डॉ. ज्योती भूषण जोशी
सकाळी सात साडेसातच्या सुमारास आपल्या पाठीवर ओझेवाल्याप्रमाणे दप्तराचे ओझे वाहत, एका हातात टिफिनची बॅग, छत्री असं सगळं सांभाळत धावणारी वाकलेली मुले, हे असं चित्र आपण दररोज पाहतो. खरं तर दरवर्षीप्रमाणे नाही, तर यंदा एप्रिल महिन्यातच शालेय नवे वर्ष सुरू झाले. एकीकडे घामाच्या धारा व दुसरीकडे नव्या वर्गातील उत्सुकता. पण दरवर्षीसारखी उत्सुकता काही विद्यार्थ्यांमध्ये दिसली नाही.
कारण रिझल्ट लागण्याअगोदरच आपण पुढच्या इयत्तेत पोहोचलो, हा विचार त्यांच्या डोक्यात होता. उनाडक्या करणाऱ्या, फक्त शाळेत जायचं म्हणून जायचं, ना अभ्यास, ना गृहपाठ करणं अशी मुलंही पुढल्या इयत्तेत पोहोचली. खरं तर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. ‘अ’, ‘आ’ किंवा ‘एबीसीडी’ न येणारी मुलेही दरवर्षी पुढच्या वर्गात दाखल होतात. काहीही असो यंदाही नवीन वर्ष, नव्या वर्गात प्रवेशकर्ते झालेल्या सर्व विद्यार्थिवर्गाचे कौतुक करत अशी अपेक्षा करूया की निदान यंदा तरी ही अशी मुलं नव्या उमेदीने अभ्यास करतील.
तसे पाहता आपल्याकडे पावसाला सुरुवात व शालेय नववर्षाचा श्रीगणेशा जूनमध्ये होतो. पावसाळ्यामुळे जाणवणारा हवेतील गारवा, नव्या कोऱ्या पुस्तकांचा वर्षभर हवाहवासा वाटणारा वास, दप्तर, छत्री, बहुधा सर्वच नवे नवे. आजचा लेख लिहिण्याचे कारण मात्र थोडे वेगळेच आहे. हा लेख कुणाला खटकेल किंवा कुणाला आवडेल; पण जे सत्य आहे तेच मांडण्याचा एक प्रयत्न. एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून पाहिलेली अनुभवलेली सत्य स्थिती.
नवशिक्षा प्रणाली ही कृतीवर, अनुभवावर, प्रात्यक्षिकातून शिक्षण घेण्यावर भर देणारी आहे. हा विचार स्वागतार्ह आहेच कारण आपण जे अनुभवातून शिकतो ते कायमस्वरूपी स्मरणात राहते हे सत्य आहे. पण असे असले तरी मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचे काय? तिसऱ्या, चौथी इयत्तेपासूनची मुले जवळजवळ दररोज चार ते पाच किलो वजन आपल्या नाजूक पाठीवरून वाहतात. इवलासा थकलेला जीव जेव्हा या ओझ्याने दुपारी घरी येतो तेव्हा त्याचे तोंड तेवढे जमिनीला टेकणे बाकी असते.
त्यांच्यामध्ये घरी येऊन जेवण्याचेही त्राण नसते. पण पालक म्हणून भुकेलेल्या पाल्ल्याला आपण बऱ्याचदा जबरदस्तीने जेवण करायला लावतो व तोही बिचारा घाबरत घाबरत जेवतो. जेवतो म्हणण्यापेक्षा अन्न कोंबतो. एवढं करून झोपायचं म्हटले तर गृहपाठ, पाठांतर, स्पर्धेची तयारी ट्यूशन, आपला पाल्य कुठेही कमी पडू नये म्हणून पालकांनी लावलेले इतर क्लासेस असतातच मागे. एवढी दयनीय अवस्था झालेली असते या मुलांची!
त्यामुळेही असेल कदाचित मैदानी खेळ खेळायला त्राणच त्यांच्यात नसते. कधी खांदेदुखी तर कधी डोकेदुखी, पाठीचं दुखणं तर विचारूच नका! कधी कधी हे ओझे वाहताना मुलांच्या छातीतही दुखतं आणि आपण मात्र त्यादिवशी थोडेसे औषधपाणी करून पुन्हा मुलांना शाळेला पिटाळतो. एकेका विषयांची कमीतकमी तीन ते चार वह्या-पुस्तके, आठ पिरियड-लेक्चरच्या दोनशे पानी वह्या, तेवढ्याच किंबहुना जास्त पानांची पुस्तके टिफिन, पाण्याची बाटली अशी जवळपास चार ते पाच किलो वजनाची बॅग ही मुलं रोज वाहतात.
बरेच पालक असेही म्हणतात की ‘आमच्यासारखं आताच्या मुलांना एवढं चालत जावं लागत नाही’. पण तरीसुद्धा ग्रामीण भागांमध्ये जिथे वाहतुकीची सोय नाही अशा ठिकाणची मुलं मजल दरमजल करत शाळा गाठतात. आजच्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या झोपण्याउठण्याच्या सर्वच सवयी बदलल्या असल्यामुळे शरीरातील अवयव नाजूक, हाडे ठिसूळ झाल्यामुळे हे वजन ती पेलू शकत नाहीत आणि म्हणूनच बऱ्याचशा मुलांचे हात, खांदे, पाठ ,छाती, तळपाय इ. दुखत असल्याची तक्रार मुले करतात. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी जो उत्साह पाहिजे तो उत्साह दिसत नाही. पाठ, कणाच वाकला असल्यामुळे भारताची पुढील पिढी कशी असेल याचा अंदाज बांधू शकतो. याठिकाणी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या ’कणा’ या कवितेची.
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसतं लढ म्हणा
आजचा विद्यार्थी हा कण्यातूनच वाकलेला दिसतो. संपूर्ण आयुष्य, त्याचे भविष्य कसे असेल हा प्रश्न आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यंक, बुद्धी खूपच श्रेष्ठ आहे, उच्च दर्जाची आहे. त्याला तोड नाही. पण जर शरीराची आणि मनाची योग्य साथ नसेल तर बुद्धी असून काय उपयोग?
गाडी बाहेरून दिसायला कितीही चांगली असेल पण त्यात योग्य ते इंधन नसेल तर काय उपयोग? भारताचा भावी नागरिकच जर झुकलेला असेल तर भारताचे ‘विश्वगुरू’ बनण्याचे स्वप्न कोण पूर्ण करेल? दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी प्रसन्न नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल? नवीन शैक्षणिक धोरणाच्या ‘कृतीतून शिक्षणा’चा उद्देश स्वागतार्ह आहे, पण मुलांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण अमलात आणताना त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती समजून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील अवजड दप्तराचे ओझे थोडे कमी व्हावे, बुद्धी व शरीराची योग्य वाढ होऊन सुजाण नागरिक तयार व्हावा, ही एक शिक्षक, एक पालक या नात्याने अपेक्षा. यासाठी जागृत सरकारने काही ठोस पावले उचलावीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.