Goa Culture Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Culture: गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे पर्जन्य आवाहन

Goa Sanjoan Festival: पोर्तुगीज अमदानीत खोर्जुवे बेटावरच्या लोकांचे धर्मांतर झाले, परंतु पर्जन्यदेवतेला पाऊस पाड म्हणून प्रार्थना करण्याची परंपरा मात्र नव्या धर्मात प्रवेश केल्यावरही कायम राहिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजेंद्र पां. केरकर

पोर्तुगीज अमदानीत खोर्जुवे बेटावरच्या लोकांचे धर्मांतर झाले, परंतु पर्जन्यदेवतेला पाऊस पाड म्हणून प्रार्थना करण्याची परंपरा मात्र नव्या धर्मात प्रवेश केल्यावरही कायम राहिली. हिंदू धर्मात पाऊस लांबला की, भाविक महादेवाच्या लिंगाला अभिषेक घालतात आणि ‘सांब सदाशिव पाऊस दे’

नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालखंडात आपल्याबरोबर चैतन्याची सनद घेऊन येतो. त्यामुळे यदा कदाचित माॅन्सूनच्या पावसाच्या नियोजित कालखंडातील आगमनास विलंब झाला तर कष्टकऱ्यांच्या तोंडचे पाणीच गायब होत असते. यावर्षी नैऋत्य मोसमी आगमनाची चाहूल लागल्याने हवामान खात्याने तशी सुचना दिली. परंतु सलामीला तुरळक पर्जन्यसरी कोसळून, तो गायब झाल्याने , गोव्यातील सर्व थरातील लोक चिंतातूर झाले.

राज्यभरातील धरणांच्या जलाशयातील पाण्याची पातळी खालवल्याने, कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना? अशी शंकेची पाल चुकचुकली. परंतु तीन आठवड्यानंतर मॉन्सूनचे आगमन पुन्हा झाल्याने, लोक प्रफुल्लित झालेले आहेत. गोव्यातील कष्टकरी हिंदू समाजाला जशी पावसाची प्रतीक्षा असते, तसाच इथला शेताभाटात राबराबणाऱ्या ख्रिस्ती समाजालाही मॉन्सूनने बराच काळ दांडी मारल्याने चिंता लागून राहिली होती.

बार्देशातील खोर्जुवे बेट एकेकाळी कृषीप्रधान होते आणि त्यामुळे येथील खाजन शेती मॉन्सूनच्या पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असायची. १९५९ साली जेव्हा मान्सूनच्या पावसाने बराच काळ दांडी मारली होती, तेव्हा इथल्या कष्टकरी समाजाने गावातल्या परंपरेनुसार खोर्जुवे किल्ल्यात असणाऱ्या सेंट अँथोनीच्या मूर्तीसमोर पावसाचे लवकरात लवकर आगमन व्हावे म्हणून आर्तपणे प्रार्थना म्हणून ‘माय दे देऊस’ चर्चकडून माथ्यावर दगड धारण करून किल्ल्यापर्यंत मिरवणूक काढली होती.

त्यावेळी म्हणे काही काळानंतर पर्जन्यवृष्टी झाली होती.यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने, चिंताग्रस्त खोर्जुवेवासीयांनी यंदाही तशी मिरवणूक काढली होती. आबालवृद्ध, तरुण यांचा समावेश असलेल्या मिरवणुकीने सेंट अँथोनीला पाऊस लवकर पाड, शेताला सिंचन पुरव अशी प्रार्थना गात, गात किल्ल्यातल्या सेंट अँथोनीसमोर समारोप करण्यात आला. सुदैवाने मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने, मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना सेंट अँथोनी आपल्या हाकेला पावला, अशी भावना झाली.

पोर्तुगीज अमदानीत खोर्जुवे बेटावरच्या लोकांचे धर्मांतर झाले, परंतु पर्जन्यदेवतेला पाऊस पाड म्हणून प्रार्थना करण्याची परंपरा मात्र नव्या धर्मात प्रवेश केल्यावरही कायम राहिली. हिंदू धर्मात पाऊस लांबला की, भाविक महादेवाच्या लिंगाला अभिषेक घालतात आणि ‘सांब सदाशिव पाऊस दे’ शेतीभाती पिकू दे, असे उच्च रवाने गातात. धर्मांतरीत झाल्यावर त्यांनी अशी प्रार्थना सेंट अँथोनीकडे करण्याची परंपरा सुरू केली.

ख्रिस्ती धर्मात जॉन द बाप्तिस्ट येशू ख्रिस्तापूर्वी सहा महिने अगोदर जन्माला येतो आणि त्याला येशूच्या आगमनाची पूर्वसूचना मिळते, तेव्हा तो प्रसन्न होतो आणि हेरोद राजाच्या आंतकात हौतात्म्य पत्करतो. अशा जॉनला संतपद लाभते आणि कालांतराने त्याच्या नावाने २४ जूनला सांजाव फेस्त साजरे करण्याची गोव्यात परंपरा सुरू झाली. सांजाव फेस्त साजरे करणाऱ्या इथल्या ख्रिस्ती समाजाने पूर्वाश्रमीच्या आपल्या रितीरिवाजांचा, विधींचा त्याग न करता, नव्या रुपात त्यांचा स्वीकार केला.

या फेस्त काळात मॉन्सून सक्रिय असल्याने, त्यांनी जणूकाही त्याच्या आगमनाला सलामी देणे इष्ट मानले. मृग नक्षत्रात गोव्यात पावसाला सुरुवात होते, जमिनीत लाल रंगाचा किडा दिसताच, इथल्या शेतकऱ्यांना बियाणी पेरणीचा संकेत मिळतो आणि खरीपाच्या पेरणीला प्रारंभ होतो आणि शेतकरी खुशीत असतो. मृग नक्षत्र म्हणजे पावसाचे आगमन आणि त्यामुळे मिरगाच्या स्वागताची इथल्या हिंदूची परंपरा ख्रिस्ती समाजातही पहायला मिळते.

रानावनातील वेली आणि बागेतील मौसमी फुलांपासून सुंदररित्या अलंकृत केलेले कोपेल (मुकूट) मस्तकी धारण करून,प्रभू येशू आणि सेंट जॉन द बाप्तिस्ट यांना सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करून, सांजावाच्या उत्साहाला उधाण येऊ लागते. घुमट, कासाळे, गिटार, व्हायोलिन आदी वाद्यांच्या संगीतावर गाऊ लागतात,-ओ रे सांजाव,ओ रे सांजाव,सांजांव घुंवता तसो घुंवताबायत उडी मारता सांजांव पातोळ्यो मागोता, सांजांव पोणोस मागोताकांय ना तोरी खोशयेन दिता ते मागोता.

तर कधी कधी गाताना, आपल्या या फेस्ताला खास उपस्थित असलेल्या आप्तेष्टांच्या कल्याणाविषयी उत्कटपणे इच्छा व्यक्त करतात.

भांगराची सुरी तेका

रुप्याचे थोरू

सोयरे आमचे येयल्या तेंचे देवान बरे कोरू

सांजाव फेस्तातल्या उत्साहात बऱ्याचदा नर्तक मद्याच्या प्रभावाखाली देहमान विसरून गाताना, अशी उत्साहपूर्ण फेस्तं, वर्षातून दोनदा का येत नाही, असे प्रश्न विचारायला विसरत नाही -

सांजांव, सांजांव

घुंवता आमका वाट दिसना

अशी फेस्तां वर्साक दोनदा कित्याक येना ?या फेस्ताच्या वेळी अननस, फणस या रसदार फळांचा जसा आनंदाने आस्वाद घेतला जातो, तसेच पातोळया, बॉलसारख्या पारंपारिक गोडधोड पदार्थांचाही मनसोक्तपणे आस्वाद घेतला जातो.गोव्यात पेडणे ते काणकोणपर्यंत नृत्य , गायन, वादनादवारे सांजांवचा जसा आनंद द्विगुणित केला जातो, तसाच तो मौसमी फळाफुलांच्या रस, रंग, गंधानेही वृद्धिंगत केला जातो.

फोंडा तालुक्यातील उसगाव येथील कातोर, बाळजुवे आणि सोनारबाग येथील ख्रिस्ती समाजाच्या सांजांव फेस्तात तर तेथील आदिवासी गावडा जमातीचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. संध्याकाळी सेंट सेबिस्तांवच्या जुन्या चॅपेलसमोर ख्रिस्ती समाज भक्तिभावपूर्णतेने येशु ख्रिस्त, सेंट जॉन द बाप्तिस्ट यांच्यासमोर नतमस्तक होऊन, सर्वांचे भले होण्याची प्रार्थना करतात त्यानंतर नव विवाहित दांपत्याच्या घरी जाऊन, त्यांना मिरवणूकीत सहभागी करून घेतात आणि नवविवाहितेनं माहेराहून आणलेल्या गोडधोडाचा आस्वाद उत्साहाने घेतात.

त्यानंतर सोनारबाग येथील आदिवासी गावडा जमातीच्या घरोघरी सांजांवाची मिरवणूक जेव्हा पोहचते, तेव्हा तेथील तुळशी वृंदावनाच्या सान्निध्यात कुठे पिकलेले फणस, अननस तर कुठे हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्याही खाण्यास दिल्या जातात. ख्रिस्ती समाजाच्या या पारंपारिक सांजाव फेस्तात स्थानिक हिंदु जाती जमातींचाही आत्मीयतेनं होत असलेला सहभाग पहायला मिळतो.

सोनारबागचा परिसर दूधसागर खोऱ्यातून प्रवाहित होणाऱ्या खांडेपार आणि कर्नाटकातल्या देगावातून उगम पावणाऱ्या म्हादई यांच्या

संगमस्थळावरुन मांडवी नाव धारण करणाऱ्या जीवनदायिनीच्या सान्निध्यात वसलेला आहे . खांडेपार आणि म्हादईच्या सुपिक गाळामुळे इथे एकेकाळी माडांच्या समृद्ध बागा होत्या आणि याच माडांची सूर काढून हुर्राक, फेणी आणि गुळाची निर्मिती केली जायची . आज इथले हे पारंपारिक उदयोग, व्यवसाय विस्मृतीत गेलेले असले, तरी आपल्या अंतःकरणात असलेले माती आणि संस्कृतीविषयीचे उत्कट प्रेम मात्र कायम ठेवलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA WC 2026: वडील मुस्लिम, आई बौद्ध, स्वतः ख्रिश्चन; 8 देशांशी नातं असलेल्या ऑस्ट्रियाचा कर्णधार डेव्हिड अलाबाची अनोखी जीवनकहाणी

Goa TCP Department: 'टीसीपी' खात्यातील कर्मचाऱ्याचे निलंबन, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारची कारवाई

क्षणिक थरार, आयुष्यभराची वेदना! सहलीत दारू, बेफिकिरी आणि सेल्फीचा नाद ठरतोय जीवघेणा

खरी कुजबुज: कोण म्हणतोय, राजकारण 'डर्टी' आहे?

Revolutionary Goans Party: 'आरजीपी'तील वाद पोलिसात! पक्षाच्या सोशल मीडियाच्या खात्याचा बेकायदा ताबा

SCROLL FOR NEXT