Goa Politics Satire Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics Satire: गोव्याच्या अधिवेशनाची राजकीय 'आकडेमोड'!

Goa Assembly Session 2026: ऑगस्ट हा कोणाचा तरी महिना असं म्हटलं जातं. कोणाचा असावा बरे? असेना का कोणाचा! खोलात का जावे?

दैनिक गोमन्तक डिजिटल

ऑगस्ट हा कोणाचा तरी महिना असं म्हटलं जातं. कोणाचा असावा बरे? असेना का कोणाचा! खोलात का जावे? बुडत्याचा पाय ‘खोलात’ म्हणतात, मला कुठेच बुडायचं नाही. आपलं बूड सलामत तर महिने पचास हेच शेवटी खरं! तरीसुद्धा माझ्या सारख्यानं ‘आषाढ’ सोडून ‘ऑगस्ट’ पकडावा म्हणजे मी महाकवी कालिदासभक्त नसून ‘अंधभक्त’ आहे, असाही संदेश समाजमाध्यमावर फिरल्यास आश्चर्य नव्हे.

म्हणूनच मी हल्ली महिन्याच्या बाबतीत भलताच जागृत असतो. आता हेच बघा ऑगस्ट महिना कोणाचाही जरी असला तरी यंदाचे ऑगस्ट आणि सप्टेंबर मात्र सरकारविरोधी आमदारांचे आणि या महिन्यात ते सरकाराला सळो कि पळो करून सोडतील! असा माझा ठाम कयास होता आणि त्याच प्रतीक्षेत मी होतो. असं असूनही विरोधक अधिवेशनाचा काळ वाढवून का मागतात, याचं आकलन मला होईना म्हणून मी विजयना जाऊन भेटलो.

एरवी ते माझ्या सारख्याना भेटत नसतात पण यावेळी भेटले. कारण नुकतेच ते लंडनहून कसलातरी पुरस्कार घेऊन परतलेत... तो गोव्यातील जास्तीत जास्त लोकांच्या दृष्टीस पडावा, असं त्याना मनापासून वाटत असल्याने त्यांचा दरवाजा खुला होता. त्यांचंही बरोबर म्हणा, गोवाभर फलक लावले तरी परिणाम नसतो. सरकारने असल्या फलकांचा पाऊस पाडण्याचा सपाटा चालवलाय. कुठलाही उपक्रम असो त्याच्या अनुषंगाने रस्ताभर फलकच फलक!

त्यात मंत्री प्रामुख्याने आणि आमदार, खासदाराची लायकी प्रमाणे वर्णी. फलकावरील त्यांच्या छब्या पाहून प्रत्यक्षात हेच का ते? असा प्रश्न पडावा. तर ‘अति परिचयात अवज्ञा’ अशी हल्लीच्या काळात फलकांची गत झाल्याने विजयने फॉरवर्ड जाऊन आपल्या बंगल्याचे दरवाजे खुले ठेवले असावेत! मी प्रथम त्याना लाभलेल्या ‘लंडन अवार्डा’चे भक्तिपूर्वक दर्शन घेतले आणि ‘यंदाच्या अधिवेशनाचे दोन महिने तुम्हा विरोधकांना का बरे कमी वाटतात?’ असा भाबडेपणाने त्यांना सवाल केला.

माझ्या या प्रश्नाने ते गोंधळले आणि मला एकटक पाहू लागले. आणि नंतर एकदम म्हणाले, “तकलेन सुटला रे, दोन म्हयने कोणा बापायचे..’ मी गोंधळलो, माझ्या तर नव्हते बहुतेक सरकारच्या असावे..! नंतर गिरीश चोडणकरांकडे पहावे तसे पहात त्यानी मला समजावले. ‘आरे येंड्या, ऑगस्ट-सप्टेंबर असं अधिवेशन असलं तरी दोन महिने नाही. ते ३१ ऑगस्टला सुरू होऊन २ सप्टेंबरला संपतंय. फक्त तीन दिवस.’

‘अरेच्चा! हे तर माझ्या लक्षात आलंच नाही!’ मी ते प्रांजळपणे मान्य केलं.‘तें येवचेंच ना, खुंट्या माकड तुमी, अंधभक्त, तो प्रमोद तुमकां शिंगा लायता!’ अरे देवा! कुठली झक मारली आणि विजयकडे गेलो असं वाटायला लागलं. त्याना लाभलेल्या लंडन अवार्डाचे भक्तिभावाने दर्शन घेऊनसुद्धा माझ्यासारख्या पत्रकारास ‘येंडो’, ‘खुंट्या माकोड’, ‘अंधभक्त’ म्हणावे? आज गोव्यात पत्रकाराना काडीचाही सन्मान राहिलेला नाही. तरी बरें सरकार आम्हाला ‘प्रेमबरे,सहानुभुतीबरे’ हृदयास कवटाळतात. गोव्याच्या दक्षिणेतल्या विजयापेक्षा भारताच्या दक्षिणेतला विजय बरा.

असाच काही तरी विचार घोळवत मी थेट सीएमना फोन केला. सीएम हल्ली कोणाचाही फोन आला तर चटकन घेतात. हा गुण म्हणे त्यानी माजी सीएम दिगंबर कामतकडून घेतलाय..! खरोखरच वाखाणण्यासारखा गुण आहे, लोकं अजूनही कामतची आठवण काढून त्यांचे गुणगान गात असल्याचे दिसतात. मध्यंतरी त्यांची ‘तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती मात्र धुपाटणं’ अशी अवस्था झालेली होती. त्याकाळी ते बहुतेक फोन घेत नसावेत पण प्रखर देवभक्त असल्याने त्यांनी धुपाटण्याचेही ‘सोनं’ केलं म्हणतात!

तर दिगंबरांच्या प्रभावाने का होईना सीएमही फोन घ्यायला लागले. ही माझ्यासारख्याना खरोखरच अभिमानाची आणि भाग्याची बाब होती. विचारलं, ‘सीएमसाहेब अधिवेशन दोन महिन्याचं की दोन दिवसांचं..?’ माझ्या प्रश्नाला त्यानी सवयीनुसार प्रथम ‘भिवपाची गरज ना’ म्हटले. नंतर म्हणाले, ‘तुझ्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर,आमच्यासाठी दोनच दिवस.’ माझं समाधान झालंच शिवाय मला मागची एक गोष्ट आठवली,

महाविद्यालयात शिकताना आम्ही गॅदरींगला स्कीट सादर केलेला एक तरुण लग्नानंतर नोकरीसाठी दुबईला जातो. काही कारणास्तव साडेचार महिन्यातच त्याला घरी परतावं लागतं, येऊन पहातो तर त्याची पत्नी नऊ महिन्याची गरोदर असते. नवरा जाब विचारत म्हणतो, ‘लग्न होऊन साडेचारच महिने तर झालेत!’ तर बायको म्हणते ‘तुजे साडेचार, म्हुजे साडेचार,कितु म्हुयने जाले रे रुजार..?’ रुजार आकडेमोड करतो आणि नऊ महिन्यांची बेरीज करतो. मग नवरा-बायको मिठ्या मारत गाणं म्हणत आनंद साजरा करतात.

माझी ही आठवण मी सीएमना ऐकवली नाही तर त्यानीच मला ऐकवलं. म्हणाले, ‘निवडणूक अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. अधिवेशन दोन दिवसांचं काय आणि दोन महिन्यांचं काय आमच्या पक्षावर त्याचा काडीचाही फरक पडणार नाही. आमचे ‘अबकी बार सत्ताईस पार’ हे नक्की झालेलच आहे. त्यात दोन दिवसांचंच अधिवेशन ठेवून मी सगळ्यांचाच फायदा केलाय. अधिवेशन भत्त्याच्या नावाने भरमसाट होणारा खर्च मी वाचवला.

सभागृहात विनाकारण कंठशोष करणाऱ्या विरोधकांची शक्ती मी वाचवली. तिचा विनियोग ते आता प्रचाराच्यावेळी बिनधिक्कत करू शकतात. आणि त्यातही त्यानी बचत केली तर नव्या विधानसभेत वापरू शकतात; कारण विरोधीपक्षाचा आवाज नसला तर लोकशाही झोपून जाईल.’मला ‘लोकशाही’ म्हणजे काय हे विचारायचे होते पण त्यानी फोन ठेवला. पण काही का असेना माझ्या सारख्यांचे फोन घेतात हेही नसे थोडे थोडके...!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bandoda Theatre Tradition: गोव्यातल्या जत्रा, नाटके आणि आठवणींची नांदी, बांदोड्याच्या सालातली तालीम

Lady Fish Marathi Cuisine: मूडदुशी... जिभेला आल्हाद आणि मनाला 'मूडखुशी' देणारा मासा!

Self Discovery Through Writing: लेखन, कीर्तन आणि भजन; समाजप्रबोधनाची आणि आत्मशोधाची उज्वल परंपरा

Viral Video: 'तिकीट कन्फर्म होतं बहुतेक!' रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांऐवजी म्हशींचा वावर, डब्यात बकऱ्यांचा मुक्काम; व्हिडिओ झाला व्हायरल

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

SCROLL FOR NEXT