अवित बगळे
गोवा माहीत नाही, असा माणूस जगात शोधूनही सापडणार नाही. जगभरात आणि देशातही गोव्याला प्राधान्य दिले जाते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो येथील निळाशार समुद्र आणि मऊ, मुलायम वायू. सागराशी खेळणाऱ्या चांदीचे नाट्य पाहण्यासाठी, आतिथ्याची व अगत्याची नांदी ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर झालेले असतात. हे असे सारे मोहक असले तरी या वैभवाला प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीचे गालबोट लागू लागले आहे.
समुद्राच्या लाटांमध्ये आता एक अदृश्य धोका वाढत चालला आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) अलीकडेच केलेल्या एका संशोधनात गोव्यातील समुद्राच्या पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. हे संकट केवळ समुद्री जीवांपुरते मर्यादित नसून माणसाच्या आरोग्यासह संपूर्ण पर्यावरणासच ते ग्रासेल, अशी भीती आहे.
समुद्रात प्लास्टिकचा कचरा सापडणे ही आज नवीन बाब राहिली नाही. मात्र या प्लास्टिकचे अतिसूक्ष्म तुकडे मासळीमार्गे माणसांच्या पोटात पोहोचत आहेत.
ही निश्चितपणे धक्कादायक बाब आहे. सागरी मत्स्यजीवांचा वापर आहारात केल्याने हे प्लास्टिकचे अतिसूक्ष्म तुकडे मानवी शरीरात पोहोचू लागल्याचे एनआयओतील संशोधकांनी संशोधनाअंती सिद्ध केले आहे. सुमारे दशकभर हे संशोधन सुरू होते.
एनआयओचे संचालक डॉ. सुनीलकुमार यांनी गोव्यातील साळ, मांडवी व झुआरी या प्रमुख नद्यांचे पाणी तपासले. या सगळ्या नद्या अंतिमतः अरबी समुद्रात विसर्जित होतात त्यामुळे समुद्राच्या पाण्यात सापडणाऱ्या अतिसूक्ष्म प्लास्टिक कणांचा उगम तपासण्यासाठी नद्यांतील पाणी तपासण्यात आले आणि हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
हे कमी होते म्हणून की काय, गोव्यातील नागरिकांना पुरवले जाणारे नळाचे पाणी सूक्ष्म प्लास्टिकच्या कणांनी दूषित असल्याचे एनआयओ आणि दिल्लीस्थित पर्यावरण संस्था टॉक्सिक्स लिंक यांच्या संयुक्त अभ्यासातून समोर आले. ‘क्लीन ड्रिंकिंग वॉटर: अ पाइप ड्रीम?’ या अभ्यासात गोव्यातील विविध भागांतील नळाच्या पाण्याचे ११ नमुने तपासण्यात आले.
या नमुन्यांमध्ये एकूण २८८ सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले, ज्यामध्ये म्हापशाचा नमुना सर्वाधिक दूषित होता. या अभ्यासाच्या निष्कर्षावरून स्पष्ट होते की, गोव्यातील पिण्याच्या पाण्यात सूक्ष्म प्लास्टिकचे अंश आहेत, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
सूक्ष्म प्लास्टिक म्हणजे ५ मिमीपेक्षा लहान आकाराचे प्लास्टिकचे कण, जे पाण्यात सहज मिसळतात आणि शरीरात प्रवेश करू शकतात. या कणांचे मुख्य स्रोत म्हणजे पीव्हीसी पाईप्स, प्लास्टिक कचरा, आणि नद्यांमध्ये सोडलेले सांडपाणी. शुद्धीकरण केल्यानंतरही पाण्यातले हे कण पूर्णपणे दूर होत नाहीत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
एनआयओतील संशोधक महुआ सहा यांनी या विषयावर विपुल संशोधन केले आहे. एनआयओच्या संशोधनानुसार, गोव्यातील साळ खाडीमध्ये सूक्ष्म प्लास्टिकचे प्रमाण चिंताजनक आहे आणि हे मानवी आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकते.
अभ्यासात साळ खाडीतील पाणी, गाळ आणि समुद्री जीवांमध्ये सूक्ष्म प्लास्टिकचे प्रमाण तपासण्यात आले. पाण्यात सरासरी ४८ औ१९ कण प्रति लीटर आढळले, तर गाळात ३९५०औ९३० कण प्रति किलोग्रॅम आढळले. समुद्री जीवांमध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण आढळणे याचा अर्थ त्यांनी अन्नसाखळीत प्रवेश केला आहे, असा होतो.
केवळ मत्स्याहारी माणसावरच याचा परिणाम होऊन थांबेल, असे नाही; उलट निसर्गाची संपूर्ण अन्नसाखळीच बिघडण्यास सुरुवात झाली आहे. प्रारंभिक दृश्य परिणाम म्हणजे मानवी आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम. पचनसंस्था, प्रजनन क्षमता आणि इतर शारीरिक प्रक्रियांवर या सूक्ष्म कणांचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
प्लास्टिकची पिशवी, बाटली, कापड किंवा अन्य कोणतीही वस्तू समुद्रात गेली की, ती पूर्णपणे नष्ट होत नाही. वाऱ्याच्या झोताने, सूर्याच्या तापाने, लाटांच्या धडकेने ती हळूहळू फुटत जाते, तुकडे पडत जातात. हे तुकडे इतके लहान होतात की ते डोळ्याला दिसत नाहीत; ५ मिमीपेक्षा लहान. यांनाच ‘मायक्रोप्लास्टिक’ किंवा मराठीत ‘अतिसूक्ष्म प्लास्टिक कण’ असे म्हणतात.
गोव्याचा किनारपट्टी भाग म्हणजे पर्यटकांची स्वर्गभूमी. दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात, राहतात, खातात, पितात, मौजमजा करतात आणि त्यांच्या मागे राहतो प्लास्टिक कचरा; तोही कित्येक टन. बाटल्या, पिशव्या, चमचे, स्ट्रॉ, फुगे, थर्माकोलची ताटे अनेकदा हे थेट समुद्रात फेकले जाते किंवा किनाऱ्यावर राहून हळूहळू वाहून समुद्रात पोहोचते. पावसाळ्यात नद्यांमधूनदेखील शहरातील प्लास्टिक कचरा समुद्रात मिसळतो. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांतून आणि दोऱ्यांतूनही प्लास्टिक समुद्रात जाते. हे सर्व जमा होऊन, कालांतराने अतिसूक्ष्म कणांच्या रूपात समुद्रात विराजमान होते.
हे सूक्ष्म कण इतके बारीक असतात की लहान मासे, शंख-शिंपले सहजपणे त्यांना अन्न समजून गिळतात. मग हे कण त्यांच्या शरीरात राहतात. मोठे मासे, हे छोटे जीव खातात. आपण मोठे मासे खातो आणि म्हणूनच, हे प्लास्टिक शेवटी आपल्या पोटात पोहोचते.
हे अतिसूक्ष्म प्लास्टिक कण शरीरात गेले की त्यांचे पचन होत नाही. ते आतड्यांमध्ये, रक्तात किंवा अगदी मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सूज, हॉर्मोनमध्ये बिघाड, प्रजननशक्ती कमी होणं, कधी कधी कर्करोगासारखे आजारही होण्याचा धोका असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांसाठी तर हे कण अधिक घातक असू शकतात. अजूनही अनेक बाबतीत वैज्ञानिक शोध सुरूच आहेत, पण हे निश्चित आहे की, हे कण शरीरासाठी निरुपद्रवी नाहीत.
आपल्या समुद्रात कितीतरी प्रकारचे मासे, कासव, डॉल्फिन, शिंपले आणि इतर सजीव आहेत. हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. पण जेव्हा प्लास्टिक त्यांच्या अन्नाचा भाग बनते, तेव्हा ही साखळीच ढासळते. शिंपले मरतात, लहान मासे मरतात, आणि त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मृतावस्थेत सापडलेले मासे आणि कासवांच्या पोटात प्लास्टिकचे तुकडे आढळले होते.
हे अतिसूक्ष्म प्लास्टिक कण आज ‘सूक्ष्म’ वाटत असले तरी त्यांचा परिणाम फार ‘मोठा’ आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.