विष्णूचा सातवा अवतार परशुराम याने बाण मारून समुद्र हटवला आणि गोपकपट्टणम् म्हणजेच आजचा गोमंतक निर्माण केला अशी आख्यायिका सांगतात. परशुरामाची आठवण म्हणून प्रियोळ भागात परशुराम मंदिर अस्तित्वात आहे.
अलीकडेच गोवा सरकारने काम्पाल-पणजी येथे धनुर्धारी पराशुरामाचा सुंदर पुतळा उभारून पुन्हा एकदा परशुरामाची आठवण जागी केली आहे. खळखळते नदी नाले, शांत, सुंदर तलाव, पश्चिमेला फेसाळता अरबी समुद्र, सह्याद्रीच्या नक्षीदार डोंगर कपारी, विविध प्रकारच्या वृक्षवेली, डोलणारी शेतेभाते यांनी समृद्ध असलेला हा विलोभनीय गोमंतक गेल्या ६३ वर्षापासून सतत बदलतो आहे. अर्थात याचे भलेबुरे परिणाम इथल्या समाजजीवनावर होणे अपरिहार्य आहे.
१८ डिसेंबर १९६१ ते ३१ डिसेंबर २०२४ या ६३ वर्षांच्या काळात गोवा फार जलद गतीने बदलला. कुणीही कल्पना केली नसेल इतक्या झपाट्याने गोवा बदलला. पोर्तुगीज काळापासून ‘सुशेगाद गोंयकार’ अशी प्रतिमा असणारा गोवा धावपळीला सरावलेला गोवा झाला आहे. कविवर्य बा. भा. बोरकर यांच्या कवितेतील शहाळ्यातील पाण्यासारखी मधाळ असणारी इथली प्रेमळ माणसे आता बदलली आहेत.
परराज्यातून कामा-धंद्यासाठी येणाऱ्या लोकांना ‘घाटी’ संबोधले जायचे. जन्माने जे इथले ते मूळ ‘गोंयकार’ किंवा ‘नीज गोंयकार’ आणि स्थलांतरित होऊन आलेले ते ‘घाटी’ असा भेद तयार झाला. परंतु त्यांच्याविषयी मनात कटुता नव्हती, पण हिणकस भाव नक्कीच होता. मूळ गोमंतकीय चुकीचे वागला तर त्याला, ‘सामको घाटी मरे तूं’ असे उपहासाने म्हटले जायचे आणि जाते.
आज याच ‘घाटी’ समजल्या जाणाऱ्या लोकांनी घाम गाळून इथली शेते पिकवली, इथल्या बागायती फुलवल्या. प्रशासनात आणि शिक्षण क्षेत्रात भरीव आणि महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून आजचा गोमंतक प्रगतिपथावर पोहोचू शकला हे विसरता येणार नाही.
अंग मेहनतीची कामे करण्यासाठी गोव्याबाहेरून आलेले ते ‘घाटी’ ठरले आणि स्थानिक रहिवासी स्वतःला ‘भाटकार’ किंवा ‘पात्रांव’ समजण्यात घन्यता मानू लागले. उतरत्या छपराची टुमदार घरे जाऊन अलिशान बंगले आणि गृह संकुले उभी राहिली.
अभिरुची बदलली तशा गोष्टी बदलत गेल्या. गोवा विमोचनापूर्वी काही विशिष्ट उच्चवर्णीय आणि धनवंत असे मोजकेच लोक उच्च शिक्षण आणि नोकरीचाकरीसाठी पोर्तुगाल आणि लंडनला जात असत. आज सामान्य माणूसदेखील परदेशात जाऊ लागला आहे; कधी सरकारी शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी तर कधी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी! संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना तर नोकरी व्यवसायाची असंख्य कवाडे खुली झाली. देश विदेशात भ्रमण करून आल्यावर तिथल्या आधुनिक सोईसुविधा आपल्याकडेदेखील असाव्यात असा ध्यास घेतला गेला आणि या विचारातून गोवा बदलला.
२० वे शतक संपता संपता गोवा राज्यात कोकण रेल्वेने प्रवेश केला. काही विशिष्ट वर्गाने आणि विशेषतः काही राजकीय नेत्यांनी या रेल्वे मार्गाला विरोध दर्शवला. गोव्यात रेल्वे येण्यापूर्वी गोव्यातून परराज्यात होणारी वाहतूक ही प्रामुख्याने सडकमार्गे होत होती. बस लॉबीचे वर्चस्व तत्कालीन सरकारवर होते. रेल्वे आली तर आपला धंदा बुडेल या भीतीपोटी बस व ट्रक मालकांचा रेल्वेला विरोध होत होता. त्यांनी काही लोकांना फूस लावली आणि आंदोलन करून रेल्वेला प्रखर विरोध केला.
मात्र तत्कालीन केंद्र सरकारात मंत्री असलेल्या मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी गोवा वगळून रेल्वे मंगळूरपर्यंत नेण्याचा चंग बांधला. गोव्यातील काही चाणाक्ष आणि दूरदृष्टीच्या नेत्यांनी यातील नुकसान ओळखले आणि राज्याच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी त्यांनी विरोधकांची समजूत घातली.
अखेर ‘हो’, ‘ना’ करता करता पणजीमार्गे जाणारी रेल्वे करमळीमार्गे जाण्याची अनुमती देण्यात आली आणि एकदाची कोकण रेल्वे सुरू झाली. पण यात अकारण विलंब झाला आणि गोवा राज्य विकासापासून एक दशक मागे पडले. गंमत म्हणजे ज्यांनी रेल्वेला विरोध केला होता तेच लोक आज सगळ्यात जास्त रेल्वे मार्गाचा वापर करतात, काळाने त्यांच्यावर उगवलेला हा सूड म्हणावा लागेल.
रेल्वे येणार असे कळताच या मार्गाच्या अवतीभवती असणाऱ्या जमिनींच्या किमती वाढल्या. व्यापाराला चालना मिळाली. उद्योग व्यवसाय वाढीला लागले. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. ‘सुशेगाद’ असणारा गोमंतकीय आळस झटकून कार्यप्रवण झाला. उत्पन्नाची साधने वाढली. या जमेच्या बाजू असल्या तरी महागाई वाढली, युपी, बिहार, राजस्थान, जम्मू व काश्मीर, बांगलादेश, नेपाळ येथील लोकांचे लोंढे कामाच्या शोधात गोव्यात आले. त्यांनी बाजारपेठा काबीज केल्या.
जागा विकत घेऊन आपली निवासस्थाने बांधली, उत्तरेकडच्या धनदांडग्या लोकांनी इथल्या औद्योगिक वसाहतीत आपले पाय रोवले. सरकारने त्यांना जमीन, वीज व पाणी या मूलभूत सुविधा अल्प दरात पुरवल्या. मुंबई, दिल्ली इथल्या गडगंज संपत्ती असलेल्या राजकीय नेत्यांनी किंवा त्यांच्या चेल्यांनी, सिनेसृष्टीतील तथा क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटीजनी मिळेल त्या भावात इथल्या जमिनी विकत घेतल्या आणि इथे आपले बंगले बांधले. काहींनी फार्म हाउसेस आणि पंच तारांकित, सप्ततारांकित हॉटेल्स सुरू केली. चंगळवादाची ठिणगी इथेच पडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.