गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारशाचे वर्णन करणारी अनेक दगडी शिल्पे आहेत, अशा अनेक दगडी स्मारकांना वीरगळ किंवा स्मारकशिला म्हणून ओळखले जाते. वीरगतीस गेलेल्या वीराचा उचित सन्मान व्हावा, आठवण राहावी म्हणून सपाट पाषाण शिळेवर त्या वीराचा युद्धप्रसंग व स्वर्गारोहणाचे शिल्पांकन करत. अशा शिल्पांना ‘वीरगळ’ म्हणतात.
पूर्वी वीर जेव्हा वीरगतीस जातो तेव्हा तो स्वर्गात जातो असा समज होता. या वीरगळांच्या माध्यमातून पूर्वी वीरांना लढाईसाठी प्रोत्साहन मिळत असे, योद्धे लष्करात सामील होत असत. वीरगळ शिल्पे गावोगावी पाहायला मिळतात. गावाच्या वेशीवर जिथे स्मशान आहे तिथे हमखास पाहायला मिळतात. गावातील मुख्यत: महादेव मंदिर, वेशीबाहेर, किल्ल्यावर, रणक्षेत्री असे वीरगळ दिसतात.
काही ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी अत्यंत दुरवस्थेत पाहायला मिळतात. ज्या गावात ही पाहायला मिळतात, त्या गावचा वीराने नक्कीच रणांगण गाजवलेले असते. त्याच गावच्या पूर्वजांचा नक्कीच गाववाल्यांना अभिमान. गावात वीरगळ असणे म्हणजे त्या गावच्या पराक्रमी असण्याची साक्षच जणू! पण, अनेकदा या वीरगळांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. महाराष्ट्रात, अशा स्मारकांना वीरगळ म्हणूनच ओळखले जाते, तर कर्नाटकात ती ‘विरकल्लू’ म्हणून ओळखली जातात.
भारताच्या इतर भागांप्रमाणे गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारशाचे वर्णन करणारी अनेक दगडी शिल्पे आहेत, अशा अनेक दगडी स्मारकांना गोव्यातही वीरगळ किंवा स्मारकशिला म्हणून ओळखले जाते. युद्धात, लढाईत, चकमकीत भाग घेतलेल्या आणि शत्रूशी लढताना मरण पावलेल्या वीराच्या स्मरणार्थ उभारलेली दगडी शिल्पे इथे आढळतात. गोव्याबरोबरच बाहेरील राज्यांत वीरगळावर शिलालेख कोरलेले दिसतात.
त्यामुळे युद्ध, वीराचे नाव, तिथी, राजा इत्यादी गोष्टींची माहिती मिळते व इतिहास समजतो. मात्र गोव्यात काही क्वचितच ठिकाणी वीरगळावर लेख सापडतात. सुप्रसिद्ध जर्मन विद्वान डॉ. ग्रिटली मिटरवालनर आणि गोव्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे पूर्व संचालक असलेले इतिहास आणि राज्याच्या अभिलेखांवर अभ्यासपूर्ण संशोधन करणारे इतिहासकार, दिवंगत डॉ. पी. पी. शिरोडकर यांनी गोव्यातील बरेच वीरगळ प्रकाशात आणले आहेत.
गोव्यातील सापडणारे वीरगळ साधारणपणे, अखंड पाषाण दगडावर तीन किंवा चार भागामध्ये विभागलेला सापडतो. सर्वांत खालचा भाग लढाईचे दृश्य दाखवते, मधला भाग नायकाला स्वर्गात नेले जात असल्याचे दाखवते आणि वरच्या भागामध्ये नायक स्वर्गात देवासमोर बसून प्रार्थना करत असल्याचे दाखवते जाते.
पूर्वी वीर जेव्हा वीरगतीस जातो तेव्हा तो स्वर्गात जातो असा समज होता म्हणून वीरगळावर वीर स्वर्गात गेल्यावर शिवपूजा करत असलेले दाखवतात, तसेच त्याला मोक्ष मिळालेला दाखवतात. गोव्यात सापडलेल्या बहुतेक वीरगळ शिल्पांमध्ये युद्धाची दृश्ये किंवा वन्य प्राण्यांच्या शिकारीची दृश्ये दाखवली आहेत.
गोव्यात कुशावती जिल्ह्यात केपे तालुक्यातील मळकर्णे येथे सापडलेला एक वीरगळ नौदल युद्ध दर्शवितो, ज्यामध्ये अनेक सैनिक युद्धनौकांमध्ये बसलेले आहेत. कावरे-पिर्ला येथे सापडलेला वीरगळ मंदिरापासून काही अंतरावर चंपकच्या झाडाखाली उघड्यावर संरक्षणाच्या अपेक्षेत आहे. डॉ. पी. पी. शिरोडकर यांचा मते या वीरगळचे चार भाग आहेत.
सर्वांत खालच्या भागामध्ये नायक इतर व्यक्तींसोबत बसलेला दाखवला आहे. दुसऱ्या भागामध्ये नायकाला तीन महिला आणि एका मुलासह उभे दाखवण्यात आले आहे. दोन दूध पिणाऱ्या वासरांसह दोन गायी व अनेक गुरांनाही दाखवण्यात आले आहे. तिसऱ्या भागामध्ये सिंहासनावर बसलेला व डोक्यावर शाही छत्र असलेला नायक आणि काही संगीतकार व दोन स्त्रिया उभ्या असलेल्या दर्शवण्यात आले आहे. सर्वांत वरचा भाग एक शिवलोक दर्शवितो.
कावरे येथे या वीरगळाचा कोणताही शिलालेख किंवा मौखिक परंपरा उपलब्ध नसल्याने तो कोणी उभारला हे सांगणे कठीण आहे. पण, एक गोष्ट नक्की आहे, या वीरगळातील नायकाने कावरे गावावर आलेले संकट स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन दूर लोटले होते. बहुधा या वीराने कावरे गावात असलेल्या गोधनाचे शत्रूच्या हल्ल्यातून रक्षण केले आणि त्यात त्याला वीरमरण आले असावे. अशा या वीराची उपेक्षा न होता रीतसर स्मारकाची पूजा होणे जरुरीचे आहे.
या दुर्मीळ वीरगळाचे आहे तिथेच जतन आणि संवर्धन व्हावे, हीच अपेक्षा. पूर्वी गोव्यात विधिवत आत्मबलिदानाची प्रथा होती. अशा प्रकारच्या स्मारकशिला मडकई, बांदिवडे व फोंडा येथेही सापडल्या आहेत. अशा वीरांना धर्मवीर म्हणून ओळखले जात असे. चित्रात दाखवलेल्या बांदिवडे तेथील स्मारकशिलेमधील खालच्या भागात वीराची आणि त्याच्या बलिदानाच्या कृतीची माहिती दिली आहे.
त्यात वीराचे स्वतःचेच धड नसलेले शीर व माणसाचे शिरच्छेद केल्याचे चित्रण आहे, जे बहुधा एका धार्मिक विधीचा भाग म्हणून केले गेले असावे. मधल्या भागात अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जात असल्याचे चित्रण आहे. वरच्या भागामध्ये सिंहासनावर बसलेला व डोक्यावर शाही छत्र असलेला नायक आणि काही संगीतकार दर्शवण्यात आले आहेत. दगडी स्मारकशिला किंवा वीरगळाचा कोणताही शिलालेख किंवा मौखिक परंपरा गोव्यात उपलब्ध नसल्याने तो कोणी उभारला हे सांगणे व त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्याला आजही माहीत नाही.
-सर्वेश बोरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.