समाजमाध्यमांवर गोव्याच्या पर्यटनाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पर्यटन खातेही हबकलेय. समाजमाध्यमांवर एका रामानुज मुखर्जीने गोव्याची जादू ओसरल्याचे भाष्य केले. त्याने एका आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेचा अहवाल प्रस्तुत करून विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी कोविडपूर्व विदेशी पर्यटकांच्या संख्येचा हवाला देऊन २०२३ पासून पर्यटक रोडावले असल्याचे म्हटले, शिवाय रशिया व ब्रिटनचे पर्यटक जे सतत गोव्याला भेट देत असत - त्यांनी आता श्रीलंकेकडे मोर्चा वळविला आहे, असे मत मांडले. पर्यटन खात्याने या मुखर्जींविरुद्ध कोर्टात दावा करण्याचा इशारा दिला आहे. परंतु त्याने काय होणार?
माझा एक मित्र पर्यटन क्षेत्रातील परिस्थितीचे उद्बोधक उदाहरण देत होता. तो म्हणाला, कळंगुटहून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलात जायला टॅक्सीचालक दोन ते अडीच हजार रुपये आकारतात. गोव्यातील ताजमध्ये खोलीचे एका दिवसाचे भाडे आहे ३६ हजार रुपये. तीच श्रीलंकेत ११ हजारांना मिळू शकते. गोव्याकडे येणाऱ्या विमानाचे भाडे ५ हजार असेल तर जाताना ते दुप्पट झालेले असते. मुंबईला परतीचे विमान भाडे ७५ हजारांवरही गेलेले आहे. दूध देणाऱ्या गाईला अक्षरशः ओरबाडण्याचा हा प्रकार आहे.
विमान वाहतूक मंत्रालयानेही या प्रकाराकडे काणाडोळा केलाय. हे सारे व्यावसायिक गोव्याला लुटायला बसले आहेत. गोवा एका बाजूला प्रचंड खर्चिक बनले आहे, तर दुसऱ्या बाजूला पर्यटन क्षेत्राची अक्षरशः हेळसांड सुरू आहे, कोणाचे लक्ष नाही. रस्ते खोदून ठेवले आहेत, कचऱ्याच्या राशी पडल्या आहेत व दुसरीकडे मोपाला जायला पर्वरीत अडथळेच अडथळे निर्माण केले आहेत. पर्यटक तेथे वेळेत पोहोचू शकणार नाहीत, याचीच जणू जय्यत तयारी. मोपाचा मार्ग अडथळ्यांचा बनवलाय, त्याचवेळी दाबोळीला जाणारा रस्ताही खणायची काय आवश्यकता होती? पणजीचीही स्मशानभूमी करून ठेवलीय. ज्या काळात पर्यटकांची रीघ लागलेली असते, त्याच काळात ही कामे हाती घेणे, किती संयुक्तिक आहे?
समाजमाध्यमांवर जर एका कोणा मुखर्जीने जागतिक वित्त अहवालाचा हवाला देऊन गोव्यात टॅक्सी माफिया आणि हॉटेलांचे वारेमाप दर याबद्दल लिहिले तर त्याचे काय चुकले? याच वित्त सर्वेक्षण संस्थेने जो अहवाल दिला आहे, त्यातील आकडेवारी धादांत चुकीची आहे. गोव्यात चार ते पाच लाखांहून अधिक विदेशी पर्यटक कधीच आले नाहीत. या संस्थेच्या मते - २०२३ मध्ये १५ लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते, हीच संख्या २०१९ मध्ये ८५ लाख होती. या काळात जरूर देशी पर्यटकांची संख्या वाढली, ती एक कोटीवर गेली...हा एक मोठाच उच्चांक आहे...परंतु मुखर्जींच्या मते तोही बुडबुडा लवकरच फुटणार आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीच गेल्यावर्षी गोव्यात भेट देणाऱ्या देशी पर्यटकांची संख्या १ कोटी असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. गोव्यातील पायाभूत सुविधांकडे बारीक नजर ठेवणाऱ्या आमच्यासारख्या निरीक्षकांना त्यावेळी धक्काच बसला. मध्यमवर्गीय नागरिक सध्या तीव्र महागाई व अपुरी साधनसामग्री यांना तोंड देत असताना एक कोटी पर्यटकांची टोळधाड म्हणजे आमच्या तोंडचा घास पळवण्यासारखेच होते.
दुसऱ्या बाजूला पर्यटन व्यावसायिकही भांबावले होते. कारण हा वाढलेला पर्यटक दर त्यांना कोणताही फायदा मिळवून देत नव्हता. कळंगुटला हॉटेले चालविणारे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस म्हणतात की, रस्त्यांवर पर्यटकांची गर्दी दिसते, परंतु त्यांच्या हॉटेलांमध्ये कोणी दिसत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यटकांच्या गर्दीत खर्च करणारे श्रीमंत पर्यटक नसतात. पर्यटन क्षेत्रात समांतर निवासी व्यवस्था बोकाळली आहे.
मोठमोठ्या गृहनिर्माण वसाहतींमध्ये घरे भाड्याने घेऊन एआरबीएनबी सारख्या संस्था पर्यटकांना त्या उपलब्ध करून देतात. त्यांचा फायदा पर्यटन क्षेत्राला होत नाही, करही लावला जात नाही अशी हॉटेल व्यावसायिकांची तक्रार होती. तेथे ‘हप्ते-बाजार’ बोकाळलाय... त्यामुळे वाढलेला पर्यटक गोव्याला काय मिळवून देतो, अशी चर्चा सुरू झाली होती.
अशी चर्चा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची कुरतड करतो. या असल्या ‘कवडीमोल’ पर्यटकांमुळे गोव्याचे नाव अधिकच बदनाम होते... दर्जेदार पर्यटक गोव्यात येत नाहीत. नेटकऱ्यांनी गोव्याच्या पर्यटनाला गळती लागल्याचा दावा करताच समाजमाध्यमांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. लाखो नेटकऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला. त्याचाही धसका पर्यटन खात्याने घेतला आहे. खात्याच्या मते २०२३ मध्ये साडेचार लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. पर्यटन विकासाबाबत आम्ही कोणतीही कसर ठेवलेली नाही, असा त्यांचा दावा आहे.
मी पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रामाणिक व्यावसायिकांकडे बोलत होतो. टॅक्सी माफियांबद्दल कोणालाही सहानुभूती नाही. ॲपधरित टॅक्सी सेवा गोव्यात कार्यक्षमतेने सुरू करण्यात खात्याला अपयश आले आहे, हे सर्वश्रुत आहे. गोवा माईल्स चालू आहे, शिवाय सरकारने आपली ॲपबेस सेवा सुरू केली आहे. परंतु खासगी सेवेवर कोणतेही निर्बंध लागू झालेले नाहीत. टॅक्सी माफियांचा धाकदपटशा सरकारला नियंत्रणात आणता आलेला नाही.
विमान कंपन्यांवर निर्बंध नाहीत. मोपा सुरू झाल्यानंतर गोव्यात येणाऱ्या विमानांची संख्या वाढली. किमान १२० विमाने गोव्यात येत असतील तर त्यांचे दर स्पर्धात्मक असायला हवे होते. परंतु येणारे विमान तिकीट जर ३ ते ५ हजारांत मिळत असेल तर गोव्यातून जाण्यासाठी हा दर प्रचंड वाढलेला असतो. त्यापेक्षा व्हिएतनाम, थायलंड किंवा श्रीलंका ही स्थळे परवडणारी ठरत आहेत. याच खर्चाचा बागलबुवा निर्माण करून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण जरूर करत असतील.
गोव्याशी स्पर्धा करणारी दक्षिण आशियातील काही पर्यटन केंद्रे आणि देशांतर्गत राज्येही तसा प्रचार करू शकतात. परंतु राज्य सरकारही गोव्याच्या पर्यटनाचा विदेशात प्रसार करण्यासाठी १७० ते २०० कोटी रुपये खर्च करीत आले आहे. या खर्चाचा विनियोग होतो काय? व्यावसायिकांच्या मते, ज्या पद्धतीने पर्यटन खाते खर्च करीत आले आहे, त्याचा आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. हा खर्च व्यावसायिक पद्धतीने व्हावा. कारण हा करदात्यांचा पैसा आहे. त्यावर गोवा विधानसभेत हमरीतुमरीने चर्चा होते, परंतु त्यानंतर व्यावसायिक व तज्ज्ञांना घेऊन खर्च अधिक ‘अर्थपूर्ण’ दृष्टीने व्हावा यासाठी चर्चा होत नाही. त्यामुळे हा खर्च नेहमी वादाचा विषय ठरतो.
नेटकऱ्यांनी टॅक्सी माफियांबद्दल सतत लिहिले आहे. परंतु गोव्यातील पोलिस व वाहतूक खात्याने याबाबत काही शिस्त निर्माण केली आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही. वास्तविक मुजोर टॅक्सीवाल्यांना चुचकारण्याचे प्रयत्न चाललेले असतात. काही वर्षांपूर्वी गोव्यात ओला व उबेर टॅक्सी ॲपबेस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा टॅक्सी संघटनेने संप पुकारला. त्यानंतर राज्य सरकारने नमते घेतले. काही वर्षांपूर्वी दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर पर्यटकांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. पर्यटकांनी आपल्याला आलेले अनुभव समाजमाध्यंमावर शेअर केले आहेत.
भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर विदेश वाऱ्या करतात. मी व्हिएतनामला असताना तेथे एक भारतीय दाम्पत्य भेटले होते. गोव्यात जाण्यापेक्षा आम्ही व्हिएतनाम पसंत केले. कारण खर्चात मोठा फरक नव्हता. आम्ही विमानदर आणि वास्तव्याचा खर्च याची तुलना केली असता व्हिएतनाम सफर आम्हाला परवडत होती, असे ते दाम्पत्य म्हणाले.
गोव्यात पर्यटक येतात आणि या पर्यटकांना पुन्हा पुन्हा येथे येणे आवडते. गोव्याची म्हणून एक निश्चित जादू आहे. या राज्याचे आकर्षण आबालवृद्धांपासून अनेकांना असते. परंतु गोव्यात अतिपर्यटन झाले आहे, यातही तथ्य आहे. आग्नेय आशिया व युरोपातील अनेक देश स्वस्तात उपलब्ध आहेत. तेथे वाहतुकीच्या चांगल्या सुविधा, ऐतिहासिक स्थळांची होत असलेली देखभाल, निसर्ग व पर्यटन याची निगा अधिक चांगल्या पद्धतीने राखली आहे. महत्त्वाचे म्हणजे लुटालूट नाही. त्यामुळे देशी पर्यटक, त्यातल्या त्यात सधन वर्ग युरोपला जाणे पसंत करतो.
त्यामुळेच नजीकच्या काळात गोव्यात टोळधाडीप्रमाणे येणाऱ्या देशी पर्यटकांच्या संख्येतही घट होणार असल्याचे अनुमान काही तज्ज्ञांनी काढले आहे. श्रीलंकेसारखा देश तर अनेकांना भुरळ घालतो. तेथील अशांतता संपल्यानंतर अनेकांनी त्या देशाची वाट पकडली. एकेकाळी मध्यमवर्गाला गोव्याची भुरळ असण्याचे महत्त्वाचे कारण येथील आदरातिथ्य आणि काहीसा विदेशी माहोल - खुले व मुक्त वातावरण मुलींना, महिलांना स्वातंत्र्य - हेच होते. आज श्रीलंका किंवा व्हिएतनाममध्ये जाणे म्हणजेच विदेशी वारी असल्याने त्यांना ही ट्रिप अधिक आनंद देऊन जात असल्यास नवल नाही. महत्त्वाचे म्हणजे थायलंडनंतर अनेक देशांनी व्हिसामुक्त प्रवासाची सोय उपलब्ध केली आहे, त्यामुळेही पर्यटकांचे आकर्षण वाढले असल्यास नवल नाही.
नेटकरी काही म्हणोत गोव्यात पर्यटकांची संख्या खरोखरीच रोडावली आहे काय? एक गोष्ट खरी आहे, गोव्यात आता दोन विमानतळे निर्माण झाली आहेत आणि दोन्ही ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. गेल्या आठवड्यात मी स्वतः दोनवेळा विमानातून प्रवास केला असता ती विमाने भरगच्च होती आणि देशी पर्यटकांची गोव्याची ओढ प्रतिबिंबित करीत होती. १२० विमाने प्रतिदिनी गोव्यात उतरणे याचा अर्थ देशी पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे शिक्कामोर्तब होते. एक गोष्ट खरी आहे, एकेकाळी एक-दोनच समुद्रकिनारे गजबजलेले असत - विशेषतः कळंगुट पर्यटन पट्ट्यात पर्यटक गर्दी करीत. यंदा धारगळला सनबर्न होतोय. त्यामुळे पर्यटक पर्वरी, म्हापशापासून उत्तर गोव्याच्या बहुतांश केंद्रांमध्ये विखुरले गेल्यास नवल ते काय!
पर्यटन खात्याकडे या पर्यटकांचे मोजमाप करणारी यंत्रणा आहे काय? शिवाय गोव्याकडे येणारे पर्यटक दरवर्षी यावेत. नवी देशी पर्यटकांची भर पडावी. जादा खर्च करणारे श्रीमंत पर्यटक खात्रीने गोव्यात यावेत, यासाठी पर्यटन खात्याने काय प्रयत्न केले या गोष्टी लोकांसमोर यायला हव्यात. स्थानिकांना विचारा, कोणी जादा पर्यटन पसंत करणार नाही. पर्यटकांच्या भाऊगर्दीमुळे किनाऱ्यांच्या आसपास राहणाऱ्या गोवेकरांनी समुद्रावर जाणेच बंद केले आहे.
शॅकवाल्यांनी किनाऱ्यांवर कब्जा केला आहे आणि तेथे सुरू असलेली बजबजपुरी स्थानिकांना अतिपर्यटनाविषयी तिटकारा निर्माण करते. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण व गोंगाट यावर निर्बंध आणूनही कोणी ते पाळत नाही. एका ग्रीक व्यावसायिकाने आपल्या नाईट क्लबमध्ये एवढा गोंगाट चालवलाय की सांगता सोय नाही. थलासा हा नाईट क्लब उच्च न्यायालयाने अनेकदा इशारा देऊनही ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवत नाही.
पैसे फेकले तर गोव्यात काहीही चालू शकते, असाच काहीसा हा प्रकार आहे जो पर्यटनाला काळीमा फासतो. येथे पर्यटन खात्याचा धाक अपेक्षित आहे, परंतु खातेही हतबल बनले आहे. किनारपट्टीवर पर्यटन खात्याचा नव्हे, तेथील आमदारांचा दबाव चालतो. ते आपल्या भागाचे ‘राजाच’ बनले आहेत. ते सरकारलाही जुमानत नसल्याची चर्चा आहे.
एकतर त्यांनी तेथील पर्यटन व्यवसायावर कब्जा केला आहे किंवा स्वतःची बेदरकारी चालविली आहे. कळंगुटसारखा मतदारसंघ घ्या. मायकल लोबोंनी ते स्वतःचे ‘रिपब्लिक’ असल्यासारखेच चालविले आहे. बुधवारी जलसफरीदरम्यान बोट उलटून तेथे एक पर्यटक बुडून मरण पावला. या असल्या जलसफरीवर कोणाचेही नियंत्रण नाही. पर्यटकांना लोकांनी वाचविले. मग ज्या ‘दृष्टी’ला राज्य सरकार ६८ कोटी रुपये बहाल करते, ते कुठे होते? प्रसिद्ध ‘यूट्यूबर’ बीयरबायसेप्स ऊर्फ रणवीर अलाहाबादिया हा बुडताना एका अधिकाऱ्याने वाचविला आहे. छोट्या राज्यात आमदारांना ‘सांभाळून’ घेताना पर्यटनमंत्री व मुख्यमंत्र्यांचाही अधिकार चालत नाही. हा काहीसा ‘अराजकते’चाच भाग आहे.
गोव्यात शॅक धोरण आहे, परंतु कोणीही स्वतः ते चालवत नाही. तेथे काय चालते, अन्नापासून ते ध्वनी प्रदूषणापर्यंत कोणाचेही नियंत्रण नाही. पर्यटन खात्याच्या संचालकांनी याबाबत कधीच काही वाच्यता केलेली नाही. वास्तविक पर्यटन संचालक कोण आहेत, याचीही कोणाला माहिती नाही. एकेकाळी पर्यटन संचालक बोलके असत. ते सतत पर्यटन क्षेत्रातील घडामोडींवर आणि टिकेवरही भाष्य करीत. कोणीही माणूस जाऊन पर्यटन संचालकांना भेटू शकत असे.
एक पर्यटन व्यावसायिक म्हणाला, आम्ही गेल्या वीस वर्षांत अनेक पर्यटन मंत्री पाहिले, मिकी पाशेकोपासून बाबू आजगावकर यांच्यापर्यंत. सध्याचे मंत्री रोहन खंवटे बुद्धिमान आहेत, त्यांना पर्यटन क्षेत्रातील ही अनागोंदी संपवण्याचे धारिष्ट्य का असू नये? आमदारांच्या दबावामुळे पर्यटन खाते कारवाई करण्यास धजावत नसल्याची चर्चा ऐकू येते, परंतु त्यामुळे एकाबाजूला हप्ते बाजार - भ्रष्टाचाराला ऊत आलाय, तर दुसऱ्या बाजूला बेबंदशाही माजलीय. पर्यटन क्षेत्रावर नियंत्रण राहिलेले नाही.
एक गोष्ट खरी आहे - पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविली तर ती आंतरराष्ट्रीय बातमी बनते, परंतु ती गोव्यातील नागरिकांसाठी आनंदाचीच बातमी असते. कारण पर्यटनाच्या गोंगाटापासून ती असते मुक्ती! पर्यटन वाढणे म्हणजेच गर्दी आणि गजबजाट! जो अनुभव पणजीच्या फोन्तेन्हास भागातील रहिवासी दरदिवशी घेत असतात व दुपारचा ‘सिएस्टाही’ त्यांच्यासाठी दुर्लभ बनलाय, परंतु पर्यटक रोडावणे याचा अर्थही व्यवसायांवर परिणाम होणे - हा आहे.
पर्यटनाने बाळसे धरल्यावर अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले, हॉटेले, आस्थापने, दुकाने अहोरात्र उघडी राहू लागली. तेथे काम करण्यासाठी बाहेरून माणसे आली. काही लाख लोक आज पर्यटनावर पोट भरतात, परंतु ही परिस्थिती असली तरी हे दुधारी हत्यार आहे. कमी पर्यटक येत तेव्हा गोवा सुंदर होता. पर्यावरण शाबूत होते. स्थानिकांचे जीवनही शांत-सुंदर होते, परंतु पर्यटक वाढताच किनारपट्टीवर अनागोंदी माजून लोकांनी जमिनींवर कब्जा केला. बेकायदा व्यवसाय उभे राहिले. स्थानिकांनी शॅक चालवायला दिले व बाहेरचा मजूर गोव्यात येऊ लागला. किनारपट्टीवर किती व्यवसाय स्थानिकांच्या ताब्यात आहेत, हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे स्थानिकांना उबग आली. असले पर्यटन आम्हाला नकोच अशी भावना निर्माण झाली...
गर्दी -कोलाहलात दर्जेदार पर्यटन टिकू शकत नाही. सध्या पर्यटन म्हणजे कॅसिनो, मसाज पार्लर, ड्रग्स व वेश्या व्यवसाय - त्याच दिशेने आपला प्रवास चालू आहे. जादा पर्यटक म्हणजे जादा हॉटेले, किनाऱ्यांचा ऱ्हास व निसर्गावर आक्रमण...त्यामुळे गोव्याची शांतता व शान भंग पावली आहे. कधीतरी या पर्यटनाबाबत आम्हाला विचार करावाच लागणार आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.