‘आरजी’चे अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यामधला वाद तर सर्व सीमा ओलांडून पार जाताना दिसत आहे. यात चूक कोणाची आणि बरोबर कोण, हे शोधण्यात काहीच अर्थ नाही. प्रश्न आहे तो हा वाद पक्षाला कुठे नेऊन सोडणार तो.
आरजी म्हणजेच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष. या पक्षाने गतवेळी पहिलीच निवडणूक असूनही चक्क दहा टक्के मते प्राप्त करून चांगलाच प्रभाव दाखवला होता. या त्यांच्या प्रभावामुळे अनेक राजकीय पक्षांची मती कुंठीत झाली होती. कोणताही प्रस्थापित नेता नसतानाही या पक्षाने ही कमाल करून दाखवली होती, हे विशेष. १९६१ सालापूर्वी म्हणजे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गोव्यात असलेले लोकच हे खरे गोमंतकीय ही त्यांची गोमंतकीयांबाबत असलेली व्याख्या अनेक मूळ गोमंतकीयांना दिलासा देणारी ठरली होती.
म्हणूनच तर त्यांचे ‘पोगो बिल’ विधानसभेत संमत झाले नसले तरी लोकांच्या चर्चेचा विषय बनले होते. त्यांच्यामुळे अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलताना दिसू लागली होती. शिरोड्यासारख्या मतदारसंघात जिथे ‘आरजी’चे नामोनिशाण नाही, असे वाटत होते, तिथे ‘आरजी’च्या शैलेश नाईक यांनी ५,०६३ मते प्राप्त करून राजकीय विश्लेषकांचे गणितच बदलून टाकले होते.
तीच गोष्ट वाळपईची. विश्वजीत राणेंचा बालेकिल्ला म्हणून गणल्या जात असलेल्या वाळपई मतदारसंघात ‘आरजी’च्या मनोज परबांनी पहिल्याच प्रयत्नात तब्बल ६,३७७ मते घेऊन अनेकांना चक्रावून सोडले होते. वाळपईबरोबर परबांनी थिवी मतदारसंघातही चांगली कामगिरी केली होती. त्यांनी जर थिवी मतदारसंघातून निवडणूक लढवली असती तर ते तेथेही जिंकू शकले असते, असे अनेक राजकीय विश्लेषकांना त्यावेळी वाटत होते.
‘उजो’ हा आरजी पक्षाचा नारा अनेक युवकांचा परवलीचा शब्द बनला होता. त्यांचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांची त्यांच्या सांत आंद्रे मतदारसंघातील तसेच विधानसभेतील कामगिरी ही समाधानकारक होती. अशा सर्व सकारात्मक बाबी सोबत असल्यामुळे हा पक्ष आगामी निवडणुकीत अजून भरीव कामगिरी करेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. पण सध्या हा पक्ष ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहे, ते पाहता याला, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणावे का पडद्यामागचे कारस्थान म्हणावे, हेच कळत नाही. भाजपचा पराभव करण्याकरता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे अनेकांना वाटत होते आणि वाटत आहेही. पण सध्या एकत्र येण्याचे सोडा हे पक्षच दुभंगताना दिसू लागलेत.
यामुळे भाजपसमोरचे आव्हान दिवसेंदिवस सोपे होत चालले आहे. आरजी व काँग्रेसची युती होणार, असे सांगितले जात होते. पण जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे हे युतीचे घोंगडेही भिजत पडल्यासारखे झाले आहे. त्यात परत आरजीमधले दोन गट एकमेकांशी भिडू लागल्यामुळे ‘आकाशच फाटले आहे, तेथे ठिगळे तरी किती लावणार’ अशी त्यांची स्थिती झाली आहे. याला पक्षाची अपरिपक्वता, असेही काही राजकीय विश्लेषक संबोधू लागलेत. आरजीचे पूर्वीचे अध्यक्ष मनोज परब हे या पक्षाची शक्ती होती, हे कोणीच नाकारू शकणार नाही.
पण त्यांचे राजीनामानाट्य व आता परत येण्याची तयारी यांतून पक्षात निर्माण झालेला वैचारिक गोंधळ अधोरेखित होऊ लागला आहे. आता दोन्हीही गट एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करण्याची तयारी करत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. अब्रूनुकसानीचा खटला काय, पोलिस तक्रारी काय, पत्रकार परिषदेतून एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न काय, यांमुळे राजकीय वातावरण गढूळ होताना दिसू लागले आहे.
अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यामधला वाद तर सर्व सीमा ओलांडून पार जाताना दिसत आहे. यात चूक कोणाची आणि बरोबर कोण, हे शोधण्यात काहीच अर्थ नाही. प्रश्न आहे तो हा वाद पक्षाला कुठे नेऊन सोडणार तो. या पक्षाचे जे मतदार आहेत, त्यांनी पक्षाकडून ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या त्यांचे काय होणार, हाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
यामुळेच फुलण्यापूर्वीच हा पक्ष खुरटणार तर नाही ना, असेही अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षांशी युती करण्यापूर्वी पक्षात जे भगदाड पडले आहे ते बुजविण्याचा प्रयत्न ‘आरजी’च्या पदाधिकाऱ्यांनी करायला हवा. अन्यथा ‘ये तेरा क्या हो गया, देखते देखते फिजां छा गया’ असे म्हणण्याखेरीज लोकांकडे दुसरा पर्याय राहणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.