मिलिंद म्हाडगुत
माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांचा आज स्मृतिदिन. मनोहरभाईंना जाऊन आज सात वर्षे झाली असली तरी आजही ते अनेकांच्या मर्मबंधातील ठेव बनले आहेत. ‘भाई आज असायला हवे होते’, असे अनेक जण आजही म्हणतत.
आज राज्यात भाजपचे सरकार आहे; पण भाजप जेव्हा कोणाच्या खिजगणतीत नव्हता तेव्हा मनोहरभाईच भाजपला राज्यात राजकीय अस्तित्व मिळवून देण्याकरता धडपडत होते.
१९९४साली भाजप-मगोची युती झाल्यामुळे भाजपला विधानसभेत प्रवेश करण्याची संधी प्राप्त झाली. वास्तविक ही युती होणार नव्हती. पण त्या वेळचे मगोचे सर्वेसर्वा रमाकांत खलप यांना मुख्यमंत्रिपदाची भाजपने म्हणजे मनोहरभाईंनी लालूच दाखविल्यामुळे ही युती होऊ शकली.
१९९१साली रवि नाईकांमुळे तोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास निसटल्यामुळे खलप नाराज होतेच. या नाराजीला ऊब देऊन पर्रीकरांनी भाजपला युतीत प्रवेश मिळवून दिला. आणि भाजपने चार आमदारासह दिमाखात गोवा विधानसभेत प्रवेश केला. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते त्या खलपांचाच निवडणुकीत पराभव झाला. त्या पराभवाला भाजपच कारणीभूत होता असे त्यावेळी म्हटले जात होते. पण इथून भाजपचा चढता आलेख तर मगोचा उतरता आलेख सुरू झाला एवढे मात्र खरे.
२००२साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या रवि यांनी कॉंग्रेसमध्ये जाणे तसेच २००५साली ‘विश्वासू’ म्हटले जात असलेल्या दिगंबर कामत यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून पर्रीकर सरकारला पदच्युत करण्यात हातभार लावणे हे पर्रीकरांच्या दृष्टीने मोठे धक्के होते.
पण हे धक्के पचवून पर्रीकर खंबीरपणे उभे राहिले.एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आपली इमेज तयार केली. विधानसभेतील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनू लागली. त्याचे फळ त्यांना २०१२साली मिळाले.
त्यावर्षी प्रथमच भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर आला आणि त्याचे पूर्ण श्रेय पर्रीकरांना जाते यात संशयच नाही. पर्रीकर मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यावेळी अल्पसंख्याकांनीसुद्धा भाजपला मतदान केले होते. त्या निवडणुकीत तोपर्यंत सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला फक्त नऊ जागा मिळाल्या होत्या. आणि तिथून जी कॉंग्रेसची घसरण सुरू झाली ती आजही कायम आहे.
यामुळे पर्रीकरांची एवढी ‘क्रेझ’ झाली की पंतप्रधान मोदींना त्यांना देशाचे तिसरे मानाचे संरक्षण मंत्रिपद द्यावे लागले. गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या एका नेत्याला देशाचे संरक्षण मंत्रिपद मिळावे यातच मनोहरभाईंची महानता अधोरेखित होते!
‘पर्रीकर म्हणजे गोव्याचा भाजप’ असे जे समीकरण झाले होते ते उगाच नव्हे. जेव्हा जेव्हा भाजपवर संकट आले तेव्हा तेव्हा पर्रीकरच भाजपच्या मदतीला धावून आले. २०१७सालचेच उदाहरण घ्या. यावर्षी भाजपचे फक्त तेरा आमदार निवडून आले होते. भाजपला सत्ता मिळणे शक्य नाही असेच सर्वांना वाटत होते.
पण आपले संरक्षणमंत्रिपद सोडून आलेल्या मनोहर भाईंनी होत्याचे नव्हते करून दाखवले. मगो, गोवा फॉरवर्ड, अपक्ष यांना घेऊन त्यांनी सरकार स्थापन करून आपली राजकारणावरची पकड सिद्ध केली. तारेवरची कसरत करीत हे सरकार चालवूनही दाखवले. म्हणूनच तर ते मृत्यूपर्यंत मुख्यमंत्री राहू शकले, अगदी शरपंजरी असूनसुद्धा यशस्वीपणे प्रशासन राबवू शकणारे पर्रीकर हे पहिले मुख्यमंत्री!
आम्ही काही चित्रपटनिर्माते इफ्फी गोव्यात आणला म्हणून त्यांचे अभिनंदन करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी ‘आणखी काही वर्षांत आपण गोवा चित्रपट निर्मितीचे हब करणार’ असे आम्हाला आश्वासन दिले होते. त्यांनी तसे केले असतेही.
पण दुर्दैवाने २००५साली त्यांचे सरकार कोसळले आणि हे आश्वासन हवेतच राहिले. त्यांची आठवणही तीक्ष्ण असायची. ते विरोधी पक्ष नेते असताना मी माझ्या कॉलेजमधल्या काही समस्यांबाबत त्यांना पत्र लिहिले होते.
त्यांनी ते लगेच शिक्षण संचालकाला पाठवून ‘यावर लगेच कृती व्हावी’ असा आदेश दिला होता. काही दिवसानंतर अशाच एका कार्यक्रमात भेटल्यावर, ‘तुझ्या त्या तक्रारीचं काय झालं?’ अशी चौकशीही केली होती.
फॅमिली राजला त्यांनी कधीच चालना दिली नाही. दिली असती तर त्यांचा पुत्र उत्पल कधीच म्हापशाचा आमदार झाला असता. आजचे प्रशासन पाहिल्यास पर्रीकरांची कमतरता खरेच भासते. कर्करोगाने त्यांचा वयाच्या अवघ्या ६३व्या वर्षी बळी घेतला नसता तर त्यांनी गोव्याला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवले असते यात शंकाच नाही.
गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पानावर आपले नाव कोरणाऱ्या या महान नेत्याच्या कार्यापासून आजचे राज्यकर्ते प्रेरणा घेतील आणि पर्रीकरांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी बनतील हीच गोव्याच्या या आधुनिक शिल्पकाराच्या सातव्या स्मृतिदिनी वंदन करत असताना अपेक्षा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.