Goa Mla Ganja Controversy: Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

आधुनिक दु:शासन - संपादकीय

Goa Mla Ganja Controversy: ‘आचार, विचार, आचरणातून लोकप्रतिनिधी जनतेसमोर आदर्श ठेवतात, अशी धारणा असल्यास तुम्ही मूर्ख आहात!’, हेच गोव्यातील राजकीय नेते कृतीतून सांगू पाहत आहेत.

Sameer Amunekar

‘आचार, विचार, आचरणातून लोकप्रतिनिधी जनतेसमोर आदर्श ठेवतात, अशी धारणा असल्यास तुम्ही मूर्ख आहात!’, हेच गोव्यातील राजकीय नेते कृतीतून सांगू पाहत आहेत. गिधाड कितीही उंचावर असले तरी त्याची तीक्ष्ण नजर भक्ष्‍य टिपते. त्याचप्रमाणे धारगळ येथे एका युवकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याचे निमित्त साधून माजी आमदार तथा मंत्री मनोहर आजगावकर यांना पेडणे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा साक्षात्कार झाला. तसे अधूनमधून त्यांना पेडण्याप्रति उमाळे येत असतात.

पेडण्याचे आमदार ‘गांजा विकतात, मग कायदा सुव्यवस्था कशी राहणार?’, अशा विधानाद्वारे आजगावकरांनी विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकरांवर नेम साधत भाजपला घरचा आहेर दिला आहे. प्रवीण आर्लेकरांनीही ‘बाबूंनी मुलाला घालून दिलेल्या डिस्कोथेकमध्ये गांजा विकला जातो’, असा प्रतिहल्ला केला. उपरोक्‍त विधानांमुळे लोकानुरंजन होत आहे; परंतु ही वक्‍तव्‍ये अत्यंत गंभीर आहेत.

पोलिसांनी स्वेच्छा दखल घेऊन दोघांचीही चौकशी करावी. राज्यभरात अलीकडेच अमली पदार्थविरोधी जनजागृतीपर रॅली काढल्या गेल्या. पालकांनी आपल्या पाल्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली. त्याला अवघे काही दिवस उलटतात, तोवर पेडणे तालुक्‍यातील आजी, माजी आमदारांनी एकमेकांवर केलेला गांजा विक्रीचा आरोप भाजपच्या उरल्यासुरल्या इभ्रतीला चूड लावणारा आहे.

पेडण्यातील आमदारांना गांजाचा चढलेला ‘कैफ’ लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेला तडा देणारा आहे. ते पाहून कुणासही अचंबाच वाटेल. मुख्यमंत्र्यांची मती गुंग न झाल्यास नवल. गावडे प्रकरणातून थोडी उसंत मिळते तोवर आजगावकर व आर्लेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमोर नवे आव्हान उभे केले आहे. जे सरकार अमली पदार्थमुक्‍तीचा नारा देते, त्यातील दोघे खरेच गांजा विकत असल्यास सरकारची पत काय उरली! सत्तेतील राजकीय पुढाऱ्यांनी यापुढे संस्कृती, संस्कारांच्या गप्पा हाणताना किमान वस्तुस्थितीचे भान जपावे.

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ यापेक्षा तुमची स्थिती निराळी नाही, हे वरचेवर दिसले आहे. राजकीय नेत्यांनी जनतेला दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते. ती आता फोल ठरू लागली आहे. गोव्यात सत्ताधारी भाजपसमोर विरोधक नसल्याने नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. यापूर्वी सरकारवर स्वकीयांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पांडुरंग मडकईकरांच्या विधानावर कोर्टाने ‘एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश दिले. आता अमली पदार्थांमुळे युवा पिढी बरबाद होत आहे, त्याची आमदारच विक्री करत असल्यास गोव्याचे भवितव्य काय असेल? असे आमदार लाभणे, हे पेडणेवासीयांचे दुर्दैव.

दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांत तथ्य किती आणि राजकारण किती, हा भाग जमेस धरूनही हे संकेत फारच गंभीर आहेत. पुढे जाऊन ‘पत्रकारांनी बोलण्याचा विपर्यास केला’, अशी मल्लिनाथी दोघेही करू शकतील. ‘रागाच्या भरात बोललो’, अशी मखलाशी करत एकमेकांच्या गळ्यात गळेही घालतील. पण, जे थेंबाने घालवले आहे ते हौद रिकामा केला तरी परत येणार नाही. ही अशी सुंदोपसुंदी २०२७पर्यंत सुरूच राहणार आहे.

यातून घडीपुरते मनोरंजन होत असले तरी मुख्य महत्त्वाचा मुद्दा शिल्लक राहतोच. या दोहोंनी एकमेकांवर असे आरोप केले नसते तरी परिस्थिती काही फारशी वेगळी झाली नसती. गांजाविक्री आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी सत्यच आहेत. ते प्रत्यक्षात लोकांना पदोपदी जाणवत आहे. कोलवाळच्‍या जेलमध्‍ये गांजाफेक होते, आता नेते एकमेकांवर करू लागले आहेत. सभ्यता व सुसंस्कृतपणा भांडणावेळी लक्षांत येतो. कधीकधी लपवलेले वा लपवू पाहत असलेले सत्यही नकळत बाहेर येते. हा त्यातलाच प्रकार आहे.

दिल्लीश्वर श्रेष्ठींकडून दंडुका बसल्यावर हे दोघेही गल्लीश्वर लगेच माघार घेतील आणि त्‍यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही. त्यांना सत्याची चाड आहे, कायदा सुव्यवस्था राखली जावी, अमली पदार्थांची विक्री होऊ नये व गोमंतकीयांची पुढली पिढी बिघडू नये वगैरे अजिबात वाटत नाही. राजकीय असूयेपोटी बाहेर आलेली ही वक्तव्ये सत्य आहेत की नाही हे पडताळण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. यात सत्याचा थोडासा जरी अंश असला तरी ते सामाजासाठी फार घातक ठरेल.

दोघांतील भांडण मिटवण्यासाठी त्यावर पांघरूण घातले जाईल तेव्हा ते पांघरूण आपले पाय पसरून चुकून बाहेर आलेले सत्यही आत झाकून घेईल. एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात गुंग असलेल्या या आधुनिक दु:शासनांनी केवळ स्वत:लाच नग्न केले आहे, असे नव्हे तर सरकारची, भाजपची उरलीसुरली वस्त्रेही फेडली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पेडण्याची, गोव्याची लाज काढली आहे. या दोघांचे वस्त्रहरण पाहून भ्रमनिरास होणे साहजिक आहे. वस्त्रांनी रक्षण होईल असे त्यांच्यापाशी काहीच नाही. गांजाफेक ते चिखलफेक लोक पाहात आहेत, योग्‍यवेळी अद्दल नक्‍कीच घडवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT