Krittika Pooja In Goa
भारतीय लोकसंस्कृतीत आकाशातल्या नक्षत्रांना महत्त्वाचे स्थान असून, त्यात नक्षत्रचक्रातील कृत्तिका या नक्षत्राला केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या प्राचीन संस्कृतीत उल्लेखनीय स्थान आहे. वृषभ राशीतील कृत्तिका हा साध्या डोळ्यांनी दिसणारा आकाशातील लक्षवेधक तारकापुंज आहे.
पाश्चात्त्य संस्कृतीत कृत्तिकेला ‘प्लीअॅडेझ’ असे नाव असून, त्यांनाच सात भगिनी म्हटलेल्या आहेत. कृत्तिकेत सात तारका मानलेल्या असल्या तरी साध्या डोळ्यांनी केवळ सहाच तारका पाहायला मिळतात. दूरदर्शीतून पाहिल्यावर त्यात असंख्य तारका दृष्टीस पडतात.
या तारकापुंजात असंख्य तारका दृष्टीस पडतात. या तारकापुंजात उष्ण आणि निळ्या रंगाच्या ताऱ्यांची संख्या जास्त आहे. कृत्तिका तारकापुंज पृथ्वीपासून अंदाजे ४४४ प्रकाशवर्षे अंतरावर असला तरी त्यांचे दर्शन प्रामुख्याने होत असल्याने मानवी समाजाला आदिम काळापासून हा तारकापुंज खुणावत असावा. कृत्तिका तारका पुंजातील प्रत्येक तारकेला स्वतःची अशी गती असल्याने, त्यातली एक तारका कालांतराने बहुतेक दूर गेल्यामुळे आज ती अंधूक होऊन दिसेनाशी झालेली आहे.
कृत्तिका पुंजातल्या सात तारकांना भारतीय संस्कृतीत सप्तर्षीच्या पत्नी मानलेल्या असून, त्यांची अंबा, दुला, नितत्वी अभ्रर्यती, मेघयंती, वर्षयंती आणि चुपूणिका अशी नावे आहेत. या सात मातांनी शिवपुत्र कार्तिक यांचे पालनपोषण केले आणि कालांतराने तारकासुराचा वध केल्याचे मानले जाते. या सहा तारकांचे दर्शन आकाशात जेव्हा होऊ लागले तेव्हा कार्तिकेयाला ‘षण्मातुर’ असे म्हणतात.
सहा मातांमुळे बालकाला सहा मुखे लाभली आणि त्यामुळे त्याला ‘षडानन’ म्हणूनही ओळखले जाते. ग्रीक पुराणातील कथेप्रमाणे ‘प्लीअॅडेझ’ या ‘अॅट्लस’ आणि ‘प्लिओने’ या दोघांच्या सात कन्या मानलेल्या आहेत. जेव्हा देवांनी अॅटलसला आकाशात बोलावले तेव्हा या सात कन्यांना पितृशोक झाला आणि त्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी या सातही बहिणींना आकाशात कायमचे स्थान दिल्याचे मानले जाते.
ग्रीक पुराणातील आणखी एका कथेनुसार ‘आरोयन’ नावाच्या पारध्याला घाबरून या सातही बहिणी कबुतरे होऊन आकाशात गेल्याचे मानले जाते आणि त्यांचे कृत्तिकेच्या रूपात दर्शन घडते. जपानी संस्कृतीतल्या लोककथेनुसार कृत्तिका तारकापुंज तेथील ओकिनावा शेतकऱ्यांना शेतीच्या कामाचे नियोजन करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे मानले जाते.
त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातून भरपूर पीक मिळते आणि म्हणून ओकिनावा लोक समूहाने या तारकापुंजासंदर्भात लोकगीते गातात. प्रशांत महासागरातल्या बेटांवरच्या लोकांना कृत्तिका तारकापुंज हा दिशादर्शक आणि पर्जन्यवृष्टी देणारा वाटतो. भारतीय लोकमानसाने कृत्तिकांना सोमाच्या पत्नी मानलेल्या असून दक्षाच्या शापामुळे त्या निपुत्रिक राहिल्या आणि कालांतराने कार्तिकेच्या माता बनल्याचे मानले जाते.
अग्नी ही कृत्तिकांची देवता मानलेली असून, त्यामुळे कृत्तिकाव्रत करण्याची परंपरा पाहायला मिळते.कार्तिक शुद्ध एकादशीपासून किंवा कार्तिक पौर्णिमेला ‘कृत्तिकाव्रत’ साजरे केले जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करण्याची लोकपरंपरा कृत्तिकादी अन्य नक्षत्रांचे महत्त्व अधोरेखित करतात. तामिळनाडूत कार्तिक पौर्णिमेला आकाशात कृत्तिका तारकापुंज असल्याने दिवे प्रज्वलित करून आनंद व्यक्त केला जातो.
ओडिशात तर नौकानयनाचा शुभारंभ व्यापार, उद्योगासाठी करण्यास हाच पर्वदिन मानला जातो आणि प्रतीकात्मक नौका करून, त्या पाण्यात सोडल्या जातात. हिवाळ्याच्या प्रारंभी सूर्यास्ताच्या वेळी कृत्तिका नक्षत्र पूर्वेकडे उगवताना दिसत असल्याने त्यांना वैदिक ऋषींनी ‘सप्तमातृका’ किंवा सात बहिणी म्हटलेले आहे. अवकाशात उत्तरेस ध्रुव ताऱ्याशेजारी पतंगाच्या आकाराचा तारकापुंज दिसत असून, त्याला ‘सप्तर्षी’ म्हटलेले आहे.
कृत्तिका तारकापुंजाला सप्तऋषीच्या पत्नी मानलेल्या आहे. पौराणिक कथेनुसार वसिष्ठ पत्नी अरुंधती सोडून इतर सहाजणी उबेसाठी अग्नीजवळ गेल्याने ऋषींनी सहा पत्नींचा त्याग केल्याचे मानले जाते.सत्तरीतील वांते या म्हादई नदीकाठावरच्या गावात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा रामचंद्र जोशीचे आगमन झाले तेव्हा जलसमृद्ध अशा स्थळी त्यांनी तळ्यांची जलसिंचनासाठी निर्मिती करून, त्यांचे पावित्र्य निरंतर जपले जावे म्हणून तेथे गणपती, सप्तर्षी, अरुंधती आणि अन्य देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आणि कालांतराने इथे त्रिपुरारी पौर्णिमेला असंख्य पणत्या पेटवून तळ्यातल्या गणपतीच्या तीर्थस्थळाला प्रज्वलित करण्याचा लोकोत्सव सुरू केला.
कार्तिक पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याच्या रात्री आणि हिरव्यागार वृक्षवेलींच्या सान्निध्यात होणारा दीपोत्सव इथल्या गतकालातील इतिहासाची स्मृती जागवतो. आकाशातील असंख्य तारकांचे दर्शन आदिम काळापासून दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या मानवी समूहाला रात्रीच्या वेळी आकर्षित करत होते आणि त्यातल्या त्यात मान्सूनच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर येणारी शरद ऋतूतली मंतरलेली कार्तिक पौर्णिमा आणि आकाशात प्रकर्षाने दृष्टीस पडणारा कृत्तिका पुंज त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला होता.
रगाडो नदीच्या काठावरती वसलेल्या उधळशे आणि ओकामी येथे वास्तव्यास असणाऱ्या कष्टकरी, गावडा जमातीसाठी हे कृत्तिका नक्षत्राचे आणि अन्य नक्षत्रांचे दर्शन त्यांच्या चित्तवृत्तींना मोहिनी घालणारे ठरले होते. पावसाळ्यात जी भातशेती केलेली होती, त्यातले दाणेगोटे घरात आल्याकारणाने मन हर्षोल्हासित असायचे.
गवताच्या ज्या गंजी उभारलेल्या असायच्या अथवा माळरानावर जे मौसमी गवत पिकलेले असायचे, त्याला बऱ्याचदा आगी लागून भस्मसात होण्याबरोबर मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. त्यासाठी कृत्तिका नक्षत्रांचा संबंध अग्नीशी असल्याने, कार्तिक पौर्णिमेच्या आसपास ‘कातयांचा लोकोत्सव’ कष्टकरी स्त्रिया साजरा करतात.
आकाशात कृत्तिका नक्षत्रांचा जो समूह दिसायचा त्यांच्या संदर्भातली माधूर्यपूर्ण लोकगीते गात गात मुख्य गावकऱ्याच्या पारंपरिक मांडावरती गोलाकार लोकनृत्यांचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण व्हायचे. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री कातयांच्या उत्सवाचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. त्याला आकाशीचा पूर्णकलांनी विकसित झालेला चंद्र आणि त्यावेळी दृष्टीस पडणारी सप्तनक्षत्र असून त्यासाठी या कष्टकरी स्त्रिया आपल्या जिवाभावाची वात्सल्यपूर्ण सखी असणाऱ्या तुळशीवृंदावनाभोवती तांदळाच्या पिठाने रांगोळी घालताना, एका वर्तुळात चंद्र- सूर्यासमवेत कृत्तिकादी सात नक्षत्रांचे प्रामुख्याने रेखाटन करतात. कातयांचा हा लोकोत्सव कृत्तिका नक्षत्राच्या पुंजक्याबरोबर चंद्र-सूर्याविषयी कृतज्ञता आणि श्रद्धा अभिव्यक्त करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.