डॉ. नाऊ वरक
व्हिक्टर फेर्राव लिखित ‘गोवननेस अनबाउंड: एक्सप्लोरिंग डीकॉलोनिअल अबंडन्स’ हे पुस्तक हल्लीच प्रकाशित झाले. पुस्तकाच्या शीर्षकामधील ‘अनबाउंड’ म्हणजेच ‘मुक्त’ ह्या शब्दामुळे या पुस्तकाबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले. आतापर्यंत मुक्ती शब्दाच्या गोव्यात दोन प्रमुख जाणिवा आहेत.
पहिली पोर्तुगीज राजवटीतून गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाला; तर भाऊसाहेब बांदोडकरांच्या राजकारणामुळे सामान्यजनांची भाटकारशाहीतून मुक्तता झाली ही दुसरी ओळख. अन्यथा गोव्याचा इतिहास किंवा तत्त्वज्ञान हे ‘अपवादात्मकता’ या जाणिवेतून लिहिल्याचे जाणवते.
या पुस्तकाला दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक राजू नायक यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी गोव्यातील बुद्धिजिवी वर्गाला मुक्ती ह्या संकल्पनेचे संभाव्य अर्थ उलगडण्याचे आवाहन केले आहे. तीस निबंधांनी समृद्ध केलेले आणि तीन भागांत विभागलेले हे पुस्तक राजकीय तत्त्वज्ञानात रुची असलेल्यांना नक्कीच बौद्धिक पर्वणीच आहे.
आजच्या लेखात फेर्राव यांच्या ‘मुक्ती’ या संकल्पनेचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाच्या मते ‘गोवननेस’ म्हणजे सांस्कृतिक अधिशेष (सरप्लस) जो उपयुक्ततावाद किंवा सुखवादाच्या संकुचित तत्त्वज्ञानाविरोधात आहे. निर्वसाहतीकरण आणि राष्ट्रवादाचे समर्थक ‘गोवननेस’ या संकल्पनेकडे अपवादात्मक किंवा मर्यादित अशा नजरेतून पाहतात. गोव्यातील लोकांचा आणि भारतातील जनतेचा निर्वसाहतीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न होता.
वसाहतीकरणात समाविष्ट होणे म्हणजे वसाहतीकरणास चालना देणे नव्हे तर प्रतिकाराची ती दुसरी बाजू आहे, असे लेखक होमी भाभा यांचा संदर्भ देऊन अधोरेखित करतो. पाश्चात्य आणि भारतीय या दुहींमध्ये न फसता गोव्यातील लोकांच्या वसाहतवादी शक्तींना प्रतिकार करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्याचे लेखक निदर्शनास आणून देतो. यासाठी लेखक जॉर्ज बाताय, जीन बोद्रियार्ड, होमी भाभा, लूस इरिगरे इत्यादी प्रमुख तत्त्वज्ञान्यांच्या संदर्भग्रंथांचे साहाय्य घेतो.
‘गोवननेस’ म्हणजे पोर्तुगीजपूर्वकालीन गोवा साकारण्याची कल्पकता नव्हे तर वसाहतवादी शक्तींशी प्रतिकार करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कोकणी तिच्या विविध बोलींमधून बोलणे किंवा लिहिणे हेच मुक्तीचे द्योतक आहे. कठोर राष्ट्रवादापेक्षा येथील लोकांनी समन्वयी राष्ट्रवाद स्वीकारला आहे.
फ्रेंच तत्त्वज्ञानी जॅक डेरिडा यांच्या ‘निर्हेतुक आदरातिथ्य’ या उक्तीशी ‘गोवननेस’ या संकल्पनेचे साधर्म्य आहे, असे लेखक मानतो. त्यामुळेच येथील भाषा, धर्म व राजकीय सत्तांचा ऐतिहासिक समन्वय गोव्याला विश्वबंधुत्व (कॉस्मोपॉलिटॅनिझ्म) प्रदान करतो. भारतीय विचार करण्याची पद्धत आहे का? या ए. के. रामानुजन यांच्या प्रश्नाचा आधारावर लेखक ‘गोवन विचार करण्याची पद्धत अस्तित्वात आहे का?’ हा प्रश्न समस्त गोवेकरांना विचारतो.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी गोवेकर ‘अन्यत्व’ किंवा ‘परकेपणास’ तोंड देतो. इमॅन्यूएल लेव्हिनास यांच्या मते जो मनुष्य परकेपणा जगत असतो त्याला मानवी जबाबदारीची जाणीव असते. ही जाणीव जगभरातील गोवेकरांना गोव्याच्या हितासाठी एकत्र आणते.
पियरे क्लास्त्रेस यांच्या दक्षिण अमेरिकेतील साहित्याचा संदर्भ देत लेखक तेथील काही समुदाय प्रशासनाशिवाय सुप्त जीवन जगतात याचे दाखले देतो. हा सुप्तपणा लेखक गोव्यातील ‘सुसेगादो’ संस्कृतीशी जोडतो.
‘सुशेगाद’ ही आळशी प्रवृत्ती नसून प्रमाणबद्ध उत्पादनावरही मानवी जीवन उत्तमरीत्या जगता येते व अमाप औद्योगिकीकरण आणि वारेमाप शहरीकरण टाळता येते, असे लेखकाचे मत आहे. म्हणूनच ‘सुसेगादो’ संस्कृती मुक्तीचे द्वार आहे, असे लेखकास वाटते.
इमॅन्यूएल कांट यांनी मांडलेली ‘शाश्वत शांतता’ आणि डेरिडा यांचे ‘विश्वबंधुत्व’ हे ‘सुसेगादो’ संस्कृतीचा पाया आहे हे या पुस्तकातून प्रतीत होते. मात्र ‘सुशेगाद’ प्रवृत्ती जागतिकीकरणातील नवउदारमतवादास खरेच चाप लावू शकेल का? हा प्रश्न अनुत्तरित उरतो.
ऐतिहासिक दृष्टिकोन विविध समुदायांना त्यांच्या ‘पवित्र’ अस्मिता निर्माण करण्यास प्रवृत्त करेल आणि त्यामुळे पोकळ राष्ट्रवाद निर्माण होईल, अशी लेखकास भीती वाटते. त्यामुळे इतिहास आणि राष्ट्रवाद ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत असा संभ्रम या पुस्तकातून निर्माण होऊ शकतो.
हे पुस्तक समाजसंबंधांची आर्थिक निकषांवर चिकित्सा न करता ‘गोवननेस’ या संकल्पनेचे ‘संस्कृती’ हे एकमेव परिमाण मानते. अस्मिता ही सांस्कृतिक वाटाघाटीतून निर्माण होणारी संकल्पना आहे, असे उत्तराधुनिकतेच्या पुरस्कर्त्यांना वाटते आणि आर्थिक विषमता त्याचवेळी निवांत निपचित पडून सुखावते.
अशावेळी या सांस्कृतिक अधिशेषाची सभ्यता (सिव्हिलिटी) काय असेल ? असा प्रश्न पडल्यास नवल वाटू नये. अन्यता, मिश्रता आणि अपवादात्मकता एकत्र गुंफण्याच्या या प्रयत्नात कुठेतरी एकवाक्यता कमी पडल्याचे जाणवते. गोमंतकीय व ‘गोंयकार’पण या जाणिवा गोव्याचे संघराज्यीय राजकारण प्रभावी करत असतानाच फेर्राव यांची ‘गोवननेस’ ही संकल्पना स्थानिक राजकीय जाणिवांमध्ये नक्कीच भर घालेल, याबद्दल दुमत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.