Heart Touching Bhaubeej Story Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Heart Touching Bhaubeej Story: केस पांढरे झाले, तांदूळ डोक्यावरून घरंगळू लागले; पण भाऊ-बहिणीचं प्रेम आजही तसंच! भाऊबीजेच्या आठवणींनी मन भरून येईल

Bhaubeej Festival: तो ‘हो’ म्हणाला... येणार म्हणजे येणारच! त्याच्या त्या एका ‘हो’मध्ये अख्खं बालपण परत आलं. लहान असताना आपली होणारी भाऊबीज म्हणजे एक वेगळाच सोहळा असायचा.

गोमंतक ऑनलाईन टीम

नीना नाईक

भाऊबीज म्हणजे वर्षातून एकदा लहान होण्याचा दिवस. भाऊबीज म्हणजे केस पांढरे झाले तरी मनाने लहान राहण्याचा दिवस आणि भाऊबीज म्हणजे तांदूळ जमिनीवर पडले तरी आशीर्वाद मात्र मनातच राहतात, याची खात्री पटण्याचा दिवस.

तो ‘हो’ म्हणाला... येणार म्हणजे येणारच! त्याच्या त्या एका ‘हो’मध्ये अख्खं बालपण परत आलं. लहान असताना आपली होणारी भाऊबीज म्हणजे एक वेगळाच सोहळा असायचा. त्यात भांडणं कशाला तर, ओवाळणीत काय पडणार यावरून. मला बांगड्या हव्या, त्याला काय हवं ते त्याचं त्याला ठाऊक. शाळांना सुट्टी असे, तरी शाळेत गेल्यावर ‘तुला भाऊबीजेला काय मिळालं, मला काय मिळालं’ यावर चर्चा होत असे. त्यामुळे बांगड्या दिल्या, रिबीन दिली, जे काही मिळालं ते दाखवायचा रुबाब जणू आपण करोडपती असल्याचा असे. आई-वडील सहसा शाळेत जाताना उपयोगी पडतील अशाच वस्तू भेट देत. पण आम्हाला त्याचं काय? आम्हाला तर तो दिवसच मोठा वाटायचा.

वय वाढलं. मग भावाकडून त्याला परवडेल असा विचार करून, हक्काने, हट्टाने मागणी करायची आणि ती त्याने पुरवायची. कधी पेन, कधी पुस्तक, कधी एखादा फ्रॉक. तो देताना त्याच्या चेहऱ्यावरचं हसू वेगळंच असायचं. बहिणीचा हट्ट पुरवला याचा आनंद त्याला शब्दात सांगता यायचा नाही. तो शिक्षणासाठी बाहेरगावी गेला. भाऊबीज राहून जाई. अशावेळी तो आल्यावर ‘वसुली बीज’ होऊ लागली. ‘मागची भाऊबीज राहिली आहे बरं का, ती आधी दे, मग या वर्षीची’, असा माझा हिशोब असायचा. तोही हसत हसत तो हिशोब चुकता करायचा.

नंतर दोघांची लग्न झाली. संसारात रमून गेलो. दूर-दूर असल्याने कधीमधीच भाऊबीज होत असे. कधी फोनवरच औक्षण व्हायचं. ‘ताई, फोटोवरूनच ओवाळ बरं,’ असं तो म्हणायचा. पण, फोटोवरून ओवाळण्यात आणि प्रत्यक्ष पाटावर बसवून ओवाळण्यात फरक असतोच. ती ओढ मनात तशीच राहायची.

आम्ही भेटणार हे नक्की झालं की, म्हातारी-म्हातारा दिसू नये म्हणून केसांची रंगरंगोटी केली जायची. आरशासमोर उभं राहून, ‘हा पांढरा केस दिसतोय का गं?’ असं एकमेकांना विचारलं जायचं. खरं तर म्हातारं झालोय हे माहिती असूनही, भावासमोर मात्र लहानच राहावं, असं वाटायचं. बहीण नेहमी लहानच असते, भाऊ नेहमी मोठाच असतो, ही भावना वय वाढलं तरी कमी होत नाही. औक्षणाला बसलं की डोक्यावर तांदूळ टाकले की ते घरंगळायचे. तेव्हा दादासाहेबांना म्हणायचे, ‘दादा, तांदूळ डोक्यावर घातले तेव्हा सफेद होते, खाली पडताना काळपट कसे दिसतात?’

त्यावर ते मार्मिक उत्तर देत, ‘अगं, तुमच्याकडे तांदूळच खराब असतात. तुम्हाला बासमती म्हणून गावठी तांदूळ देतात. त्यांना माहीत आहे, या तांदळाची पेज रुचकर होते आणि या बहिणीच्या भावाला ती आवडते.’ खरं तर त्याला पेज आवडते की बहिणीच्या हातची पेज आवडते, हे त्यालाच माहिती. पण त्या पेजेची चव आजही जिभेवर आहे. गावठी तांदळाची पेज, त्यावर तूप आणि सोबत एखादं तोंडीलावणं, बस्स! यापेक्षा मोठं पक्वान्न नाही.

अशा गोड आठवणी काढून आम्ही हसत बसलो होतो. एका बाजूला मी औक्षणाची तयारी करत होते. मस्त मामासाठी भाच्यांनी रांगोळी काढली. पाटावर बंधूराज बसले. त्यात चेष्टा-मस्करी सुरू झाली. ‘मला मोठ्ठा टिळा लाव,’ असं दादाने सांगितलं, मी लावला. ओवाळताना अक्षता टाकल्या. त्या ९८% जमिनीवर पडल्या. २% त्यांच्या डोक्यावर जी झालर होती त्यात पडल्या. त्यावर दादा म्हणाला, ‘२० वर्षांपूर्वी तांदळाची क्वालिटी बरी होती, निदान केसात तरी रहायची. आता ती डोक्यावर पडली की घरंगळत खाली पडते.’

भाचे कंपनी विचार करत राहिली. मामा, अरे तुझ्या डोक्यावर चिवड्यात लाडू ठेवतात तेवढे केस असते तर तांदूळ राहिले असते!

तोही हसत म्हणाला, ‘पुढच्या भाऊबीजेला मी पाहतो, १००% तांदूळ जमिनीवर पडतील.’

सगळे एकत्र ओरडले - ‘तथास्तू!’

त्या ‘तथास्तू’मध्ये खरं तर एक प्रार्थना होती. पुढच्या भाऊबीजेला पुन्हा असंच भेटूया. पुन्हा असंच हसूया. केस आणखी कमी झाले तरी चालतील, पण भेटीचं हे नातं कमी होऊ नये. तांदूळ १००% खाली पडले तरी चालतील; पण बहिण-भावाचं हे प्रेम असंच टिकून राहावं. कारण भाऊबीज म्हणजे फक्त ओवाळणी नाही. भाऊबीज म्हणजे वर्षातून एकदा लहान होण्याचा दिवस. भाऊबीज म्हणजे केस पांढरे झाले तरी मनाने लहान राहण्याचा दिवस आणि भाऊबीज म्हणजे तांदूळ जमिनीवर पडले तरी आशीर्वाद मात्र मनातच राहतात, याची खात्री पटण्याचा दिवस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'FC Goa'च्या गोटात मोठी उलथापालथ! मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांची एक्झिट, क्लबने पोस्ट करत दिली माहिती

Government Employees: सरकारी खुर्ची आरामासाठी नाही, जनतेची कामं करण्यासाठी! कामचुकार कर्मचाऱ्यांना आता तंबी नव्हे, कारवाईचा दणका द्या

POCSO Case: गोव्यात बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! काणकोणमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी 24 वर्षीय संशयिताला अटक

New Zealand vs India 4th ODI: रोहित, विराट अन् अय्यर... तिघांच्याही पदरी भोपळा! टीम इंडियाची लाजिरवाणी सुरुवात, पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट VIDEO

Child Assault Case: 4 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा तपास धारवाडपर्यंत पोहोचणार; संशयिताच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT