दत्ता दामोदर नायक
एखाद्या देशात दुसऱ्या वेळी जाण्याचा आनंद फार सुखद असतो. काही वेळा दर्शनापेक्षाही पुनर्दर्शन सुंदर असते. ''You should not visit united states of America for the first time'', असे जवाहरलाल नेहरू म्हणायचे. अमेरिका प्रथमदर्शनी आवडत नाही पण द्वितीयदर्शनी आवडते असा माझाही अनुभव आहे.
दुसऱ्या भेटीत आपण ह्या देशाला अनोळखी नसतो. आपण ह्या देशाला ओळखतो. तो देशही आपली आठवण ठेवतो व आपल्याला ओळखतो. ‘हाय’, ‘हॅलो’ करतो. लिस्बोवा म्हणजेच लिस्बनमध्ये गेलो की आपण विशाल, विस्तृत अशा पणजी शहरातच आहोत असे वाटते. पणजी जवळून मांडवी नदी वाहते तर लिस्बनजवळून टागस नदी. लिस्बन हे सात डोंगरांचे शहर मानले जाते. हे शहर सॅन फ्रान्सिस्कोप्रमाणे डोंगर उतारावर वसले आहे. ग्रेडीयंटचे मूर्ख नियम इथे नाहीत.
लिस्बन शहराच्या भांगेत भांगतिळा असावा त्याप्रमाणे शहरातून पिवळ्या रंगाची ट्रॅम धावते. गोव्यातल्या शहरांतही आपण ट्रॅम आणल्या पाहिजेत. पूर्वी मुंबईत, कोलकोत्यात ट्रॅम्स होत्या. त्या बंद करायचा व मेट्रो बांधण्याचा निर्णय फार खर्चीक व चुकीचा होता. लिस्बोवा शहर हे बहुरूपी आहे. कामरूपी आहे. मायावी आहे. दर दिवशी लिस्बोवा आरशात पाहते आणि ‘आरशा, आरशा जगातील सर्वात सुंदर शहर मीच ना?’ असा प्रश्न आरशाला विचारते.
लिस्बोवा शनिवारी सकाळी आरशात पाहते तेव्हा फादो गाणारी गायिका त्याला दिसते. रविवारी लिस्बोवाला क्रिस्तीयानो रॉनाल्डो गोलकिपरला पाठ करून सायकल शूट मारून गोल करताना दिसतो. सोमवारी लिस्बोवाला बेलेची चर्चची वास्तू व त्याच्या लगतच असलेले पास्ता द बेलेम किंवा पास्ता द नाताल विकणारे दुकान दिसते. मंगळवारी लिस्बोवा आजुल्यांच्या निळ्या जगात बुडून जाते.
बुधवारी लिस्बोवा आरशात पाहते तेव्हा त्याला प्राक द कमर्शिअल चौकाशेजारचा रुआ द रेस्टॉरंट्स म्हणजेच रेस्टॉरंटचा रस्ता व तिथे ताजे, भाजलेले खमंग सामन मासे खाणारे खवय्ये दिसतात. गुरुवारी लिस्बोवाला आरशात टागस नदीच्या पात्रातील काटामारीन्स दिसतात. शुक्रवारी लिस्बोवा आरशात पाहते तेव्हा ‘थँक गॉड इट्स फ्रायडे’ म्हणत पोर्ट वाइनचे घोट घेत बाकालावा खात असलेल्या गिर्हाईकांनी खचाखच भरलेली ताव्हेर्नस् त्याला दिसतात.
लिस्बोवाला पिवळा, फिकट गुलाबी, गुलाबी व निळा रंग आवडतो. हे पेस्टल कलर्स लिस्बोवाच्या वास्तूंचे सौंदर्य शतगुणित करतात. लिस्बोवाला भेट दिल्यावर आल्फामात गेलेच पाहिजे. आल्फामा म्हणजे नेबरहूड. ह्या शब्दातला अल हा अरेबिक भाषेतून लिस्बोवाने उचलला. पोर्तुगालवर अनेक शतके मुसलमानांची राजवट होती.
लिस्बोवा शहरातील टागस नदीच्या पात्रात मरीना आहेत. मरीना म्हणजे यॉट्स (होड्या) पार्क करण्यासाठी पाण्यात भिंत उभारून केलेली राखीव जागा. गोव्यात मरीनाला विनाकारण विरोध होतो.
मरीनामुळे ना पर्यावरणाची हानी होते ना मत्स्योत्पादन घटते. मरीनामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळते. रोजगार निर्मिती होते. पोर्तुगालने आपल्या नाविक दलाच्या बळावर ब्राझिल, मोझांबिक, अंगोला, तिमोर व गोवा ह्या प्रदेशांवर राज्य केले.
भारताने मात्र इतिहासकालात नाविक दलाकडे दुर्लक्ष केले. द्वारकेचे कृष्ण, बलराम, दक्षिणेचे चोल राजे व छत्रपती शिवाजी हेच त्यातले सन्मान्य अपवाद. मुळात हिंदू धर्माने समुद्र पर्यटन हे पाप मानले. त्याचे कारण हे की बौद्ध धर्म भारतातून हद्दपार झाला होता पण शेजारील देशांत रुजला होता.
समुद्र पर्यटनाने हिंदू लोकांचे बौद्ध लोकांशी संबंध येऊ नये हाच हेतू समुद्र पर्यटनाला पाप मानण्यात होता. मागच्या भेटीत मी पोर्तो, कोईंब्रा, आल्फुबेराला भेट दिली होती. पण सिन्ट्रा पाहिले नव्हते. लिस्बोवाहून सिन्ट्रा गाव तासाभराच्या अंतरावर आहे. सिन्ट्रा हे परीकथेतील गळून जमिनीवर पडलेले पान आहे.
सिन्ट्राचा पिवळा, लाल किल्ला सुंदर आहे. सिन्ट्रामध्ये आम्ही वाईट वायन, श्रिप्मस्, तिसऱ्या, कालवे, लॉबस्टर्स, सामन ह्या स्वादिष्ट माशांवर ताव मारला. शिवाय कोड माशांपासून केलेला बाकालांव होताच. रात्री आम्ही फादो ऐकायला गेलो.
फादो ही आर्त स्वरात गायलेली विराणी. फादोत विरह, व्यथा ह्यांचे संमिश्रण दिसते. जहाजावरून दूरदेशांत गेलेल्या पतीच्या, प्रियकराच्या आठवणीत दुःखी झालेली त्याची पत्नी, प्रेयसी फादो आळवते. You don''t sing Fado. Fado sings you असं म्हणतात.
पोर्तुगालला फुटबॉलचे वेड आहे. लिस्बोवाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्रिस्तीयानो रोनाल्डो विमानतळ असे नाव द्यावे अशी रोनाल्डोचे लक्षावधी चाहते कैक वर्षापासून मागणी करतात. क्रिस्तीयानो रोनाल्डो हे पोर्तुगालचे दैवत आहे. आणि का नसावे? सात नंबर असलेले व क्रिस्तीयानो रोनाल्डोचे छायाचित्र व नाव असलेले लाल रंगातले टी शर्टस् लिस्बोवाच्या प्रत्येक सोव्हिनीर शॉपमध्ये दिसतात.
कोंबड्याच्या छोट्या लाकडी मूर्ती, छोटे आजुले, पर्सेस, बॅग्स, बाहुल्या असे अनेक सोव्हिनीर्स लिस्बोवात मिळतात. गोव्यात पर्यटन रुजूनही अजून सोव्हिनीर इंडस्ट्री वाढली नाही. सोव्हिनीर बनवणारी व विकणारी दुकाने उघडून माझे मित्र व उद्योजक अनिल खंवटे ह्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न फसले. पोर्तुगालमध्ये अनेक बुकशॉप्स आहेत. त्यांना लिव्हेरिया म्हणतात. लिस्बोवाला ‘लिसगोवा’ ह्या परिषदेला भाग घेण्यासाठी मी सुशांताबरोबर लिस्बनला गेलो होतो.
गोव्याच्या शिष्टमंडळात उद्योगपती अवधूत तिंबले, श्रीनिवास व पल्लवी धेंपे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व त्यांच्या सुविद्य पत्नी उमा, उद्योजक अनिल खंवटे, बॉस ही फेणी बनवणारे उद्योजक मॅक व्हाज व त्यांच्या पत्नी मायशा, व्यावसायिक आयव्हो कार्दोजो ह्यांचा समावेश होता. लिस्बोवामध्ये आम्हाला अनेक गोमंतकीय भेटले. त्यात जुझे फुर्तादो, रोहन पाणंदीकर, डेरेल पेरैरा आणि श्रीमती फिगरेदो ह्यांचा समावेश होता.
भारत व पोर्तुगालमध्ये शिक्षण, संशोधन, कला व संस्कृती ह्या क्षेत्रांत विद्यार्थ्यांची देवाणघेवाण व्हायला हवी. पोर्तुगीज भाषेचे ज्ञान असल्यास ब्राझिल, मोझांबिक, अंगोला, तिमोर ह्या देशांशी आपला संपर्क वाढेल. मरीना पर्यटन, मत्स्योत्पादन, मद्य व्यवसाय, सोव्हिनीर इंडस्ट्री ह्या क्षेत्रांत पोर्तुगालकडून आपल्याला शिकता येईल. पोर्तुगालने गोव्यावर ४५१ वर्षे राज्य केले. गोव्यात काही राष्ट्रवादी अजूनही पोर्तुगिजांचा विद्वेष करतात. शेष भारतात ब्रिटिशांविषयी असा विद्वेष व पॉंडिचेरीत फ्रेंचाविषयी असा विद्वेष दिसत नाही. पाच शतकांनंतर पोर्तुगिजांचा द्वेष करणे हे आपल्या न्यूनगंडाचे लक्षण आहे. लिस्बन विद्यापीठात इन्क्विझिशनासहित गोव्याचा सर्व इतिहास जतन करून ठेवला आहे.
आता Alternative historyची संकल्पना रुजते आहे. Alternative history is a genre of fiction that speculates on "what if" scenerios by changing a key historical event or decision and exploring different outcomes that might have occured. These stories explore how history might have unfolded differently if key historical figures made different choices. It examines resulting changes to societies, politics and individuals.
गोव्यात पोर्तुगीज आलेच नसते असा विचार करून पर्यायी इतिहासाची कल्पना करता येईल. ते पोदेर जाता कामा नये. ते उंडेही जाता कामा नये. खोर्नातील तोर्राद उंडे आम्हाला सकाळच्या न्याहारीला हवेत. तोर्राद, खोर्न, ताव्हेर्न, तियात्र, जनेल, कदेल, लॉज असे कैक शब्द पोर्तुगालमधून कोकणीत आले.
इतिहास हा आरसा आहे. ह्या आरशात आपले रूप कुरूप दिसते म्हणून का आरसा फोडायचा? उलट इतिहासाचा आरसा लखलखीत असावा. स्वच्छ असावा. नितळ, निवळ असावा. इतिहासाच्या आरशात आपण अधूनमधून आपल्याला पडताळून पाहावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.