Goan Food Culture Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goan Food Culture: ‘चवीने खाणार, त्याला देव देणार’! बिस्कीट अंबाडे आणि कोळंबूची अविस्मरणीय मैफल

Biscuit Ambade, Kolambu: चार बोटांनी दाट पीठ घेऊन एक-एक करून सोडू लागली. ‘चुळसुळ’ असा सुमधुर नाद सुरू झाला. आणि त्या क्षणी बिस्कीट अंबाडे आणि कोळंबू यांची अविस्मरणीय मैफल सुरू झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

केदार साखरदांडे

मला नक्की तारीख किंवा महिना आठवत नाही; पण दिवस शनिवार होता आणि वेळ दुपारची. माझी आई दुपारी शाळेतून घरी आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे प्रसन्न हास्य होते. आल्यावर तिने हातपाय धुतले.

तिने रात्री भिजवलेली उडीद डाळ आणि तांदूळ काढले. त्यात वाटलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे, आले मस्तपैकी वाटून घेतले. किंचित करंगळी बुडवून वाटलेल्या पिठाचा दाटपणा तपासून घेतला. आणि ‘आमसाण’ तपासण्यासाठी वरून जिभेवर घेऊन पीठ चाखून पाहिला

खरे तर पाकशास्त्र असंच असतं. स्टररने घोटणं, हॅन्ड मिक्सरने फेटणं - याने फक्त पदार्थ बनतो; त्यात प्रेम उतरत नाही. म्हणजे आता मजा बघा - शुद्ध हिंदीमध्ये पदार्थाला व्यंजन म्हणतात. किती समर्पक शब्द! हेच ‘व्यंजन’ मराठीत घेतलं, आणि त्यात प्रेमाच्या चवीचा स्वर जोडला, तरच ते अक्षर होतं; अन्यथा पाय मोडलेल्या अवस्थेत अपूर्ण राहतं!

तर ते असो. पिठाचा दाटपणा तपासून घेताना तिने बाजूला डाळ भिजत घातली. चिंचेचा कोळ केला. सांबार कांदा कापून घेतला. एका वाटीत मोहरी, मेथीदाणे, कढीपत्ता घेतला. ते किंचित गरम करून घेतले.

मी विचारलं, ‘‘आई, हे तू काय करतेस?’’

तिने उत्तर दिलं नाही; फक्त हसून डोक्यावरून हात फिरवला.

त्यात तेल सोडलं. मस्त तडतड उठली. ‘तडतड’ आवाज आणि अप्रतिम गंध यांची अफलातून जुगलबंदी सुरू झाली. मोहरीचा एक दाणा उडून माझ्या गालाला कुरवाळून गेला, अशी अंधूक आठवण आहे. जुन्या आठवणीतली ती गालाजवळची गोड हुळहुळ आजही जाणवते.

दुसऱ्या बाजूला तिने तेलाची कढई तापत ठेवली. पिठाचा एक कण सोडून तेल व्यवस्थित तापलं आहे याची खातरजमा करून घेतली. त्यात चार बोटांनी दाट पीठ घेऊन एक-एक करून सोडू लागली. ‘चुळसुळ’ असा सुमधुर नाद सुरू झाला. आणि त्या क्षणी बिस्कीट अंबाडे आणि कोळंबू यांची अविस्मरणीय मैफल सुरू झाली.

त्या क्षणापर्यंत त्या पदार्थांची नावंसुद्धा मला माहिती नव्हती; पण मी त्यांच्या कृतीच्या प्रेमात पडलो होतो. त्यांचं नाव काहीही असतं, तरी मला फरक पडला नसता. म्हणजे बघा ना - आपल्याला एखादी अनोळखी व्यक्ती वाटेत दिसते.

ती कोण, काय - काहीच माहिती नसतं; पण का कोण जाणे, आपलीच वाटते. जुनी ओळख असल्यासारखी भासते. तिचं नाव माहिती नसतं; पण त्याने काहीच फरक पडत नाही. बिस्कीट अंबाडे आणि कोळंबूचं माझं तसंच झालं.

त्यांच्याबद्दल प्रेम तर झालंच होतं; पण त्यांची चटपटीत नावं ऐकून ते असंख्य पटीने वाढलं. जुनं नातं असल्यासारखं. आणि चवीबद्दल अधिक सांगणं न लगे. गमतीत सांगायचं झालं, तर ड्युटीवरच्या यमराजानेसुद्धा एक आपल्यासाठी आणि आपल्या रेड्यासाठी पान वाढून घ्यावं, त्याची कृती उतरवून घेऊन यमीला सांगून सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा रांधून घ्यावी!

आणि हो, त्यांच्या मुखदर्शनाबद्दल सांगायचं राहिलंच. बिस्कीट अंबाड्यांचा सुंदर सोनेरी रंग - मेदूवड्याच्या जवळ जाणारा, पण तरीही वेगळा.

नक्की ठरावीक आकार नाही; कारण साच्यातून केलेले नाहीत. चव कुरकुरीत म्हणून नावात ‘बिस्कीट’, आणि ‘अंबाडे’ म्हणजे कदाचित आंबवण्याच्या क्रियेचा संदर्भ - किंवा दुसरं काही कारण असेल; पण ते असो.

‘कोळंबू’ सांबाराच्या जवळ जाणारं, पण अगदी वेगळं. बिस्कीट अंबाडे-कोळंबू ही टिपिकल कारवारी किंवा मंगळुरी डिश. काही जण म्हणतील, यापेक्षा उडप्याचं वडा-सांबार काय वेगळं? पण ज्यांनी याची प्रत्यक्ष चव घेतली आहे, ते या दाव्याकडे फक्त हसून दुर्लक्ष करतील.

यात वडा-सांबारचा साचेबद्धपणा नसेल; पण घरगुती टच आणि आपुलकी आहे. कृत्रिमता नाही; सहजता आहे. ती सांगून कळत नाही - ती अनुभवावी लागते. बिस्कीट अंबाडे-कोळंबू ही विशेष आग्रहाची वस्तू आहे.

बिस्कीट अंबाडे आणि कोळंबूशी पहिली ओळख झाली ती अशी. मग भेटीगाठी वाढत गेल्या. परिचय दृढ होत गेला. एक जुनी जाहिरात आठवली, ‘चवीने खाणार, त्याला देव देणार’. अगदी खरं आहे. माझ्यासारख्या चवीने खाणाऱ्याला देव आई, बहीण, पत्नी, सासूमाय, मुलगी अशा कुठल्यातरी रूपात येऊन अन्नपूर्णा देवीच्या वरदहस्ताने असे बिस्कीट अंबाडे, कोळंबूसारखे दैवी पदार्थ खाऊ घालतो; आणि मी रुचीभक्तासारखा तो प्रसाद म्हणूनच खाऊन घेतो.

अन्नदाता सुखी भव! देव बरे करो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: न्यूझीलंडला मोठा झटका! 'या' दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला कायमचा 'रामराम'

America Iran Conflict: "हे युद्ध आपण का लढतोय हे खुद्द अमेरिकेलाही नीट कळलेले नाही"; ‘घाशीराम’ जागतिक सत्तापटलावरचे

Goa Literature: ‘रद्दीतल्या मोठेपणा’चा मोह सोडून ‘शब्दांच्या सत्या’चा शोध घेईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गोमंतकीय साहित्याची पहाट होईल.

’साळावली इरिगेशन प्रोजेक्ट’वेळी इंजिनिअरांमध्ये एक समानता होती; त्यांच्यापैकी एकालाही अशा कामाचा पूर्वानुभव नव्हता; पुराणातली वांगी

राजकीय हेराफेरी, पक्षांतरे, भ्रष्टाचारविरोधातील संस्थात्मक अपयश यामुळे गोव्याच्या अस्तित्वासमोरच संकटे उभी झाली आहेत; धुरळा

SCROLL FOR NEXT