लपेटून वाफेवरती उकडतात.
अशा पातोळ्यांचा नागपंचमीच्या सणाला आस्वाद घेण्याची गोव्यातल्या हिंदूची परंपरा, धर्मांतरीत झालेल्या ख्रिस्ती समाजाने कायम ठेवली. त्यामुळे श्रावण महिन्याच्या आसपास साजऱ्या होणाऱ्या अवर लेडी ऑफ अॅजम्प्शन सायबिणीच्या १५ ऑगस्टच्या फेस्ताला पातोळ्यांचा आस्वाद हमखास घेतला जातो. पूर्वीच्या काळात धगधगत्या निखाऱ्यांवरती हळदीच्या पानांत लपेटून बांगडा मासा भाजण्याची गोव्यात प्रथा होती. गणेशचतुर्थीच्या सणात गौरीपूजनासाठी हळदीचे रोप तांब्याच्या कलशात किंवा बांबूच्या छोट्या टोकरीत घालून पुजले जाते. तसेच काही गावात गणेशचतुर्थीच्या काळात गौरीमातेची कृपा लाभावी म्हणून सुवासिनी स्त्रिया जो ‘हौशे’ नावाचा विधी करतात, त्यावेळी नैवेद्य अर्पण करण्यासाठी हळदीच्याच पानांचा पात्र म्हणून वापर करतात.
सत्तरीतल्या केरी गावात वास्तव्यास असणारा ‘हळिद’ समाज शेकडो वर्षांपूर्वी दरमजल करत डोंगरवाटांनी मोर्ले गडावरच्या ‘हळदीचे पाणी’ या बारमाही पेयजलाची सुविधा असणाऱ्या निसर्गरम्य स्थळात आला असल्याचे मानले जाते. आजही या झऱ्याच्या सभोवताली रानटी हळदीच्या वनस्पतींची पैदासी झालेली आहे. लोकवस्तीच्या परिसरात जी आंबेहळद आपसूक रुजते, तिचे कंद लोणच्यासाठी वापरले जातात. रानात उगवणारी रानहळद औषधी गुणधर्माने युक्त असल्याने, तिच्यातल्या कर्करोगावरती प्रभावी तत्त्वांसाठी त्या कंदाचा औषध तयार करण्यावरती शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. गोव्यात ठिकठिकाणी असलेली ‘हळदीचे पाणी’, ‘हळदीचो गुणो’, ‘हळदीचे मळ’.. आदी स्थलनामे इथल्या लोकजीवनात आणि संस्कृतीत हळदीचे असलेले महत्त्व, अधोरेखित करत असतात. अन्नाचा घटक, औषधी तत्त्व, रंगदायक हळदीच्या गुणधर्मांसाठी गोव्यातल्या नानाविध समाजाने, तिचा केलेला वापर इथल्या लोकमानसाचे जगणे समृद्ध, संपन्न करत असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.